मुलगी पळवून नेल्याने एकास बेदम मारहाण

नायक वृत्तसेवा, राहुरी
मुलगी पळवून नेल्याच्या रागातून अपहरण करुन एकास दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. जखमी अवस्थेत त्याला बहिणीच्या घरासमोर सोडून आरोपींनी पळ काढला. याप्रकरणी अकरा जणांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब विठ्ठल लंघे (वय 27, रा.ब्राह्मणी) असे अपहरण करून मारहाण झालेल्याचे नाव आहे. खंडू काळे, मनोज निमसे, भरत गोरख काळे, नंदू गोरख काळे, अंकुश हरिभाऊ काळे, विनोद (पूर्ण नाव समजले नाही), अमोल जालिंदर काळे (सर्व रा.बुरुडगाव, ता.नगर), पिनू दरेकर (रा.रेल्वे स्टेशन, वीटभट्टीशेजारी, ता.नगर), रवी घिसाडी (रा.नागापूर एमआयडीसी, ता.नगर) व काळ्या रंगाच्या दुचाकीवरील दोन अज्ञात व्यक्ती (नाव पत्ता समजले नाही) अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी पसार आहेत. जखमी लंघे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की ब्राह्मणी येथे आदर्श शाळेच्या ओट्यावर 4 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता मित्रांसमवेत गप्पा मारत असताना, काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ जीपमधून आलेल्या आरोपींनी अचानक लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पळून गेला तर गोळ्या घालू, अशी धमकी दिली. जीपमधून जबरदस्तीने अपहरण केले. राहुरीमार्गे नगरच्या दिशेने नेताना जीपमध्येही मारहाण केली. बाबुर्डी घुमट (ता.नगर) शिवारात रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान जीपमधून उतरवून, पायाच्या नडगीवर दगडाने व लाथाबुक्क्यांनी जबरदस्त मारहाण केली. पुन्हा जीपमध्ये घालून बहीण मीरा नवनाथ वायखंडे (रा.कोंबडी मळा, ता.नगर) यांच्या घरासमोर सोडून आरोपी पळून गेले.

Visits: 96 Today: 1 Total: 1109837

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *