जागतिक व्यासपीठावर संगमनेरचा सन्मान! प्राचार्य डॉ.गायकवाड यांचा सिंगापूर परिषदेत सहभाग

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी नुकताच सिंगापूर येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत तज्ञ मार्गदर्शक म्हणून उल्लेखनीय सहभाग नोंदवला.
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर तर्फे आयोजित या परिषदेत त्यांनी ‘बॅलन्सिंग बाईट्स अँड कार्बन: एनव्हायरनमेंटल अकाऊंटिंग प्रॅक्टिसेस ऑफ आय.टी जायंट्स इन इंडियाज लॅंडस्केप’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. या शैक्षणिक परिषदेत जगभरातील शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला होता. प्राचार्य डॉ. गायकवाड यांच्या सर्जनशील विचारसरणीमुळे व संशोधनातील सातत्यामुळे संगमनेर महाविद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहे.

डॉ. गायकवाड हे शिक्षण व संशोधन क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व असून त्यांना राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समित्यांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे शोधनिबंध देश-विदेशातील प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले असून त्यांच्या नावावर दोन पेटंटही आहे.महाविद्यालयाला मिळालेल्या स्वायत्त दर्जा अंमलबजावणीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्नशील राहून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने संगमनेर महाविद्यालयाची ‘अहमदनगर जिल्ह्याचे नोडल महाविद्यालय’ म्हणून निवड केली आहे.जागतिक पातळीवरील या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, खजिनदार राजकुमार गांधी, जनरल सेक्रेटरी सीए नारायण कलंत्री व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Visits: 129 Today: 3 Total: 1107011
