वादळी-वार्यासह झालेल्या पावसाने कांद्याचे नुकसान
नायक वृत्तसेवा, घारगाव
एकीकडे कोरोना संकट चालू असताना दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. सोमवारी (ता.12) वादळी वार्यासह संगमनेर तालुक्याच्या पठारभागात झालेल्या पावसाने शेतकर्यांची एकच धांदल उडाल्याचे दृश्य पहायला मिळाले. यामध्ये साठवून ठेवलेला कांदा आणि काढणीस आलेल्या कांद्यासह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे.
गेल्या एक-दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वार्यासह पाऊस झाल्याने शेतकर्यांची काढलेला कांदा झाकण्यासाठी चांगलीच धावपळ उडाली. त्यात वार्याचा वेग प्रचंड असल्याने कागदही दाद देत नव्हता. सध्या कांदा काढणीचा हंगाम चालू असल्याने शेतकरी कांदा काढून शेतातच साठवून ठेवत आहे. तर काही शेतकरी चाळीमध्ये साठवत आहे. मात्र, निसर्गाच्या प्रकोपाचा दिसत असून, अचानक वादळी वार्यासह पाऊस झाल्याने अनेक कांदा उत्पादक शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे बाजारभाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असतानाच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे.