बुडीताच्या शोधासाठी आलेली ‘एसडीआरएफ’ची टीमच बुडाली! अकोल्यातील सुगांवची घटना; एकाचा मृतदेह सापडला तिघे अद्यापही बेपत्ता..

नायक वृत्तसेवा, अकोले
बुधवारी उजनी धरणात बोट उलटून सहाजण बुडाल्याची घटना ताजी असतानाच आता अकोले तालुक्यातूनही अतिशय धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या घटनेत बुधवारी दुपारी सुगांव बुद्रुंक शिवारातील प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोघांमधील एकाचा शोध घेण्यासाठी मुंबईहून आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) बोट उलटून त्यावरील चौघा जवांनासह एकूण पाचजण पाण्यात पडले. त्यातील एकाला वाचवण्यात यश आले तर एकाचा मृतदेह हाती लागला आहे. उर्वरीत तिघे अद्यापही बेपत्ता असून स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेने संगमनेर व अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बुधवारी (ता.22) संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा व सिन्नर तालुक्यातील घोलवड येथील आठ ते दहा जण सुगांव बुद्रुक परिसरातील विनायक धुमाळ यांच्या शेतावर मक्याचा मुरघास करण्यासाठी आले होते. दुपारच्यावेळी प्रचंड उकाडा जाणवू लागल्याने दीडच्या सुमारास त्यातील काहीजण वनविभागाच्या नर्सरीजवळील प्रवरा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले. या ठिकाणी नदीपात्रात दगडी बंधारा घालण्यात आला आहे. नेमक्या त्याच ठिकाणी पोहोत असताना अर्जुन जेडगुले (वय 18, रा.पेमगिरी) व सागर जेडगुले (वय 25, रा.घोलवड, ता.सिन्नर) हे दोघेजण पाण्याचा अंदाज न आल्याने त्याच ठिकाणी बुडाले.

स्थानिकांच्या मदतीने शोधकार्यानंतर त्यातील सागर जेडगुले याचा मृतदेह हाती लागला, मात्र अंधार पडेपर्यंत अर्जुन जेडगुलेचा मात्र थांगपत्ता नसल्याने अकोले प्रशासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) मुंबई कार्यालयाशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. त्यानुसार आज पहाटे एनडीआरएफचे पथक सुगांवमध्ये पोहोचले व त्यांनी दिवस उजेडताच शोधकार्य सुरु केले. या पथकातील चौघांसह एका स्थानिकाला सोबत घेत हवेच्या बोटीवरुन बंधार्‍याजवळ शोध सुरु असताना अचानक बोट पलटली. त्यामुळे त्यावरील पाचहीजण पाण्यात पडले आणि काही क्षणात गायब झाले.

त्यातील एकाला पथकातील उर्वरीत जवानांनी स्थानिकांच्या मदतीने वाचवले तर एकाचा मृतदेह हाती लागल्याचे वृत्त आहे. उर्वरीत तिघे अद्यापही बेपत्ता असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. या घटनेने संगमनेर व अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे. दोन्ही तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सुगांवच्या नदीकाठावर तळ ठोकून आहे.

Visits: 34 Today: 1 Total: 113656

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *