सेवाभाव हा सर्वांच्या कृतीत असणे काळाची गरज ः डॉ. मोतीपवळे कॉम्रेड उगले, प्रा. टाकळकर, साठे रोटरी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
नायक वृत्तसेवा, अकोले
सेवाभाव हा सर्वांच्या कृतीत असणे ही काळाची गरज आहे. रोटरी आंतरराष्ट्रीय संस्था सेवाभावी वृत्तीने काम करीत आहे. आज सेवाभावी वृत्तीने आयुष्यभर काम करणार्या, आपले जीवन समाजासाठी वाहणार्या मान्यवरांना रोटरी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यांचा सन्मान करण्याचे मला भाग्य लाभले. या पुरस्कारांनी रोटरी क्लबचा उद्देश पूर्ण झाला असे गौरवोद्गार रोटरी क्लब 3132 चे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी काढले.
रोटरी क्लब अकोले सेंट्रलच्यावतीने सामाजिक, शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणार्या कॉ. कारभारी उगले, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर व बायफचे नाशिक विभागीय अधिकारी जितीन साठे यांना रोटरी जीवन गौरव पुरस्काराने डॉ. मोतीपवळे यांच्या हस्ते सपत्नीक सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष सचिन आवारी होते. व्यासपीठावर पद्मश्री राहीबाई पोपेरे, अॅड. सविता मोतीपवळे, उपप्रांतपाल दिलीप मालपाणी, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुधीर लातुरे, पब्लिक इमेजचे डिस्ट्रिक्ट सल्लागार अमोल वैद्य, सेक्रेटरी डॉ. सूरिंदर वावळे, खजिनदार गंगाराम करवर आदी उपस्थित होते.
प्रांतपाल मोतीपवळे पुढे म्हणाले, 125 कोटी लोकांमधून आदर्श शोधून काढणे मोठे जिकरीचे काम आहे. जे आदर्श आहेत ते फार थोडे आहेत. त्यापैकी आज रोटरी क्लब अकोलेने जीवन गौरव पुरस्कारासाठी निवडलेले सर्व मान्यवर आदर्श व प्रेरणादायी आहेत. राहीबाईंच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी रोटरी क्लबने जीवन गौरव पुरस्कार देऊन समाजात चांगले काम करणार्यांना प्रोत्साहन दिले असल्याचे सांगितले. योग्य व्यक्तींना पुरस्कार दिल्याने पुरस्काराचे महत्व वाढल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली.
जितीन साठे म्हणाले, आजचा हा पुरस्कार दीनदुबळ्या, गोरगरीबांचा, आदिवासी महिलांचा, सहकारी मित्रांचा आहे हा पुरस्कार त्यांना समर्पित करतो. रोटरी व बायफचा अतिशय जवळचा संबंध आहे. दीड लाख आदिवासी महिलांना स्थायी रोजगार देऊ शकलो. तालुक्यात पद्मश्री हा सन्मान आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणण्यासाठी यशस्वी झालो, आता पद्मभूषण आणणार असल्याचा मानस व्यक्त केला. माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर म्हणाले, हा माझ्या एकट्याचा पुरस्कार नाही. अकोले तालुक्याच्या पत्रकारितेचा हा गौरव आहे असे मानतो. 30 वर्षे शिक्षक म्हणून काम करताना गांधीवादी विचारांच्या सत्यनिकेतन संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. पर्यवेक्षक, प्राचार्य म्हणून काम करीत असताना शाळेत अनेक उपक्रम राबविले, पत्रकार हाही एक समाजाचा शिक्षक असतो. शिक्षक व पत्रकारिता यांची सांगड घातली. पत्रकारिता करताना सत्याशी कधीही प्रतारणा केली नाही. कोणत्याही प्रकारचा लाभ, लोभ यांची अपेक्षा न ठेवता पत्रकारिता केली असल्याचे सांगितले.
कॉम्रेड कारभारी उगले म्हणाले, जवळपास 5 तप राजकीय जीवन जगलो. गल्ली ते दिल्लीपासून सर्व नेत्यांनी मला घडवले. त्यांच्याकडून मला वैचारिक बैठक मिळाली, गोरगरीबांना न्याय देता आला. चळवळीच्या रेट्याने रोजगार हमी योजनेचा कायदा झाला. चळवळी करताना संसाराकडे दुर्लक्ष झाले. परंतु पत्नीने खंबीर साथ दिली म्हणून निभावलो अशी भावना उगले यांनी बोलून दाखविली. प्रास्ताविक व स्वागत अध्यक्ष सचिन आवारी यांनी केले. अहवाल सेक्रेटरी डॉ. सूरिंदर वावळे यांनी सादर केला. यावेळी रोटरी बुलेटिनचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन पब्लिक इमेजचे संचालक हभप. दीपक महाराज देशमुख यांनी केले तर आभार पब्लिक इमेजचे डिस्ट्रिक्ट सल्लागार अमोल वैद्य यांनी मानले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव, अॅड. शांताराम वाळुंज, आनंद नवले, प्रा. विलास नवले, बी. के. बनकर, धनंजय संत, अप्पासाहेब आवारी, डॉ. विजय पोपेरे, खंडू वाकचौरे, भागवत शेटे, प्राचार्य डॉ. बी. वाय. देशमुख, फूड मदर ममताबाई भांगरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी अध्यक्ष सचिन शेटे, सचिन देशमुख, इलेक्ट प्रेसिडेंट रवींद्र डावरे, सेक्रेटरी सुनील नवले, प्रा. विद्याचंद्र सातपुते, बी. जी. वैद्य, नीलेश देशमुख, रोहिदास जाधव, अमोल देशमुख आदी रोटरियन्सने विशेष परिश्रम घेतले.