गुढीपाडव्यानिमित्त शनिदेवाला गाठी-कडे अर्पण

नायक वृत्तसेवा, नेवासा
सूर्यपुत्र शनिदेव की जय म्हणत शनिशिंगणापूर येथील स्वयंभू शनिमूर्तीला गुढीपाडव्यानिमित्त गंगाजल अभिषेक घालण्यात आला. याचबरोबर गाठीकडेही अर्पण करुन अवघ्या पाच जणांच्या उपस्थितीत पूजा-अर्चा करण्यात आली.

कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून शनि देवस्थान ट्रस्टने गुढीपाडवा यात्रा, कावड सोहळा व उदासी महाराज पारायण सप्ताह रद्द केला होता. परंपरा म्हणून मुख्य पुजारी अशोक कुलकर्णी यांनी प्रवरासंगम येथून आणलेल्या गंगाजलने शनिमूर्तीला स्नान घालण्यात आले. शनि व हनुमान मुर्तीला साखरेचे कडे अर्पण करुन गाठीचा हार घालण्यात आला. कोरोना संसर्गाच्या संकटामुळे सलग दुसर्या वर्षी गुढीपाडवा यात्रा रद्द करावी लागली. यामुळे ग्रामस्थ कावड मिरवणुकीपासून वंचित राहिले. मुख्य आरती सोहळ्यास महंत त्रिंबक महाराज, पुरोहित अशोक कुलकर्णी व अन्य तीन कर्मचारी उपस्थित होते. शनि चौथर्यास आकर्षण फुलांची सजावट करण्यात आली होती. बाहेरुन आलेल्या तुरळक भाविकांनी महाद्वार येथे लावलेल्या स्क्रीनवर शनिदर्शन घेतले.
