सावरगाव तळमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील सावरगाव तळ येथे बिबट्याने हल्ला करून चार शेळ्या ठार केल्या आहेत. यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने ताबडतोब पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

सोमवारी (ता. 19) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शैलेंद्र लिंबाजी वाघमारे हे आपल्या शेळ्या भरत नेहे यांच्या मोकळ्या शेतात चरण्यासाठी बांधून ते शेजारीच टोमॅटोच्या शेतात काम करत होते. जवळच जंगल क्षेत्र आहे. तेथे चरणार्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार मारले. या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना समजताच त्यांनी वनपाल रामदास डोंगरे यांना कळविली. वनपाल डोंगरे यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला असून झालेल्या नुकसानीबद्दल वाघमारे यांना शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे याठिकाणी तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच वाघमारे यांचे कुटुंब हे मोलमजुरी व शेळीपालन व्यवसायावरच अवलंबून असल्याने त्यांना जास्तीत जास्त मदत करावी अशीही मागणी होत आहे.
