जन्मदात्यानेच केला पोटच्या गोळ्याचा खून! गावातील महिलांच्या चर्चेतून फुटले प्रकरणाचे बिंग

नायक वृत्तसेवा, नेवासा
पित्याने आपल्या नऊ वर्षांच्या मुलाचा हातपाय बांधून काठीने मारून खून केला. तो झाडावरून पडून जखमी झाल्याचा बनाव केला. त्याला दवाखान्यातही घेऊन गेला आणि नंतर अंत्यविधीही उरकला. मात्र, या प्रकाराची गावातील महिलांमध्ये चर्चा होती. ती चर्चा नेवासा नगरपंचायतीच्या पंप हाऊसवर काम करणार्‍या कर्मचार्‍याने ऐकली. त्याने पोलिसांना याची माहिती दिल्यावर तपास सुरू झाला आणि खुनाला वाचा फुटली.

नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे 13 ऑक्टोबरला ही घटना घडली होती. सागर शंकर पवार (वय 9 वर्षे) याची त्याचा पिता शंकर रामनाथ पवार (रा. टोका-प्रवरासंगम) याने हातपाय बांधून, काठीने मारून हत्या केली होती. मात्र, झाडावरून पडून तो जखमी झाला आणि नंतर मरण पावल्याची बतावणी करून त्याचा दफनविधीही करण्यात आला होता. याची गावात दबक्या आवाजात चर्चा होती. या गावातील काही महिला पाणी भरण्यासाठी प्रवरासंगम येथील पंप हाऊसवर जातात. तेथे नेवासा नगरपंचायतीचे कर्मचारी राजू फकिरा गाडे कामाला आहेत. त्यांनी महिलांची ही चर्चा ऐकली. प्रकरण गंभीर वाटल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार नेवाशाचे पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी तपास सुरू केला. गावात जाऊन संबंधितांकडे चौकशी केली. त्या मुलाच्या पित्याकडे, जखमी अवस्थेत मुलाला रुग्णालयात नेणार्‍या वाहनाचा चालक, रुग्णालयात मुलाला मृत घोषित करणारे डॉक्टर यांच्याकडे चौकशी केल्यावर संपूर्ण घटना समोर आली. त्यातून पित्यानेच मुलाचा खून केल्याचे उघड झाल्याने त्याच्याविरुद्ध खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुलाचा मृतदेह बाहेर काढून तपासणी करण्यात आली. त्यानंतर तो पुन्हा पुरण्यात आला.

पोलिसांच्या तपासात संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे. मात्र, पित्याने मुलाची हत्या का केली, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपी शंकर पवार याने मुलाचे हातपाय बांधून त्याला काठीने मारले. त्यात तो बेशुद्ध पडला. त्यामुळे त्याने ओळखीच्या एकाला गाडी घेऊन बोलाविले. मुलगा झाडावरून पडल्याने जखमी झाल्याचे सांगून त्याला नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. त्यामुळे त्याच वाहनातून त्याचा मृतदेह पुन्हा गावात आणण्यात आला. वास्तविक पाहता याची माहिती पोलिसांना देणे आवश्यक होते, मात्र ती न देताच पवार आपल्या मुलाचा मृतदेह गावात घेऊन आला. तेथेही लोकांना झाडावरून पडून मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगून प्रवरासंगम येथे नदीकाठी दफनविधी केला. याची माहिती मिळाल्यानंतर तपास करण्यासाठी पोलिसांनी मृतदेह पुन्हा बाहेर काढून तपासणी केली. त्यावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. तेथे ओळख पटवून, कायदेशीर प्रक्रिया करून पुन्हा दफन करण्यात आले. शेवटी मुलाच्या पित्याचा बनाव उघडकीस आला. या प्रकरणी पोलीस अधिकार्‍यांनीच फिर्याद दिली असून आरोपी शंकर पवारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Visits: 96 Today: 1 Total: 1098870

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *