पठारभागातील माहुलीघाटात भीषण अपघात! तिनशे फूट खोल दरीत कार कोसळली; सुप्याच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नूतनीकरणानंतर वाहनांचा वेग वाढलेल्या पठारभागातील माहुली घाटात पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा बळी गेला. आज सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर घारगाव पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने खाली उतरुन ठार झालेल्या तरुणाचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. अपघातात चेंदामेंदा झालेल्या अलिशान कारमधील एअरबॅग्जही उघडल्या गेल्या होत्या, मात्र दुर्दैवाने घाटातील वळणरस्ता आणि तीव्र उतार यामुळे वेगात असलेल्या कारने संरक्षक कठड्यांना धडक देत सुमारे तिनशे फूट खोल कोसळताना अनेक पलट्या खाल्ल्याने त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात घडल्याची शक्यता असून आज (ता.17) सकाळी आठ वाजता स्थानिकांनी घटनास्थळी जावून पाहिल्यानंतर ही घटना समोर आली.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार आज (ता.17) पहाटे चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास माहुली गावातील काहींना मोठ्याने काहितरी धडकल्याचा आवाज आला होता. मात्र पहाटेचा अंधार आणि त्यात सध्या बिबट्यांची दहशत यामुळे कोणीही घाटात जाण्यास धजावले नाही. त्यातील काहींनी सकाळी साडेसात-आठच्या सुमारास रात्रीच्या आवाजाचा वेध घेत घाटात जावून पाहीले असता पुण्याकडे जाणार्या लेनवरील वळणावर संरक्षक कठडा तोडून खोल दरीत एक कार कोसळलेली दिसून आली. हीच घटना पहाटे घडल्याचे लक्षात आल्यानंतर माहुलीतील गावकर्यांनी घारगाव पोलिसांशी संपर्क साधून त्यांना अपघाताची माहिती दिली.

फौजफाट्यासह तासाभरात घटनास्थळी पोहोचलेल्या घारगाव पोलिसांनी दोराच्या सहाय्याने स्थानिकांच्या मदतीने सुमारे तिनशे फूट खोल असलेल्या दरीत उतरुन अपघातग्रस्त वाहन गाठले. उंचावरुन असंख्य पलट्या मारीत वॅक्सवॅगन कंपनीची ही अलिशान कार खोलदरीत कोसळल्याने कारचा अक्षरचा चेंदामेंदा झाला होता. धडक झाल्यानंतर कारमधील एअरबॅग्जही उघडल्या गेल्या, मात्र दुर्दैवाने त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कारमध्ये वाहनचालकाच्या जागेवर आढळलेल्या मयत तरुणाच्या खिशातून सापडलेल्या ओळखपत्रावरुन अक्षयकुमार सहादू वडवणे (रा.सुपा, ता.पारनेर) असे त्याचे नाव असल्याचे व तो गोरेगांवच्या (मुंबई) ग्रीनप्लाय इंडस्ट्रिजमध्ये सेवेत असल्याचा उल्लेख असलेले ओळखपत्र सापडले.

त्यावरुन पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क केला असून उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या दुर्दैवी घटनेत एका चांगल्या कंपनीत कार्यरत असलेल्या तरुणाचा करुण अंत झाल्याने माहुलीकरांनी हळहळ व्यक्त केली. कदाचित तो सुप्याहून मुंबईला निघाला असावा असा अंदाज आहे, पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान त्याला डूलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून सदरचा अपघात घडला असण्याची शक्यता आहे. उत्तरीय तपासणी आणि कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर दुपारी मयत तरुणाचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आला.

