जागेच्या वादातून दोघा पदाधिकाऱ्यांनी ठोकले एकमेकांविरोधात शड्डू! दोन्ही बाजूंंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रस्त्याच्या कामाच्या निमित्ताने तालुक्यातील दोन नामचीन पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या धूमसाधूमशीत दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर चिखलफेक करीत, परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या वृत्ताने तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले असून उलटसुलट चर्चेेेला उधाण आले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे व संगमनेेर तालुका दुध संघाचे संचालक विलास कवडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

संगमनेेर तालुका दुध संघाचे संचालक विलास कवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दहा वर्षांपूर्वी त्यांनी गुंजाळवाडी शिवारात 3 गुंठे जागा खरेदी केली होती. आजही ती जागा त्यांच्या वहिवाटीत आहे. मात्र गेल्या सोमवारी (ता.6) पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे यांनी त्यांना दूरध्वनी करुन तातडीचे काम असल्याचे सांगत आपल्या गणेशनगर येथील कार्यालयात त्यांना बोलावले. काहीतरी काम असेल म्हणून वलवे तातडीने अरगडे यांच्या कार्यालयात पोहोचले. तिथे गेल्यानंतर अरगडे यांनी ‘माझ्या संमतीशिवाय तू गुंजाळवाडी भागात जमीन कशी काय घेतलीस?’ असा सवाल करीत ‘मला विचारल्याशिवाय या भागात कोणीही व्यवहार करु शकत नाही. तुझ्या तीन गुंठे क्षेत्रातून मागील भागात जाण्यासाठी रस्ता काढू दे, तेथून आम्हाला रस्ता करावयाचा आहे असा दमही त्यांनी यावेळी भरला.

त्यावर सदरची जागा आपण दहा वर्षांपूर्वी खरेदी केली आहे. त्यामुळे माझ्या व्यक्तिगत मालकीच्या जागेतून मी सार्वजनिक प्रयोजनासाठी रस्ता कसा सोडू? असा प्रतिप्रश्न त्यांनी अरगडे यांना विचारला. त्यामुळे अरगडे भडकले व त्यांनी ‘तू कसा रस्ता देत नाही तेच बघतो’ असे म्हणत कवडे यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. यावेळी अरगडे यांनी ‘आत्ताच जेसीबी आणून रस्त्यातच खड्डा घेतो आणि तुला त्यात गाडतो, तुझ्या कुटुंबाचाही खात्मा करतो’ अशा शब्दात धमकी दिली. तेथून सुटका करुन घेत आपण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्याचे विलास कवडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

तर याच प्रकरणात गुंजाळवाडी येथील योगेश आप्पाजी गुंजाळ, राजेंद्र आप्पाजी गुंजाळ, भाऊसाहेब भिमाजी गुंजाळ, सचिन भाऊसाहेब गुंजाळ, अरुण भास्कर गुंजाळ, शांताराम विश्वनाथ गुंजाळ व अन्य आठ जणांनी शहर पोलीस ठाण्यात विलास कवडे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार वरील मंडळी गेली वर्षोनुवर्षे सदर ठिकाणी वास्तव्यास असल्याचे त्यात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी कवडे यांनी वेल्हाळे रस्ता ते गुंजाळ मळा या भागात तीन गुंठे जागा खरेदी केली. प्रत्यक्षात मात्र त्यांनी या भागातून जाणाऱ्या रस्त्यावरही अतिक्रमण करून चार गुंठे जागेवर ताबा मिळविला व बेकायदेशीरपणे गुंजाळ मळ्याकडे जाणारा रस्ता अडविला.

गुंजाळवाडी ग्रामपंचायतीने सदरचा रस्ता मजबूत करण्याचे काम सुरु केले असता, विलास कवडे यांनी रस्त्याचे काम बंद पाडले. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी कवडे यांना भेटून सदरचा रस्ता सार्वजनिक असल्याने तो खुला करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी उलट आपल्यालाच दमबाजी केल्याचे व धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या वादातून तोडगा निघत नसल्याने वरील सर्व इसमांनी पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी विलास कवडे यांना फोन करुन सोमवारी बैठकीसाठी बोलाविले. या बैठकीत गुंजाळवाडी ग्रामपंचायत सदस्य अमोल गुंजाळ व पोपट अरगडे यांच्यासह रामनाथ कुऱ्हे, राजेंद्र रहाणे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नवनाथ अरगडे यांनी सर्वांसमोर सातबारा उताऱ्यानुसार जागेचे मोजमाप करुन अतिक्रमित क्षेत्र रस्त्यासाठी मोकळे करण्याची विनंती कवडे यांना केली.

मात्र कवडे यांनी ती विनंती धुडकावून लावली. यावेळी कवडे यांनी ‘माझा दोन नंबरचा धंदा आहे. मी अशाच अडचणीच्या जागा विकत घेण्याचे उद्योग करतो. हा रस्ता मी होऊ देणार नाही’ अशी आडमुठेपणाची भूमिका घेतली. यावेळी उपसभापती अरगडे यांनी त्यांना वारंवार विनवण्या करुनही त्यांनी ऐकले नाही व ते तेथून निघून गेले. सदर बैठकीला गुंजाळवाडीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्यासमोरच नवनाथ अरगडे यांनी विलास कवडे यांना सार्वजनिक रस्त्याची जागा अतिक्रमण मुक्त करण्याची विनंती केली. यावेळी अरगडे यांनी कोणताही आततायीपणा अथवा असंस्कृतपणा केला नसल्याचा उल्लेख या तक्रार अर्जात करण्यात आला आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी दोन्ही बाजूंवर भा.द.वि. कलम 323, 504, 506 अन्वये दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या वृत्ताने तालुक्यातील राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे.

नवनाथ अरगडे हे संगमनेर पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती तर विलास कवडे हे संगमनेेर तालुका दुध संघाचे विद्यमान संचालक आहेत. दोन्ही ग्रामीण नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक आहेत. असे असतानाही या दोघांंतील वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या वादावर बैठकीतून तोडगा निघू शकत असताना, त्याला सार्वजनिक स्वरुप प्राप्त करून दिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून या वादावर महसूल मंत्री थोरात नेमकी काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Visits: 210 Today: 4 Total: 1102905
