अकलापूरच्या नवनिर्वाचित सरपंचावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा! घटनेनंतर चार दिवसांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्याने खळबळ
नायक वृत्तसेवा, घारगाव
रस्त्याने जात असताना कोणतेही कारण नसताना आपल्या मोटारसायकलला कार आडवी घालून फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याच्या तक्रारीवरुन अकलापूरचे नवनिर्वाचित सरपंच अरुण वाघ यांच्यासह चौघांवर भारतीय दंड विधानच्या विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर या प्रकरणाच्या फिर्यादीसह अन्य चौघांवर चाकूचा धाक दाखवून सोनसाखळीसह रोख 25 हजारांची रक्कम लुटल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकलापूर शिवारातील पत्र्याचीवाडी परिसरात राहणार्या सचिन ठका खंडागळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गेल्या गुरुवारी (ता.11) ते स्वतः आणि त्यांचे चुलते आपल्या दुचाकीवरुन घराकडे जात असताना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी हर्षद शांताराम वाघ, आदेश तबाजी वाघ, सनी शंकर वाघ व अरुण तुळशीराम वाघ (सरपंच) यांनी त्यांच्या दुचाकीला आपली कार आडवी घातली. यावेळी वरील इसमांनी कोणतेही कारण नसताना आपणास जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली अशा आशयाची तक्रार फिर्यादीने घटनेनंतर चार दिवसांनी घारगाव पोलीस ठाण्यात केली. त्यानुसार पोलिसांनी वरील चौघांविरोधात भा.दं.वि. कलम 341, 323, 504, 506 सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(1)(आर)(एस)3(2)(5 ए) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने करीत आहेत.
तर शंकर तुळशीराम वाघ (रा.येलखोपवाडी) यांनीही घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार रविवारी (ता.14) रात्री नऊच्या सुमारास महादू सुखदेव खंडागळे, निर्मला महादू खंडागळे, सचिन ठका खंडागळे, ठका इंदू खंडागळे व वनिता ठका खंडागळे यांनी फिर्यादीस रस्त्यात अडवून त्यांना चाकू व सुर्याचा धाक दाखवित लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील 75 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी व 25 हजार रुपयांची रोकड लुबाडल्याचा आरोप केला. त्यानुसार घारगाव पोलिसांनी वरील सर्वांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपास घारगावचे उपनिरीक्षक राऊत यांच्याकडे देण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरांनी पठारावरील वातावरण ढवळून निघाले असून विविध चर्चांना उधाण आले आहे.
अकलापूरचे नवनिर्वाचित सरपंच व त्यांच्या कुटुंबियांवर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने करीत आहेत. या प्रकरणातील सत्यता पडताळीत असल्याची माहिती त्यांनी दैनिक नायकशी बोलताना दिली. या प्रकरणाने पठारावरील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. चौकशीअंती काय समोर येते याबाबत पठारासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष्य या प्रकरणाकडे वेधले गेले आहे.