संगमनेर शहर पोलिसांचा ‘छुप्या’ गोवंश कत्तलखान्यावर छापा! चार वाहने, पाचशे किलो मांस व सात जनावरांसह बारा लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मोठ्या कालावधीनंतर संगमनेर शहर पोलिसांनी अखेर ‘तो’ छुपा कत्तलखाना हुडकावून काढला असून आज पहाटे त्याच्यावर छापा घालीत तब्बल बारा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी पाचशे किलो गोवंश मांसासह तब्बल 10 लाख 40 हजार रुपये किंमतीची चार वाहनेही हस्तगत केली असून पाच गायींसह एक वासरु आणि गोर्ह्याला जीवदानही दिले आहे. या कारवाईत कत्तलखाना चालविणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या राज्यातील सर्वात मोठ्या कारवाईनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच कारवाई करण्यात आली असून त्यातून शहरातील गोवंश कत्तलखाने पुन्हा उभे रहाण्याची धडपड करीत असल्याचे दिसून आले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हेवडी रस्त्यावरील काटवनात छुप्या पद्धतीने बेकायदा कत्तलखाना सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना समजली. त्यानुसार आज (ता.05) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांनी पोलीस पथकासह तेथे छापा घातला असता एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल सुरु असल्याचे पोलीस पथकाला आढळले. यावेळी पोलिसांनी थेट त्या पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करीत आतमध्ये असलेल्या दोघांना ताब्यात घेतले, तर कत्तलखान्याच्या बाहेरील बाजूस उभ्या असलेल्या चारही वाहनांचे चालक पोलिसांचे वाहन येत असल्याचे पाहून अंधाराचा फायदा घेवून तेथून पसार होण्यात यशस्वी झाले.

या कारवाईत पोलिसांनी कत्तलखान्यातून कापलेल्या जनावरांचे सुमारे 300 किलो तर बाहेरील बाजूस उभ्या असलेल्या छोटा हत्ती वाहनातून 200 किलो असे एकूण 500 किलो गोवंशाचे मांस हस्तगत केले. यावेळी पोलिसांना कत्तलखान्याच्या बाहेरील बाजूस गोवंशाचे मांस वाहून नेण्यासाठी तैनात असलेली व सुमारे 10 लाख 40 हजार रुपये किंमतीची छोटा हत्ती टेम्पो दोन वाहने (क्र.एम.एच.17/ए.जी.3016) व (क्र.एम.एच.04/ई.वाय.3495) सह मारुती स्वीफ्ट कार (क्र.एम.एच.02/बी.जी.6525) व महिंद्रा पिकअप (क्र.एम.एच.14/एफ.टी.272) ही चार वाहने आढळून आली. त्यासोबतच मृत्यूच्या वेदीवर असलेली 35 हजार रुपये किंमतीची एक गाय व वासरुही पोलिसांना दिसल्याने त्यांची सुटका करण्यात आली.

या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण 11 लाख 76 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आरोपी साहिल उर्फ साद मुस्ताक कुरेशी (वय 19) व सलीम मुस्ताक कुरेशी (वय 24, दोघेही रा.कोल्हेवाडी रोड) या दोघांविरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 269, 429 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याचे कलम 5 (अ), 1, 9 (क) व प्राण्यांना निर्दयीपणाने वागणूक देण्यास प्रतिबंध करणार्या कायद्याचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करुन वरील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाणे यांच्याकडे देण्यात आला आहे.

सदरची कारवाई आटोपून पाठीमागे फिरणार्या पोलीस पथकाने पहाटे साडेपाचच्या सुमारास जमजम कॉलनीतही डोकावून पाहीले. यावेळी या भागातील कत्तलखान्यांमध्ये सामसूम असल्याचे आढळल्याने पथक पुन्हा गाडीत बसत असतांना मोना प्लॉटच्या परिसरातील काटवनात अंधारात निर्दयीपणाने बांधून ठेवलेल्या मूक्या जीवांना पोलिसांची चाहूल लागली आणि त्यांनी जीवाच्या आकांताने एकच हंबरडा फोडला. गायींच्या हंबरण्याचा आवाज ऐकून पोलिसांनीही लागलीच त्या दिशेला वाहन नेले असता काटवनात दाटीवाटीने बांधून ठेवलेल्या पाच गायी आणि एक गोर्हा पोलिसांना दिसला. पोलिसांची आणि त्या मूक्या जीवांची नजरानजर होताच त्या सर्व जनावरांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्याचे पथकातील पोलिसांनी सांगितले. त्या सर्वांची सुटका करण्यात आली असून पोलीस शिपाई रामकिसन मुखरे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात इसमाविरोधात दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल रफियोद्दीन शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी अहमदनगर पोलिसांनी येथील साखळी कत्तलखान्यांवर छापे घालीत राज्यातील आजवरची सर्वात मोठी कारवाई केली होती. त्यानंतर शहरात एकही कत्तलखाना सुरु होवू देणार नाही अशी वल्गना शहर पोलिसांकडून करण्यात आली होती, मात्र त्यानंतरही संगमनेरातील गोवंशाची कत्तल कधीही पूर्ण बंद होवू शकली नाही हे वेळोवेळी अन्य पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या कारवायांवरुन उघड झाले होते. त्यामुळे शहर पोलिसांच्या भूमिकेवर वेळोवेळी संशय व्यक्त होत असताना आज अखेर पोलिसांनी काटवनात लपलेला ‘तो’ कत्तलखाना शोधून काढीत त्यावर कारवाई केली आहे. या कारवाईने संगमनेरातील कसायांमध्ये खळबळ उडाली आहे.

