रेमडेसिवीरचा काळा बाजार करणार्या चौघांविरोधात कारवाई! संगमनेरातील चार मेडिकल स्टोअर्सचे चालक खेळताहेत गंभीर रुग्णांच्या जीवाशी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील काही मेडिकल स्टोअर्सचे चालकच चार पैशांसाठी रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचे भयान वास्तव समोर आले आहे. या प्रकरणी जिल्हा यंत्रणेकडून रुग्णालयांना पुरवठा करण्यासाठी प्राप्त झालेल्या रेमडेसिवीर लशींचे संबंधितांना वितरण न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावणार्या संगमनेरातील चार मेडिकल दुकानांवर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र या गदारोळात वेळेत लस उपलब्ध न झाल्याने संगमनेर शहरातील एकासह तालुक्यातील एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकाराने संगमनेरातून संताप व्यक्त केला जात असून मानवतेचे शत्रू ठरलेल्या या चारही मेडिकल दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्याची मागणी होत आहे.

तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच गंभीर अवस्थेतील रुग्णांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काही रुग्णालयांमध्ये अपवादात्मक परिस्थितीत वापरल्या जाणार्या रेमडेसिवीर या लशीचा सर्रास वापर सुरु झाल्याने राज्यासह संगमनेरातही या लशीला मोठी मागणी वाढल्याने अनेकजण त्याचा काळाबाजार करुन रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यावर उपाय म्हणून जिल्हा यंत्रणेने रेमडेसिवीर लशीचा पुरवठा आपल्या नियंत्रणात घेत तालुकानिहाय आवश्यकतेनुसार त्याचे वितरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी संगमनेरातील आठ मेडिकल दुकानांना संगमनेर तालुक्यातील गंभीर रुग्णांच्या संख्येनुसार प्रत्येकी दोन याप्रमाणे यासर्व मेडिकल स्टोअर्सला तब्बल 482 रेमडेसिवीर वायलचा पुरवठा केला होता. सदरच्या वायल कोणत्या रुग्णालयाला किती द्याव्यात याचे स्पष्ट निर्देशही संगमनेरच्या इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार यांनी संबंधित मेडिकल दुकानांना दिलेले होते. मात्र असे असतांनाही या आठपैकी निम्म्या म्हणजे चार मेडिकल स्टोअर्सनी त्यांना मिळालेल्या 288 रेमडेसिवीर वायलचे मनमानी पद्धतीने वितरण करुन जिल्हाधिकार्यांच्या नियोजनालाच सुरुंग लावल्याचे समोर आले आहे.

जिल्हा यंत्रणेच्या नियोजनानुसार संगमनेरातील साईकृष्णा मेडिकल स्टोअर्स या दुकानाला 36 रेमडेसिवीर वायलचा पुरवठा करण्यात आला होता. त्याचे वितरण करतांना संबंधितांनी लाईफलाईन हॉस्पिटलला 28 व सत्यम हॉस्पिटलला आठ, आर.डी.सर्जिकल या मेडिकल स्टोअर्सला मिळालेल्या 80 वायलचे वितरण चैतन्य हॉस्पिटलला 58 व धन्वंतरी हॉस्पिटलला 22, ओम गगनगिरी मेडिकलला मिळालेल्या 96 वायलचे वितरण ओम गगनगिरी रुग्णालयाला 36, धन्वंतरी रुग्णालयाला 16, कुटे हॉस्पिटलला 28 व चंदनापुरीतील वृंदावन हॉस्पिटलला 16 याप्रमाणे, साई स्वामी मेडिकलला मिळालेल्या 36 वायलचे वितरण रसाळ हॉस्पिटलला 28 व मालपाणी हॉस्पिटलला आठ याप्रमाणे, सुयश मेडिकलला मिळालेल्या 60 वायलचे वितरण सुयश हॉस्पिटलला 14,

कानवडे हॉस्पिटलला 16, आरोटे हॉस्पिटलला 16 व साईसुमन हॉस्पिटलला 14 याप्रमाणे, बाफना मेडिकलला मिळालेल्या 96 वायलचे वितरण सिद्धी हॉस्पिटलला 34, पाठक हॉस्पिटलला 6, युनिटी हॉस्पिटलला 24, ताम्हाणे हॉस्पिटलला 4, साईसुमन हॉस्पिटलला 24 व सेवा हॉस्पिटलला 4 या प्रमाणे, पोफळे मेडिकलला मिळालेल्या 48 वायलचे वितरण पसायदान हॉस्पिटलला 16, निघुते हॉस्पिटलला 12, शेळके व इथापे हॉस्पिटलला प्रत्येकी आठ व घुलेवाडीच्या गुरुप्रसाद हॉस्पिटलला 4, तर अभंग मेडिकलला मिळालेल्या 30 वायलचे वितरण अकोल्याच्या हरिश्चंद्र हॉस्पिटलला 10 व राहाता येथील श्रीनाथ कोविड केअर सेंटरला 20 याप्रमाणे एकूण 26 रुग्णालयांना 482 रेमडेसिवीर वायलचे वितरण होणे अपेक्षित होते.

मात्र यातील काही रुग्णालयांना लशींचा पुरवठाच न झाल्याने त्यांनी याबाबत संगमनेरच्या इन्सीडेंट कमांडरांकडे तक्रार केली. त्यावरुन वरील आठही मेडिकल स्टोअर्सची चौकशी केल्यानंतर त्यातील साईकृष्णा मेडिकल स्टोअर्स (36 वायल), ओम गगनगिरी मेडिकल (96 वायल), सुयश मेडिकल (60 वायल) व बाफना मेडिकल (96 वायल) यांनी त्यांना ठरवून दिलेल्या अनेक रुग्णालयांना रेमडेसिवीर लशींचा पुरवठाच केला नसल्याचे समोर आले. याबाबत त्यांना लेखी खुलासा करण्याची संधी दिली असता त्यातूनही त्यांना आपली ‘चोरी’ लपवता न आल्याने मानवतेच्या या शत्रूंविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेत या चारही मेडिकल स्टोअर्स विरोधात कठोर कारवाई करण्याबाबत अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांना सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. या कारवाईने ‘मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणं’ म्हणजे काय? या म्हणीचे वस्तुनिष्ठ चित्र उभे राहीले आहे.

वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जवळपास 35 ठिकाणी रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था असून त्यातील 26 ठिकाणी गंभीर अवस्थेतेतील रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था आहे. त्यांना नियमित रेमडेसिवीर लस आवश्यक असल्याने जिल्हा प्रशासनाने दाखल रुग्णांच्या संख्येत प्रत्येकी दोन याप्रमाणे जिल्ह्यात पुरवठ्याची साखळी निर्माण केली आहे. मात्र या साखळीतील काही कड्याच दुषीत निघाल्याने रेमडेसिवीर मिळेल या आशेवर मृत्यूशी संघर्ष करीत असलेल्या रुग्णांचे दम तुटत आहेत. रुग्णांच्या जीवाशी खेळणार्या अशा औषध विक्रेत्यांवर कायमस्वरुपी परवाना रद्द करण्याची कठोर कारवाई करावी अशी मागणी आता समोर येत असून या प्रकाराने नागरिक संतप्त झाले आहेत.

शुक्रवारी उघड झालेल्या रेमडेसिवीर चोरांच्या यादीतील ओम गगनगिरी मेडिकल स्टोअर्स या औषध दुकानातून चंदनापुरीतील वृंदावन हॉस्पिटलला 16 व धन्वंतरी रुग्णालयाला 16 रेमडेसिवीर लशींचा पुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात तसे न झाल्याने या दोन्ही रुग्णालयात दाखल असलेल्या प्रत्येकी एका गंभीर अवस्थेतेतील रुग्णांचा बळी गेल्याची चर्चा आहे. या प्रकरणाची प्रशासनाने सखोल चौकशी करुन या दोघांच्याही मृत्यूला रेमडेसिवीर लस न मिळणे हे कारण असेल तर संबंधित मेडिकल चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही आता समोर येवू लागली आहे.

