जिल्ह्यात पुरेसा साठा असतांनाही संगमनेरात रेमडेसिवीरचा कृत्रिम तुटवडा! काही औषध दुकानांच्या साखळीतून सामान्य रुग्णांची लुट सुरू झाल्याने संगमनेरात संताप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गंभीर अवस्थेत पोहोचलेल्या कोविड रुग्णांसाठी ‘संजीवनी’ ठरणार्‍या रेमडेसिवीर लसीचा संगमनेरात कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. औषध दुकानांच्या लुटीच्या साखळीतून हा प्रकार घडत असल्याचे प्रथमदशर्नी दिसून येत आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने सदरच्या लसीची किंमत 900 रुपयांपर्यंत खाली आणूनही केवळ छापील किंमतीच्या आधारावर संगमनेरात ही लुट सुरू आहे. काही औषध दुकानांसोबतच रुग्णालयांतंर्गत असलेल्या औषधालयांमध्येही असाच प्रकार सुरू असून शहरातील काही खासगी कोविड रुग्णालयांकडून रुग्णांना दुहेरी लुटण्याचेही प्रकार समोर येवू लागले आहेत.

जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढण्यासोबतच अपप्रवृत्तींही वाढीस लागल्या असून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून समोर आलेल्या रुग्णाला लुटण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. यासाखळीत यापूर्वी अनेक रुग्णालयांनी हात धुवून घेतलेले असताना आता त्यात जिल्ह्यातील अनेक औषधांच्या दुकानांनीही उडी घेतली आहे, त्यामुळे सामान्य कोविड बाधित रुग्णांची हेळसांड होवू लागली असून आपल्या रुग्णाला जगवण्यासाठी सामान्य कुटुंबातील बायाबापड्यांची अक्षरशः दमछाक होत असल्याचे दृष्यही दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने याबाबत गांभिर्याने विचार करुन रेमडेसिवीर लसीच्या छापील किंमतीतच बदल करण्याबाबत कारवाई करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांमधून समोर येवू लागली आहे.

यापूर्वीच्या संक्रमणातच काही रुग्णालये व औषधी दुकानांमधून अशी लुट सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सरकारने राज्यातील प्रत्येक शहरात शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीत रेमडेसिवीर लस उपलब्ध करुन देण्यासाठी काही औषधालयांना विशेष परवानगी दिली होती. संगमनेरातही बसस्थानकावरील एका मेडिकल दुकानात सवलतीच्या दरातील रेमडीसिवीर लस उपलब्ध आहे. मात्र कधीकधी येथे असणारी गर्दी, लशीची अनुपलब्धता किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती नसल्याचा फायदा घेत शहरातील काही औषध दुकानदारांनी सवलतीच्या दरात अवघ्या 900 ते 1200 रुपयांना मिळणारी ही लस थेट 1800 ते 4500 या दराने विक्री करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील काही औषध दुकानदार अवघ्या 10 टक्के नफ्यावर रेमडेसिवीर लस विकण्यास तयार आहेत, मात्र सहव्यावसायिकांच्या दबावामुळे त्यांचाही नाईलाज झाला आहे.

रुग्णाच्या नातेवाईकांकडून ऐच्छिक लुट करता यावी यासाठी रेमडेसिवीर लस उपलब्ध असलेल्या औषधालयांपैकी काहींनी परस्परांची साखळी तयार केली असून त्यांनी ठरविलेल्या वाढीव किंमतीच्या खाली सदरची लस न विकण्याचा अघोषीत करारच केला आहे. त्यानुसार सुरुवातीला रेमडेसिवीर घेण्यास आलेल्या ग्राहकांना लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. आपल्या रुग्णाच्या काळजीपोटी संबंधित नातेवाईक शहरातील आणखी चार औषधालये पालथी घालतो. मात्र सगळीकडे एकसारखेच उत्तर मिळते, अखेर दोन-चार तास गावातील बहुतेक औषधालये धुंडाळून झाल्यानंतर एखाद्या दुकानात ती लस उपलब्ध होते. मात्र तत्पूर्वी संबंधित ग्राहक त्यासाठी संपूर्ण गावात हेलपाटे मारुन आलेला असल्याने व साखळीतील अन्य दुकानदारांकडून ‘त्या’ ग्राहकाची संपूर्ण माहिती तो दुकानात येण्यापूर्वीच संबंधिताला मिळालेली असल्याने लस उपलब्ध असलेल्या औषधालयाचे फावते.

अशा दुकानात आलेल्या ‘त्या’ ग्राहकाला एकच डोस शिल्लक आहे, अथवा जिल्ह्यात, राज्यात लसीचा तुटवडा असल्याचे आभासी चित्र दाखवून त्याच्याकडून अव्वाच्यासव्वा दराने पैसे लुबाडले जात आहेत. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारीही दाखल होत आहेत. प्रत्यक्षात मात्र रेमडेसिवीर लशीवर 5 हजार 400 रुपये छापील किंमत आहे. कायद्यानुसार संबंधित दुकानदार जोपर्यंत छापील किंमतीपेक्षा अधिक पैसे घेत नाही तोपर्यंत त्याच्यावर कारवाई करता येत नाही. याच गोष्टीचा फायदा घेवून संगमनेरातील काही औषध दुकानदारांनी गोरगरीब व गरजू रुग्णांची लुट सुरू केली असून हा प्रकार म्हणजे ‘मड्याच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखा’ असल्याने संगमनेरातून संताप व्यक्त होवू लागला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने याबाबत प्रसिद्धी पत्रक काढून जिल्ह्यात रेमडेसिवीर लस आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ 2 हजार 419 रुग्णांना या लसीची आवश्यकता असून सध्या जिल्ह्यात 3 हजार 210 लसींचा साठा विक्रीसाठा उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे, त्याशिवाय जिल्ह्यात मेडिकल ऑक्सिजनचा साठाही मुबलक असून पाच पुरवठादार कंपन्यांकडून जिल्ह्यात सर्वत्र 24 मेट्रिक टनचा पुरवठा करण्यात आला असून सद्यस्थितीत 23 मेट्रिक टन ऑक्सिजन अतिरीक्त उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे.

कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यात रेमडेसिवीर लस व मेडिकल ऑक्सिजनचा पुरेसा साठा करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात आजच्या स्थितीत 2 हजार 419 रेमडीसिवीर लसींची गरज असताना प्रत्यक्षात 3 हजार 210 लस उपलब्ध असूनही काही औषध दुकानदारांकडून त्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करुन साखळीद्वारे काळाबाजार सुरू असून सामान्य कोविड रुग्णांची लुट केली जात आहे. याबाबतच्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी 70457 57882 किंवा 89756 24123 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Visits: 120 Today: 1 Total: 1106182

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *