वाळू तस्करीतून पोसलेले ‘भस्मासूर’ आता थेट तहसीलदारांच्या जिवावर! संगमनेर तालुक्यात धक्कादायक प्रकार; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त; ५० जणांवर गुन्हे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या नदीपात्रातील बेसुमार वाळूतस्करीतून पोसलेल्या गुंडांची मजल आता थेट तहसीलदारांच्या जिवावर उठण्यापर्यंत गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर खुद्द तहसीलदार धीरज मांजरे आपल्या पथकासह कारवाईसाठी निघाले होते. मात्र, कारवाईची चाहूल लागताच वाहनांसह पसार होणाऱ्या तस्करांपैकी तिघांनी महसूल पथकाच्या वाहनावरच वाळूने भरलेले वाहन घालण्याचा प्रयत्न केला. याच वाहनात तहसीलदार मांजरे स्वतः चालकाच्या शेजारी बसलेले होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला; मात्र महसूल पथकाच्या वाहनाचे नुकसान झाले. महसूल आणि पोलीस यंत्रणेतील काही घटकांच्या कथित आशीर्वादातून नदीपात्रांमध्ये पोसल्या गेलेल्या वाळूतस्करांच्या टोळ्यांचे आता भस्मासुरात रुपांतर होऊ लागले आहे. ज्यांच्या आशीर्वादाने हे तस्कर पोसले गेले, त्यांच्याच डोक्यावर हात ठेवण्याची वेळ त्यांनी आणली आहे. ही घटना केवळ एका अधिकाऱ्याच्या वाहनाला कट मारण्यापुरती मर्यादित नसून संगमनेरच्या प्रशासनासह स्थानिक राजकारण्यांनीही गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांचा गैरफायदा घेत प्रवरा नदीपात्रातून वाळूची बेसुमार लूट सुरु असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनंतर तहसीलदार धीरज मांजरे यांनी महसूल पथकांना मैदानात उतरविले. संगमनेर खुर्द, रहिमपूर आणि साकूर परिसरात झालेल्या या धडक कारवाईत चार स्वतंत्र गुन्हे दाखल झाले.

संगमनेर खुर्द येथील गंगामाई घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत तब्बल १८० ब्रास वाळूसाठा आढळला. अंदाजे पाच लाख ४० हजार रुपये किमतीच्या या साठ्यासह दोन जेसीबी ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात इरफान शेख, सैफ खान, अरबाज शेख, शहाबाज खान (चौघेही रा.नायकवाडपूरा), मोईन शेख, जावेद शेख (दोघे रा.जोर्वे नाका), सोहेल मनियार (रा.सय्यदबाबा चौक) व अकिल नझिरखान पठाण (रा.इस्लामपुरा) या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रहिमपूर येथे मात्र वाळूतस्करांची मुजोरीच उघड झाली. महसूल पथकाने वाळू वाहतूक करणारी वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला असता, तस्करांनी पथकाच्या वाहनावरच वाळूने भरलेले वाहन घालण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, याच वाहनात तहसीलदार धीरज मांजरे चालकाच्या शेजारी बसलेले होते. चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला; मात्र पथकाच्या वाहनाचे नुकसान झाले. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात सौरभ बन्सी गुळवे, विशाल नानासाहेब गुळवे आणि युवराज दिलीप वाळुंज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

रहिमपूर येथील उज्जर बंधाऱ्याजवळील नदीपात्रात तब्बल ३८० ते ४०० ब्रास वाळूचे अवैध उत्खनन झाल्याचे समोर आले. घटनास्थळी तीन पिकअप आणि एक ट्रॅक्टर आढळले; मात्र कारवाईची चाहूल लागताच संबंधितांनी वाहनांसह पलायन केले. या प्रकरणात सौरभ गुळवे, विशाल गुड्वेळ, दत्तात्रय शिंदे, अक्षय गुळवे, अमोल मोरे, सुनील पाटोळे आणि युवराज वाळुंज यांच्यासह २५ ते ३० अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकूर-मांडवे रस्त्यावरही अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला. याप्रकरणी अजहर रफीक पटेल आणि अमित रावसाहेब कांबळे यांच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अशाप्रकारे चार स्वतंत्र प्रकरणांत सुमारे ५० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, १२ वाहनांवर गुन्हे दाखल करत ११ लाख ९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.

संगमनेर तालुक्यातील पाचही नद्यांच्या पात्रातून अहोरात्र सुरु असलेली वाळूतस्करी नवीन नाही. या तस्करीतून आता ठिकठिकाणी गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या असून, नदीपात्रांच्या अक्षरशः वाटण्याही झाल्याची चर्चा आहे. एवढे सगळे उघडपणे सुरु असताना पोलीस आणि स्थानिक सजाचे तलाठी यांना त्याची खबर नसेल हे नवलच. त्यामुळे या तस्करीच्या मुळाशी जाण्याऐवजी केवळ वाहनांवर कारवाई करुन प्रशासनाची जबाबदारी संपणार नाही. कथित हप्तेखोरीच्या आरोपांचीही चौकशी झाली पाहिजे. हरामाच्या पैशातून पोसलेले आणि सत्तेच्या सावलीत मदमस्त झालेले हे वाळूतस्कर आता भस्मासुर बनून ज्यांच्या आशीर्वादाने वाढले, त्यांच्याच डोक्यावर हात ठेवण्यासाठी सरसावत आहेत. त्यांना वेळीच वेसण घातली नाही, तर संगमनेरच्या सामाजिक स्वास्थ्यालाही त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.

