यूट्युबरने केली सेवाभावी संस्थेकडे दहा लाखांची मागणी! अकोलेच्या कथीत पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तंत्रज्ञानाच्या युगात हाती आलेल्या मोबाईलचा कोण कसा वापर करील याचा कोणताही भरवसा राहीला नाही. असेच काहीसं सांगणारी अतिशय धक्कादायक घटना तालुक्यातून समोर आली असून एका सेवाभावी संस्थेची युट्युब वर व्हिडिओ टाकून बदनामी करण्याची धमकी देत स्वतःला पत्रकार म्हणून मिरवणार्या यूट्यूबरने संस्था चालकांकडे तब्बल दहा लाखाची मागणी केली. तडजोडीअंती ४ लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र होणारी ही मागणी अनाठायी वाटल्याने संबंधित संस्था चालकाच्या मुलाने तालुका पोलीस ठाणे गाठत अकोलेच्या ‘सह्याद्री एक्सप्रेस’ या युट्युब चॅनलच्या साळवे नामक तथाकथित पत्रकाराविंरुद्ध फिर्याद दिल्यावरून संगमनेर तालुका पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेने हातात मोबाईल घेवून गावोगावी ‘पत्रकार’ म्हणून मिरवणार्यांचे कारनामे उघड झाले असून अशाप्रकारे पत्रकारिता क्षेत्राला बदनाम करणार्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होवू लागली आहे.याबाबत शिवम राजेंद्र गडगे (वय २१, रा.वडगाव पान,ता.संगमनेर) याने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात त्याने म्हटले आहे की, वडील राजेंद्र बापू गडगे, आई अश्विनी राजेंद्र गडगे, बहिण ज्ञानेश्वरी राजेंद्र गडगे असे आम्ही एकत्र राहावयास आहे. मी व माझे वडील राजेंद्र असे आम्ही दत्तधाम सरकार, दत्त दिगंबर सेवाभावी संस्था वडगाव पान तालुका संगमनेर येथे असलेल्या संस्थेचे कामकाज पाहतो. आमच्या सेवाभावी संस्थेचे संपूर्ण महाराष्ट्रात अनुयायी आहेत.

तसेच आमच्या संस्थेचे युट्युब वर व्हिडिओ देखील आहेत. आमच्या ओळखीचा साळवे (पूर्ण नाव माहित नाही, रा.अकोले) हा त्याच्या यूट्यूब चैनल वर आमच्या दत्त दिगंबर सेवाभावी संस्थेची बदनामी करण्याच्या उद्देशाने व्हिडिओ टाकण्याची धमकी देत असतो. तो नेहमी फोन अगर व्हाट्सअप कॉल वर मला फोन करून यूट्यूब चैनल वर तुमचे व संस्थेची बदनामीचे व्हिडिओ टाकायचे नसतील तर तुम्ही मला पैसे द्या अशी मागणी करून जुलै २०२४ पासून तो धमकी व ब्लॅकमेल करत आहे. मी व माझे वडील आमच्या दत्तधाम सरकार, दत्त दिगंबर सेवाभावी संस्थेमध्ये कामात व्यस्त असताना वारंवार साळवे फोन करतो.त्याच्या फोनवरील धमक्यांना आम्ही कंटाळलो. तसेच सोमवार दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री साळवे याने मला व्हाट्सअप वर फोन करून दहा लाख रुपयांची मागणी केली.

त्याच्यात व माझ्यात तडजोडीअंती सहा लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर ठरलेल्या रकमेपैकी तीन लाख रुपये लागलीच द्यायचे व उर्वरित तीन लाख रुपये नंतर द्यायचे ठरले. दरम्यान मी कामात व्यस्त असल्याने त्याचे आलेले फोन मी घेतले नाहीत. त्यानंतर मंगळवार दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी साधारण १० ते ११ वाजेच्या सुमारास मी त्यास फोन केला, तेव्हा साळवे व माझ्यातील संभाषणात चार लाख रुपये द्यायचे ठरले व तो मला रात्री धांदरफळ फाटा तालुका संगमनेर येथे बोलावले. परंतु माझे सोबत कोणी नसल्याने मी जाण्याचे टाळले. त्यानंतर त्याने मला त्याच्या अकोले येथील बस स्टॅन्ड जवळील कार्यालयाकडे बोलावले आहे असे शिवम गडगे याने फिर्यादीत म्हटले आहे.

त्याचबरोबर साळवे याने जुलै २०२४ ते आज पर्यंत दत्तधाम सरकार, दत्त दिगंबर सेवाभावी संस्था या आमच्या सेवाभावी संस्थेमध्ये आमचे कळत नकळत येऊन तेथील संस्थेचे, भाविकांचे व्हिडिओ व ऑडिओ काढून ते यूट्यूब चैनल न्यूज ‘सह्याद्री एक्सप्रेस’ यावर प्रासारित करून संस्थेच्या नावाची बदनामी करून आम्हाला व संस्थेला क्षती पोहोचवण्याच्या उद्देशाने मला वारंवार फोन करून सदरच्या क्लिपा प्रसार माध्यमातून प्रसारित करण्याची भीती घालण्याचा प्रयत्न करून त्याच्याकडून जर बदनामीचे प्रसारण थांबवायचे असेल तर माझ्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी स्वरूपात मागणी केली. तडजोडीअंती ठरल्यानंतर चार लाख रुपये त्याला द्यायचे ठरल्यानंतर त्याचे न्यूज सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलच्या कार्यालयात अकोले येथे घेऊन बोलावले आहे असेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांनी साळवे (पूर्ण नाव माहित नाही) याच्यावर गु.रजि.नं.५४४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०८ (२×३) प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

कथीत पत्रकारांच्या माध्यमातून युट्युबचा वापर करून लोकांना ‘ब्लॅकमेल’ करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे संगमनेर-अकोलेच्या प्रगल्भ पत्रकारितेवरही संशय निर्माण होत असून या घटनांना वेळीच पायबंद घालण्यासाठी संगमनेरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी अशा खंडणीखोरांवर ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Visits: 89 Today: 1 Total: 1107480
