कोपरगावमध्ये सोमवारपर्यंत कोरोना संसर्ग निर्मुलन अभियान
कोपरगावमध्ये सोमवारपर्यंत कोरोना संसर्ग निर्मुलन अभियान
कोपरगाव प्रशासन आणि वैद्यकीय विभागाचे क्रांतिकारक पाऊल
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरात कोरोना संसर्ग आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे (आव्हाड) यांचे संकल्पनेतून आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाटे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर, शहरी आरोग्य अभियानाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.गायत्री आहेर (कांडेकर) यांचे विशेष प्रयत्नांतून कोपरगाव शहरात शुक्रवार दि.28 ऑगस्ट, 2020 ते 31 ऑगस्ट, 2020 पर्यंत कोरोना संसर्ग निर्मुलन अभियान राबविण्यात येणार आहे.
तहसीलदार योगेश चंद्रे, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालय, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य विभाग पंचायत समिती यांचे यंत्रणेमार्फत हे अभियान होणार आहे. शहरातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्य सेवक, शिक्षक अशा 75 जणांना एकदिवसीय विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोरोना संसर्गबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असलेल्या उपनगरात विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यात गांधीनगर, महादेवनगर, गोरोबानगर, दत्तनगर, टिळकनगर, विवेकानंद नगर, सप्तर्षीमळा, कालेमळा, सुभाषनगर, संजयनगर, समतानगर, निवारा, सुभद्रानगर या उपनगरांचा समावेश करण्यात आला आहे.
चार दिवस शहरात लॉकडाऊनच्या काळात सुरु करण्यात आलेल्या या अभियानात आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करणार आहेत. यात डायबेटीस, दमा, कॅन्सर तसेच सर्दी, खोकला, ताप आजाराने बाधित रुग्णांची कोरोना लक्षणे संदर्भात प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. जेणेकरुन अशा दुर्धर आजाराने बाधित त्या रुग्णास दिलासा मिळेल. प्रशिणार्थींची 17 पथके तयार करण्यात आली असून 6 नियंत्रण अधिकारी नेमण्यात आले आहेत. शहरातील रुग्णांच्या घरापर्यंत पोहोचून तपासणी, पुढील उपचार आणि समुपदेशन केले जाणार आहे. याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार योगेश कोतवाल उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यशाळेचे सूत्रसंचालन समन्वयक सुशांत घोडके, तर आभार साथ नियंत्रण अधिकारी सचिन जोशी यांनी मानले. कोपरगाव प्रशासन आणि वैद्यकीय विभागाने टाकलेल्या या क्रांतिकारक पावलाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.