ध्रुव ग्लोबल स्कूलचा सारंग भालके ‘सारेगमप’मध्ये! एक तपानंतर होणार्या गायन स्पर्धेच्या दुसर्या पर्वासाठी झाली निवड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लहान मुलांमधील प्रतिभांना योग्यवेळी व्यासपीठ मिळाले की त्यांच्यात दडलेल्या विविध गुणांचे दर्शन घडते. मनोरंजनाच्या क्षेत्रातील झी मराठी वाहिनीवर जेव्हा ‘सारेगमप’ ही पहिलीच गायन स्पर्धा घेण्यात आली होती, तेव्हा लहान वयातील मुलांच्या गायकीने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले होते. गायन स्पर्धेच्या त्या पहिल्या पर्वानंतर झी वाहिनीने बारा वर्षांनंतर पुन्हा सारेगमप स्पर्धेचे आयोजन केले असून त्यासाठी राज्यभरातून चौदा बालगायकांची निवड करण्यात आली आहे. अभिमास्पद गोष्ट म्हणजे संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सारंग सोपान भालके या विद्यार्थ्यानेही निवड प्रक्रीयेत बाजी मारुन या चौदा स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले असून गुरुवारपासून ही स्पर्धा सुरु होत आहे.

बारा वर्षांपूर्वी 2008 साली झी मराठी वाहिनीने सारेगमप ही गायनाची स्पर्धा आयोजित केली होती. राज्यभरातील प्रेक्षकांना आकर्षित करणार्या या स्पर्धेतून कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे पाच बालगायक समोर आले आणि त्यांनी आपल्या गायनाने अवघ्या राज्याला मंत्रमुग्ध केले. त्यानंतर तब्बल एक तपानंतर पुन्हा या स्पर्धेचे दुसरे पर्व उद्या गुरुवारपासून (ता.24) सुरु होत आहे. त्यासाठी झालेल्या पात्रता फेरीत राज्यभरातील शेकडों बाल गायकांनी सहभाग घेतला होता. त्यातील चौदा जणांची स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यात संगमनेरातील ध्रुव ग्लोबल स्कूलचा विद्यार्थी सारंग सोपान भालके याची निवड झाली आहे. सारंगचे वडील संगीत शिक्षक आहेत.

ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा कल विचारात घेवून त्यानुसार त्या विषयात त्यांना पारंगत करण्याचा प्रयत्न केला जातो. सारंग भालके या इयत्ता सहावीतील विद्यार्थ्याचे आई-वडील शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. वडील सोपान भालके ध्रुव ग्लोबलमध्ये संगीताचे शिक्षण देतात. त्यामुळे सारंगचा लहानपणापासूनचा कल गायकीत होता. त्यामुळे ध्रुव ग्लोबलमध्ये प्रवेश घेतल्यापासूनच शालेय व्यवस्थापनाने शिक्षणासह त्याच्या आवडीनुसार त्याला संगीताचेही शिक्षण दिले. घरातूनही त्याला याविषयी सतत मार्गदर्शन मिळाले. या स्पर्धेच्या पात्रता फेर्यांमध्ये त्याने आपला गायकीतून परिक्षकांनाही मोहात पाडले आणि राज्यभरातून निवडण्यात आलेल्या चौदा जणांमध्ये त्याने स्थान पटकाविले.

गुरुवारपासून (ता.24) ही स्पर्धा सुरु होणार असून गुरुवार ते शनिवार रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवरुन त्याचे प्रसारण केले जाणार आहेत. या स्पर्धेचे पहिले सत्र गाजविणारे वरील पाचही सारेगमप चॅम्पियन दुसर्या सत्रातील स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम बघणार आहेत. मराठी सिनेक्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या इयत्ता सहावीतील सारंग सोपान भालके याने आपल्या गायकीच्या बळावर सारेगमप सारख्या मोठ्या मंचावर प्रवेश मिळविल्याने स्कूलचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी त्याचे अभिनंदन केले असून घवघवीत यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

