शारदा नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेश लाहोटी! नूतन पदाधिकार्यांच्या निवडी; उपाध्यक्षपदी रोहित मणियार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या शारदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते या निवडी जाहीर करण्यात आल्या असून आगामी आर्थिक वर्षासाठी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा राजेश लाहोटी यांच्यावर तर उपाध्यक्षपदाची जबाबदारी रोहित मणियार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. संस्थापकांनी पतसंस्थेला आर्थिक शिस्त लावून प्रगतीची झेप घेतली आहे, त्यांच्याच पदचिन्हावर यापुढेही कार्यरत राहणार असल्याची भावना यावेळी नूतन पदाधिकार्यांनी व्यक्त केली.

संगमनेरातील छोट्या व्यापार्यांसाठी अर्थवाहिनी ठरलेल्या शारदा पतसंस्थेत 31 मार्चअखेर 168 कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. चालू आर्थिक वर्षात संस्थेतील ठेवींचा टप्पा दोनशे कोटींच्या पार नेण्याचा संकल्पही यावेळी नूतन पदाधिकार्यांसह संचालक मंडळाने केला. व्यापार्यांचे हित जोपासणार्या शारदा पतसंस्थेने कोविड संक्रमणाच्या कालावधीतही पथदर्शी काम केले. संक्रमणातून सावरणार्या छोट्या आणि प्रामाणिक व्यापार्यांना संस्थेने 128 कोटी 55 लाखांचे कर्ज देवून पाठबळ देण्याचेही काम केले आहे.
नूतन पदाधिकार्यांच्या निवडी प्रसंगी बोलताना संस्थेचे मार्गदर्शक संचालक गिरीश मालपाणी यांनी संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांना अधिकाधिक गतीमान आणि चांगल्या सेवा देण्यासाठी संस्थेने मागील कालावधीत राबविलेल्या विविध योजना व प्रकल्पांचा सारांहशी त्यांनी यावेळी मांडला. व्यापार्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे या हेतूने संस्थापकांनी शारदा पतसंस्थेची स्थापना केली असून त्यांच्याच मार्गावर विद्यमान संचालक मंडळ कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना नूतन अध्यक्ष राजेश लाहोटी व उपाध्यक्ष रोहित मणियार यांनी संचालक मंडळाने विश्वास दाखविल्याबद्दल आभार व्यक्त केले. प्रामाणिक कर्जदार आणि समर्पित संचालक मंडळ या संस्थेच्या धोरणानुसार आपण काम करणार आहोत. संस्थेच्या प्रगतीसोबतच ग्राहकांना अधिक दर्जेदार आणि आधुनिक सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उभयंतांनी यावेळी दिली. या निवडी प्रसंगी सुवर्णा मालपाणी, उद्योजक मनीष मालपाणी, सीए कैलास सोमाणी, राणीप्रसाद मुंदडा, प्रकाश राठी, दीपक मणियार यांच्यासह संस्थेचे सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
