जिल्ह्यात कार्यान्वित झाला चोवीस तास चालणारा ‘नियंत्रण कक्ष’! जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या खासगी व शासकीय रुग्णालयांमधील माहिती मिळणार..

नायक वृत्तसेवा, अहमदनगर
जिल्ह्यातील कोविडचा संसर्ग वेगात आला असून अवध्या तेरा दिवसांतच जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल सुमारे 26 हजार रुग्णांची भर पडली आहे. रोज मोठ्या संख्येने समोर येणारे रुग्ण, आणि सक्रीय रुग्णांची वाढती संख्या यामुळे रुग्णांना खाटा उपलब्ध होत नसून वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच मृत्यू होण्याच्या जिल्ह्यातील दोन घटना समोर आल्या आहेत. यावर उपाय शोधताना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आता जिल्ह्यात चोवीस ताशी नियंत्रण कक्ष स्थापन केला असून कक्षात दूरध्वनी केल्यास जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील शासकीय व खासगी रुग्णालयांची अद्ययावत माहिती उपलब्ध होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिद्धी पत्रकामार्फत कळविले आहे.

गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येत दररोज उच्चांकी भर पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यात निर्माण केलेल्या आरोग्य यंत्रणा तोकड्या पडू लागल्या आहेत. रोज उपचार पूर्ण करुन घरी सोडल्या जाणार्या रुग्णांची संख्या आणि नव्याने समोर येणार्या संख्या यांचे सूत्र जुळत नसल्याने अनेक ठिकाणच्या रुग्णांना खाटांसाठी तर अनेकांना ऑक्सिजनच्या सुविधेसाठी पळापळ करावी लागत आहे. त्यातच अहमदनगर व श्रीरामपूर येथील रुग्णालयांच्या बाहेरच केवळ खाट उपलब्ध न झाल्याने दोघांना हकनाक आपला जीव गमावण्याची वेळ आल्याच्या वेदनादायी घटनाही घडल्या आहेत. यावर उपाय शोधताना जिल्हाधिकार्यांनी आता संपूर्ण जिल्ह्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला आहे.

यानुसार आता जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमधील सर्व शासकीय व खासगी डी.सी.एस.सी., डी.सी.एच. व सी.सी.सी. उपचार केंद्रांची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली असून त्यांची वर्गवारी करुन ती ऑनलाईन पद्धतीने संचलित केली जाणार आहे. त्यानुसार सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात व कोणत्या केंद्रात कोणत्या सुविधेच्या किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती केवळ एकाच फोनवर उपलब्ध होणार आहे. याचा थेट फायदा आता रुग्णांना होणार असून त्यांची परवड थांबण्यासह त्यांच्या नातेवाईकांची होणारी ससेहोलपटही आता संपणार आहे.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या व चोवीस तास रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या सेवेत राहणार्या या नियंत्रण कक्षासाठी नोडल अधिकारी म्हणून श्रीमती उर्मिला पाटील यांची तर साहाय्यक अधिकारी म्हणून जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर यांची नियुक्ति करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षासाठी 0241-2345460 हा क्रमांक निश्चित करण्यात आला असून रुग्ण अथवा त्याच्या नातेवाईकांनी या क्रमांकावर संपर्क साधून आपली वैयक्तिक माहिती दिल्यानंतर त्याला आवश्यक असलेल्या सुविधेची खाट तो रहात असलेल्या तालुक्यात अथवा अन्य तालुक्यात कोठे उपलब्ध आहे याची माहिती तत्काळ मिळणार आहे.

या सुविधेमुळे रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ कमी होण्यासह अहमदनगर व श्रीरामपूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळली जाणार असून नागरिकांनी या सुविधेचा 24 तास वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. नागरिकांनी आपल्या कुटुंबातील रुग्णांना उपचारासाठी जागा उपलब्ध न झाल्यास वरील क्रमांकावर फोन करण्यास सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकार्यांच्या या निर्णयाचे जिल्हाभरातून स्वागत करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सलग उच्चांकी रुग्णवाढ सुरु असल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भिती निर्माण झाली आहे. अशा अवस्थेत बाधित असलेल्या रुग्णांची दमछाक होवू नये यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी चोवीस तास सुरु राहणारा ‘नियंत्रण कक्ष’ स्थापन केला असून त्यासाठी स्वतंत्र अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या घोषणेमुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय खासगी रुग्णालयांना आपापल्या रुग्णालयांची सद्यस्थिती अद्ययावत ठेवण्याचे बंधन घालण्यात आले आहे. रुग्णांना खाट उपलब्ध होत नसल्यास नागरिकांनी नियंत्रण कक्षाच्या 0241-2345460 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

