अतिक्रमणं धारकांवर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई! पोलिसांचा आक्रमक पवित्रा; पहिल्यांदाच दोघा फळविक्रेत्यांवर बडगा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वारंवार अतिक्रमणं हटाओ मोहीम राबवूनही संगमनेरच्या बेशिस्तीत बदल होत नसल्याने आता पालिके पाठोपाठ पोलिसांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी भारतीय दंडसंहितेचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात झाली असून सक्षम अधिकार्‍याने सक्त ताकीद दिल्यानंतरही रस्त्यावर व्यावसायिक हातगाड्या उभ्या करुन नागरिकांना उपद्रव पोहोचवणार्‍या दोघा फेरीविक्रेत्यांविरोधात मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कायद्यातील सदरची तरतूद न्यायालयात सिद्ध झाल्यास संबंधितांना सहा महिने कारावासाची शिक्षा होवू शकते. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार सूचना मिळूनही रस्ते अडवून व्यवसाय थाटणार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई मंगळवारी (ता.13) सकाळी 11 ते 11.30 वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी शिवाजीनगर परिसरात राहणार्‍या सुधीर लक्ष्मण आव्हाड (वय 40) याच्यावर पहिला गुन्हा दाखल करतांना भारतीय दंडसंहितेच्या 291 या कलमाचा वापर केला आहे. मंगळवारी जेव्हा शहर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालतांना विश्रामगृहाजवळ पोहोचले, त्यावेळी संबंधित इसम पुणे-नाशिक महामार्गावरच रस्त्यात आपल्या ताब्यातील हातगाडीवरुन आंबे विकत असल्याचे आढळून आले.


त्याची ही कृती सार्वजनिक वाहतुकीला अडथळा ठरण्यासह नागरिकांना उपद्रव पोहोचवणारा घातकी प्रकार असल्याचे दिसून आल्याने पोलीस कर्मचारी गणेश थोरात यांनी त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तर दुसरी कारवाई देखील याच परिसरात विश्रामगृहाच्या अगदीच प्रवेशद्वाराशेजारी करण्यात आली. महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्गही (फूट पाथ) बांधण्यात आले आहेत. याच फूट पाथवर ऋषीप्रसाद जालिंदर लहामगे (वय 23, रा.विद्यानगर) या तरुणाने आम्लेटची गाडी लावली होती. त्याच्याकडे येणारे ग्राहक आपल्या दुचाकी भर रस्त्यात उभ्या करुन त्याच्या गाडीवर जात असल्याने त्यातून पादाचारी मार्गासह रस्त्यावरील वाहनांनाही अडथळा निर्माण झाला होता.


या प्रकरणातही संबंधित आम्लेटच्या गाडीचालकावर वरीलप्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे संगमनेरात बिनधास्तपणे फळाच्या गाड्या घेवून फिरणार्‍या आणि कोठेही त्या उभ्या करुन नागरिकांच्या वावराला आणि सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या फेरीविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. संगमनेरच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच अतिक्रमण धारकांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 291 चा वापर केला गेला असून सरकारी पक्ष तो न्यायालयात सिद्ध करण्यात यशस्वी झाल्यास या दोघांनाही प्रत्येकी सहा महिने साधी कैद व दंडाची शिक्षा होवू शकते.


वास्तविक गेल्या महिन्यात 28 मे रोजी जोर्वेनाका येथे दोन धर्मात तणाव निर्माण करणारा प्रकार अतिक्रमणातूनच घडला होता. वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावरच अतिक्रमणं आणि त्या पुढ्यात ग्राहकांची वाहनं यामुळे येथील रस्ता जाम झाला होता. त्यात फसलेल्या एका वाहनचालकाने केवळ हॉर्न वाजवल्याने वाहनातील चौघांना बेदम मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकारही त्यावेळी घडला. त्यातून संपूर्ण तालुक्यात तणाव निर्माण झाल्याने पालिकेच्या पथकाने दुसर्‍याच दिवशी पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करीत या परिसरातील सर्व अतिक्रमणं हटविली. त्याचा धसका घेवून त्या दिवसापासून शहरातील जवळपास सगळ्या भागातील अतिक्रमण धारकांनी रस्त्यांवरुन पळ काढला असून गेल्या पंधरवड्यापासून शहरातील रस्ते मोकळे वाटू लागले आहेत.


‘त्या’ कारवाईला मोठा कालावधी लोटल्याचे समजून आता परत आपापल्या सरकारी मालकीच्या परंतु आपल्या हक्काच्या जागा अडविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पंधरा दिवस सुरळीत वाहणारी वाहतुक पुन्हा खोळंबू लागल्याने आता पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यासाठी वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करीत नागरिकांना उपद्रव पोहोचवणार्‍या घातकी वृत्तीं विरोधात थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. मंगळवारी शासकीय विश्रामगृहाजवळ त्याचा शुभारंभ करण्यात असून त्यात सातत्य राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून मिळाले आहेत. पालिके पाठोपाठ आता पोलिसांनीही कारवाईचा बडगा उगारल्याने संगमनेरकरांना हायसे झाले असून अशीच भूमिका यापुढे कायम ठेवण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.


शहरात गल्लोंगल्ली बोकाळलेल्या प्रचंड अतिक्रमणांमुळे वृद्ध, महिला, विद्यार्थी, मुली व छोट्या मुलांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यातच शहरात फेरीवाले, फळवाले, भाजीवाले, कपड्यावाले, खेळणीवाले अशा असंख्य व्यावसायिकांनी हातगाड्या घेवून चौकाचौकात जाम लावण्याचा चंग बांधल्याने पोलीस आता अशा प्रवृत्ती ठेचण्याच्या मूडमध्ये आले असून पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी नागरिकांना उपद्रव पोहोचवणार्‍या व सार्वजनिक वाहतुकीला अडथळे आणणार्‍या अतिक्रमण धारकांवर थेट गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर फौजदारी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.


संगमनेरात कशालाही राजकीय समर्थन मिळू शकते, तसे ते अतिक्रमणालाही प्राप्त आहे. त्यासोबतच अनेक ठिकाणी अशाच राजकीय व्यक्तिंच्या सामाजिक संस्थांची नावे वापरुन संघटनाही कार्यरत असून ‘अशा’ नावाचा वापर आजवर प्रशासनाला कारवाईपासून रोखणारा ठरत होता. मात्र आता पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचे हत्यार उपसल्याने शहरातील बेकायदा रिक्षा थांबे आणि त्यांचे मनमानी थांबणे यावरही पोलिसांनी गंभीर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *