‘हर घर तिरंगा’ची जनजागृतीसाठी युवकाची सायकल यात्रा अल्ताफ शेख करणार नेवासा फाटा ते अजमेरपर्यंतचा प्रवास

नायक वृत्तसेवा, नेवासा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नेवासा येथील मुस्लिम युवकाने गुरुवारी (ता.11) नेवासा फाटा ते अजमेर या एक हजार किलोमीटर सायकल यात्रेस प्रस्थान केले. ‘हर घर तिरंगा’चा अनोखा संदेश घेऊन निघालेल्या या युवकाचे मार्गावर ठिकठिकाणी स्वागत होत आहे.

नेवासा फाटा येथील अल्ताफ शेखने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा प्रचार करण्यासाठी सायकल यात्रेचा संकल्प वडील नजीर शेख व आई आयशा शेख यांना बोलून दाखविला. पत्नी हीना यांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. आज भल्या पहाटे हातात तिरंगा झेंडा घेऊन त्याने सायकलयात्रेस प्रारंभ केला. औरंगाबाद, कन्नडमार्गे त्याने दुपारपर्यंत चाळीसगाव गाठले. रोज दोनशे किलोमीटर प्रवास करून तो पाच दिवसांत एक हजार किलोमीटरचा अजमेर टप्पा पूर्ण करणार आहे.

ओम साई सायकलिंग मंडळाचा सदस्य असलेल्या अल्ताफने यापूर्वी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ यूनिटी, पंढरपूर, शिवनेरी किल्ला, वणी यात्रा सायकलवरून केली आहे. जगाच्या पाठीवर आपल्या देशाचे नाव अधिक उज्ज्वल करण्यासाठी जातीय सलोखा वृद्धिंगत होणे आवश्यक आहे. व्यसनांचे वाढलेले प्रमाण व व्यायामाकडील दुर्लक्षाने आरोग्याची समस्या वाढत आहे. निरोगी आणि फिट राहण्यासाठी सायकलिंग खूप महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. रोज पहाटे पाच वाजता सायकलप्रवास सुरू करतो. मोठ्या गावात ‘हर घर तिरंगा’बाबत प्रबोधन करतो. रोज चौदा तासांत दोनशे किलोमीटर प्रवास करत, पाच दिवसांत एक हजार किलोमीटरचा टप्पा पूर्ण करणार असल्याचा निर्धारही त्याने व्यक्त केला आहे.

Visits: 134 Today: 1 Total: 1103376

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *