नाना पटोलेंच्या काळात काँग्रेस पक्षाची वारंवार नाचक्की! माजी आमदाराचा घणाघात; महाविकास आघाडी एकसंघ असल्याचे चित्र खोटे..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
माजी युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीने काँग्रेसला नामुष्कीचा सामना करावा लागला. मात्र या सर्व घडामोडींना प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेच जबाबदार आहेत. त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासूनच राज्यातील काँग्रेसची वाताहत सुरु झाली आहे. वर्षभरापूर्वी नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीतही उमेदवारीवरुन त्यांनी घोळ घातल्याचे सांगत काँग्रेसचे माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. कधीकाळी राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेस पक्षाची आजची अवस्था दयनीय असल्याचे सांगत शिंदे गटामुळे पक्ष आता पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. आपल्या या पत्राची पक्षाने गांभिर्याने दखल घ्यावी असे आवाहनही देशमुख यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पाठविलेल्या पत्रातून केले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून पक्षाचे तिकीट मागणार्‍या सत्यजीत तांबे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली, तर त्यांचे पिता व विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर करुनही त्यांनी आपला अर्ज दाखल केला नाही. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना तेराव्या विधानसभेचे सदस्य असलेल्या माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी सक्षम नेतृत्त्वाच्या अभावाने कधीकाळी राज्यात पहिल्या क्रमांवर असलेल्या काँग्रेसची गेल्या दोन वर्षात मोठी पीछेहाट झाल्याचे सांगत राज्याला सक्षम नेतृत्त्व देवून युवक संघटना अधिक बळकट करण्यासाठी पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविलेले त्यांचे पत्र मंगळवारी सोशल माध्यमात व्हायरल झाले आहे. त्यातून महाविकास आघाडीतही सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.

‘महाराष्ट्रातील काँग्रेसची परिस्थिती चिंताजनक – प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज’ अशा विषयान्वये त्यांनी लिहिलेल्या या पत्रात विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेसची झालेली पीछेहाट त्यांनी विविध दाखल्यांसह नमूद केली आहे. एकेकाळी देशातील एक प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसची आपल्या नेतृत्त्वाखाली प्रगती होईल अशा ओळींनी या पत्राला सुरुवात करण्यात आली असून हाच राष्ट्रीय पक्ष आज आपल्या अस्तित्वासाठी धडपडतोय असेही त्यात म्हंटले आहे. शेतकरी, कामगार, आदिवासी, युवावर्ग, शोषीत, पीडित, वंचित व मागासवर्गीयांचे प्रश्न हाताळणे तसेच, संघटनात्मक काम करुन इतर मागासवर्गीय (ओबीसी), महिलांवरील अत्याचार आणि जनहितार्थ मुद्द्यांवर मार्ग काढण्यासाठी फेब्रुवारी 2021 मध्ये मोठ्या विश्वासाने पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्राची धुरा नाना पटोले यांच्यावर सोपविली.


पण, गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी पक्षाचा विश्वास फोल ठरवला आहे. कधीकाळी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या कार्यशैलीमुळे तो आता काँग्रेसच्या हातातून सुटला आहे. सध्या राज्यातील पाच ठिकाणी शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे सुपुत्र सत्यजीत तांबे यांनी दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारीवरुनही त्यांनी आपल्या पक्षाचे कान टोचले आहेत. तांबे यांची अपक्ष उमेदवारी नाना पटोले यांच्यामुळेच दाखल झाली असून या नामुष्कीला सर्वस्वी तेच जबाबदार असल्याची घणाघाती टीकाही देशमुख यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काँग्रेसला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष करु अशी त्यांची घोषणा कधीच हवेत विरली आहे. खरेतर त्यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे गेल्यापासूनच पक्षाची राज्यातून पीछेहाट सुरु आहे. डिसेंबर 2021 मध्ये विधान परिषदेच्या नागपूर जागेसाठी रवींद्र भोयर प्रबळ उमेदवार होते. पण मतदानाच्या काही तास अगोदरपर्यंत विविध नाट्यमय घडामोडी घडवित अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली गेली. त्याचा परिणाम भाजपा उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. जून 2022 मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीतही चंद्रकांत हंडोरे काँग्रेसचे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार होते. मात्र काँग्रेसच्याच भाई जगताप यांना अधिकची मते मिळाल्याने हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता याकडेही त्यांनी या पत्रातून राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षांचे लक्ष्य वेधले आहे.

गेल्या 4 जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासमत ठरावावेळीविरोधी गटाची एकजूट आवश्यक असतानाही काँग्रेसचे तब्बल दहा आमदार बहुमत चाचणीच्या वेळी सभागृहात अनुपस्थित होते. याचा फायदा सरकारचे बहुमत सिद्ध होण्यात झाले. बहुमत चाचणीच्या बाबतीत पक्षाकडून स्पष्ट निर्देश असतानाही अनेकांनी पक्षाच्या विरोधात काम केले. या तीनही प्रकरणांची आपण सखोल चौकशी करु असे आश्वासन देवूनही त्यांनी आजवर कधीही कारवाई केली नसल्याचेही डॉ. देशमुख यांनी पत्रात म्हंटले आहे. सध्या राज्यातील काँग्रेस चोहोबाजूंनी तोंडघशी पडली आहे. सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडी एकसंघ असल्याचे खोटे चित्र राज्यात निर्माण केले गेले.

सत्यजीत तांबसारख्या तरुण उमेदवारांना भाजपाने पाठींबा देवून राज्यातील पाचही जागा पटकाविल्यास विधान परिषदेत सभापतीपदाचा तिढा निर्माण होईल असा इशारा देतांना राज्यातील पक्ष आज पाचव्या क्रमांकावर फेकला गेल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पक्षात शिस्त उरलेली नाही, मुळात पक्षाच्या विचारधारेवर नेत्यांच्याच मनात आदर उरलेला नाही. ज्या काँग्रेसची पाळेमुळे शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत रोवली गेली आहे त्या पक्षाकडे आज कार्यकर्त्यांची वाणवा आहे. पक्षातंर्गत गटबाजी हा देखील यक्षप्रश्न पक्षासमोर उभा आहे. या सर्व गोष्टींचा राष्ट्रीय पातळीवर विचार होवून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची धुरा सक्षम नेत्याकडे देण्याची गरज असल्याचे सांगत या पत्राचा गांभिर्याने विचार करण्याची विनंतीही त्यांनी शेवटी केली आहे. त्यांच्या या पत्रावर काँग्रेसचे शीर्ष नेतृत्त्व काय कारवाई करते याकडे आता राज्याचे लक्ष्य लागले आहे.

अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून पाठींबा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीतून महाविकास आघाडी एकसंघ राहते की त्यात बेबनाव निर्माण होतो याकडे राज्याचे लक्ष्य लागले आहे. शिवसेनेने यापूर्वीच शुभांगी पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्याच नाशिकमधील माजी मंत्र्याने पाटील यांच्या नावाला विरोध करीत सुभाष जंगम यांना पाठींबा देण्याची मागणी केली आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस तांबे यांना समर्थन देण्याची दाट शक्यता असून असे घडल्यास राज्यातील महाविकास आघाडीचे सूत्र संपुष्टात येण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.

Visits: 18 Today: 1 Total: 116797

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *