अखेर ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार करणार्यांवर जिल्ह्यात ‘पहिलीच’ कारवाई! दैनिक नायकच्या वृत्तानंतर प्रशासनाचा भिंगारमध्ये छापा; डॉक्टर दाम्पत्यासह चौघांवर गुन्हा दाखल; दोघांना केले गजाआड..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यासह जिल्ह्यातील कोविड संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच एकीकडे रुग्णालयातील खाटा कमी पडत असताना आता कोविडवरील उपचारांमध्ये फायदेशीर ठरणार्या व गंभिर अवस्थेतील रुग्णांना एकप्रकारे संजीवनी ठरलेल्या रेमडेसिवीर लशीचा राज्यासह जिल्ह्यातही मोठा काळाबाजार सुरु आहे. मात्र यावर नियंत्रण असलेला ‘अन्न व औषध प्रशासन’ विभाग अजगराप्रमाणे सुस्त होवून बसला आहे. या गंभिर आणि चीड आणणार्या प्रकाराबाबत दैनिक नायकने सोमवारच्या अंकात या विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे करीत त्यांची लक्तरे उधडल्यानंतर आता त्यांना जाग आली असून आज पहाटे सहा वाजता भिंगार येथील डॉक्टर दाम्पत्यासह चौघांवर जिल्ह्यातील पहिली कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी काळाबाजार करणार्या दोघांनाही गजाआड करण्यात आले असून डॉक्टर दाम्पत्य मात्र पसार झाले आहे.
याबाबत भिंगार कॅम्प पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वतः औषध विक्रेता असलेला प्रसाद दत्तात्रय आलाट (वय 27, रा.भिंगार) याने रोहित अर्जुन पवार (वय 22, रा.साकत, जि.नगर) या दोघांनी भिंगार परिसरातीलच डॉ.किशोर दत्तात्रय म्हस्के व डॉ.कौसल्या किशोर म्हस्के या डॉक्टर दाम्पत्याशी संगनमत करुन त्यांच्याच रुग्णालयातील चैतन्य मेडिकल स्टोअर्समधून कोविड संक्रमित असल्याच्या अहवालाशिवाय व डॉक्टरांच्या कोणत्याही चिठ्ठीशिवाय बेकायदेशीरपणे ‘रेमडेसिवीर’ ही लस मिळवून 4 हजार 800 रुपये कमाल किंमत (एमआरपी) असलेली लस तब्बल 12 हजार रुपयांना विक्री करतांना आढळून आले. याबाबतची माहिती मिळताच इतक्या दिवस सामान्य रुग्णांच्या नातेवाईकांच्या टाहोकडे दुर्लक्ष करुन अजगराप्रमाणे सुस्त झोपलेल्या, नव्हे झोपेचे सोंग घेतलेल्या अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील पहिलीच कारवाई केली.
याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक जावेद हुसैन शेख यांनी आज पहाटे सहा वाजता भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन वरील चौघांवर भारतीय दंड संहितेचे कलम 420, 34 सह परिच्छेद 26 औषध नियंत्रण आदेश 2013 चे कलम 6 (3)(2)(सी), जीवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 7 (1)(ए)(2) तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 चे कलम 18 (सी) चे उल्लंघन व दंडनीय कलम 27 (बी)(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील प्रसाद अल्हाट व रोहित पवार या दोघांना पोलिसांनी आज सकाळी साडेसात वाजता अटक केली आहे. डॉक्टर दाम्पत्य मात्र अटकेच्या भितीने पसार झाले आहेत. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक देशमुख करीत आहेत.
गेल्या दिड महिन्यांपासून राज्यासह अहमदनगर जिल्ह्यातील कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर गंभिर अवस्थेतेतील कोविड रुग्णांना संजीवनी ठरलेल्या रेमडेसिवीर या लशीची मागणीही वाढली आहे. अचानक या लशीची मागणी वाढल्याने आत्तापर्यंत देवदूत म्हणून पाहिले गेलेले जिल्ह्यातील काही डॉक्टर आणि औषध विक्रेते यांच्या मनातील पैशांची लालसा जागी झाली आणि या दोन्हीच्या अभद्र युतीतून जीवन-मरणाशी संघर्ष सुरु असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या भावनांशी खेळ सुरु झाला. गेला महिनाभर हा प्रकार अगदी जोमात सुरु असूनही जिल्ह्यात केवळ नावालाच शिल्लक असलेल्या ‘अन्न व औषध प्रशसनाने’ त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळे जिल्ह्यातील रेमडेसिवीरच्या काळ्या बाजाराला या विभागाचाच अर्थपूर्ण आशीर्वाद असल्याचे आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून होवू लागला.
त्यानंतरही या विभागाच्या कामकाजात कोणताही बदल झाला नाही, त्यामुळे दिवसोंदिवस जिल्ह्यात रेमडेसिवीर लशीचा काळाबाजार फुलतच गेला आणि रुग्णांच्या नातेवाइईकांचा आक्रोशही वाढतच गेला. दैनिक नायकने याबाबत सोमवारच्या अंकातून जिल्ह्यातील रेमडेसिवीरच्या काळ्या बाजावर प्रकाश टाकण्यासह औषधांच्या पुरवठा व विक्रीवर थेट नियंत्रण असलेल्या ‘अन्न व औषध प्रशासनाची’ लक्तरे उधडीत या काळ्या बाजाराच्या गोरख धंद्यात या विभागाचा तर हात नाही ना अशी शंका उपस्थित करताच गेल्या दिड महिन्यापासून अजगर झोपेत असलेल्या या विभागाला जाग आली आणि जिल्ह्यात पहिल्यांदाच महामारीच्या काळातही लालची वृत्तीने मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणार्यांवर धडक कारवाई झाली. या कारवाईनंतर अनेकांनी दैनिक नायकच्या कार्यालयात फोन करुन आभारही मानले आहेत.