संगमनेर तालुक्यात बुधवारी आढळले अठरा रुग्ण! लक्षणे नसलेले रुग्ण सापडत असल्याने धोका वाढला; एकाचा बळीही गेला
नायक वृत्तसेवा, संगमनेर
वर्षाच्या सुरुवातीलाच चौथ्या महिन्यात सुरू झालेला कोविडचा प्रादुर्भाव जवळपास आठ महिन्यांच्या संचारानंतर आता माघार घेत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरी रुग्णसंख्येत झालेली मोठी घट आणि ग्रामीणभागातही होत असलेली माघार यामुळे तालुक्यात दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालातून ही गोष्ट अधोरेखित झाली असून एकूण रुग्णसंख्येत शहरातील केवळ एका रुग्णाचा समावेश आहे. बुधवारी तालुक्याच्या रुग्णसंख्येत अठरा रुग्णांची भर पडून एकूण संख्या आता 5 हजार 994 वर पोहोचली आहे.
सप्टेंबरनंतर नोव्हेंबरमध्ये उच्चांक गाठणार्या कोविडच्या रुग्णसंख्येत गेल्या पंधरवड्यापासून मोठी घट झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यातच गेल्या दहा दिवसांत शहरी रुग्णसंख्येची सरासरी पाच टक्क्यांच्याही खाली आल्याने शहरात समाधानाचे चित्र निर्माण झाले आहे. या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तालुक्यातील एकूण रुग्णसंख्येत दररोज सरासरी 30 रुग्ण याप्रमाणे 451 बाधितांची भर पडली. तर नंतरच्या पंधरवड्यात त्यात सरासरी सात रुग्ण कमी होवून 23 च्या सरासरीने 344 रुग्ण वाढले. शहरातही पहिल्या पंधरा दिवसांत तब्बल 119 तर नंतरच्या पंधरा दिवसांत 74 रुग्णांची भर पडली. कोविड माघारीचा परिणाम ग्रमीण रुग्णसंख्येतही दिसून आला. तालुक्याच्या ग्रामीणभागात 1 ते 15 डिसेंबरपर्यंत दररोज 22.13 सरासरीने 332 रुग्णांची तर 16 ते 30 डिसेंबर या कालावधीत सरासरी 18 रुग्ण दररोज या गतीने 270 रुग्णांची वाढ झाली. शहर आणि ग्रामीण क्षेत्र अशा दोन्ही कडून कोविडची माघार होत असल्याचे या आकडेवारीतून लक्षात येते.
बुधवारी (ता.30) खासगी प्रयोगशाळेच्या चार आणि रॅपिड अँटीजेन चाचणीच्या चौथ्या अहवालातून अठरा जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले. त्यात शहरातील एकमेव मालदाड रस्त्यावरील 57 वर्षीय इसमाचा समावेश आहे. उर्वरीत सर्व बाधित ग्रामीणभागातील असून त्यात निमोण येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमज येथील 26 वर्षीय तरुणासह 45, 25 व 22 वर्षीय महिला, झोळे येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मुधळवाडीतील 27 वर्षीय तरुण, शेडगाव येथील 40 वर्षीय महिला, आश्वी खुर्दमधील 33 वर्षीय महिलेसह 17 वर्षीय तरुणी, मनोली येथील 53 वर्षीय इसमासह 28 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 52 वर्षीय महिला, निमगाव जाळीतील 40 वर्षीय तरुण, दरेवाडीतील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घुलेवाडीतील 45 वर्षीय महिला व वडगाव लांडगा येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत अठरा रुग्णांची नव्याने भर पडून रुग्णसंख्या 5 हजार 994 झाली आहे.
सध्या बहुतेक रुग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे हा विषाणू आता अधिक जीवघेणा झाल्याचेही दिसून येते. महसूल विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचार्याला कोविडची बाधा झाल्याची बाब खूप उशीराने लक्षात आली, त्याचा परिणाम कोविडने त्याच्या श्वसन यंत्रणेवर ताबा घेतल्याने ऐनवेळी धावपळ करावी लागली. मात्र त्याचा कोणताही उपयोग न झाल्याने त्या कर्मचार्याला आपला जीव गमवावा लागला. एकीकडे कोविडची माघार होत असल्याचे चित्र जरी दिसत असले तरीही दुसरीकडे तो पूर्णतः आटोक्यात आलेला नसल्याने थोडेसे दुर्लक्ष जीवावर बेतू शकते याचे हे मोठे उदाहरण उभे राहीले आहे. त्या कर्मचार्याच्या मृत्यूने तालुक्यातील कोविड बळींची संख्या वाढून आता 47 वर पोहोचली आहे.