25 जानेवारी रोजी साजरा होणार ‘राष्ट्रीय मतदार दिन’! कोविडच्या पार्श्वभूमीवर अन्य कार्यक्रमाला फाटा देवून केली जाणार मतदार जागृती
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपला देश 15 ऑगस्ट, 1947 रोजी आठशे वर्षांच्या गुलामीतून मुक्त झाला. देशाच्या पायातील गुलामगिरीच्या बेड्या नाहीशा झाल्या तरीही देशात लोकशाहीचे खरे पर्व 26 जानेवारी, 1950 पासून सुरु झाले. भारत यादिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताचा सातत्याने गौरव केला जातो. लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मतदार. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशात ‘मतदार दिन’ साजरा केला जातो. यंदा आपला देश अकरावा मतदार दिवस साजरा करणार आहे. यावर्षी कोविडचे संकट अजूनही असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा असली तरीही या दिनाचे महत्त्व म्हणून मतदार जागृतीचे विविध कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
गेल्या दहा वर्षांपासून म्हणजे सन 2011 पासून देशात दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 25 जानेवारी, 1950 रोजी देशात भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. देशातील शास्त्रज्ञ आयुष्यभर अविश्रांत मेहनत घेऊन संशोधनाद्वारे मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. देशातील युवक-युवती सैन्यातील विविध पदांवर कार्यरत राहून देशसेवा करतात. संरक्षण, संशोधन, कृषी विकास, उद्योग, याच बरोबर अगदी राष्ट्रीय सेवा दल व शालेय विद्यार्थी एन.सी.सी.च्या माध्यमातून का असेना आपापल्या परीने देशसेवा करण्याचा प्रयत्न करीत असतो.
मतदान करणे हा सुद्धा देशसेवेचाच एक भाग आहे. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तरच देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास मदत होते. याच दृष्टीकोनातून देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. किंबहूना मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हणल्यास वावगे ठरु नये. लोकशाहीमध्ये प्रत्येक मत मौल्यवान आहे. एका-एका मतानं इथे विरोधक जिंकतात आणि सत्ताधीश कोसळतात. म्हणूनच अरुणाचल प्रदेशमध्ये एका मतदारसंघात असंही एक मतदान केंद्र उभं करण्यात आलं होतं. जिथं फक्त एकाच मतदाराची नोंद होती. ह्युलियांग मतदारसंघातील हे केंद्र देशातल सर्वात छोटं मतदार केंद्र होतं.
लोकशाहीचा उत्सव असलेल्या या दिनी दरवर्षी देशभरात विविध कार्यक्रमांचे व मतदार जागृतीचे अभियान राबविले जाते. संगमनेरातही यापूर्वी असे कार्यक्रम झाले आहेत. मात्र यावर्षी कोविडचे भय कायम असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांना फाटा देवून शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने वकृत्त्व, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. त्यासोबतच प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचून याद्या अद्ययावत ठेवणारा मुख्य घटक असलेल्या बुथ लेव्हल ऑफिसर्सचा सन्मानही राष्ट्रीय मतदार दिनी केला जाणार असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगीतले.
संगमनेर तालुका संगमनेर, अकोले व शिर्डी विधानसभा मतदारसंघांना जोडला गेला आहे. तालुक्यातील 212 गावांतील 1 लाख 41 हजार 602 पुरुष व 1 लाख 31 हजार 48 महिला मतदार संगमनेर विधानसभा मतदारसंघाशी, 28 गावातील 32 हजार 172 पुरुष व 29 हजार 412 महिला मतदार शिर्डी विधानसभा मतदारसंघाशी तर 28 गावातील 21 हजार 744 पुरुष व 19 हजार 350 महिला मतदार अकोले मतदारसंघाशी मिळून 172 गावातील 1 लाख 95 हजार 518 पुरुष व 1 लाख 79 हजार 810 महिला असे एकूण 3 लाख 75 हजार 330 मतदार आहेत.