प्रवरा उद्योग समूहामध्ये कोरोना चाचणी उपक्रमास प्रारंभ
प्रवरा उद्योग समूहामध्ये कोरोना चाचणी उपक्रमास प्रारंभ
नायक वृत्तसेवा, राहाता
कोरोना नियंत्रणासाठी माजी मंत्री तथा भाजप नेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा उद्योग समूहाच्यावतीने आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. आगामी गळीत हंगामाची होणारी सुरूवात लक्षात घेवून पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातील कर्मचार्यांची कोरोना स्त्राव चाचणी करण्याच्या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या सहकार्याने या चाचण्या करण्यात येणार आहेत. प्रवरानगर येथे कारखाना कार्यस्थळावरील रुग्णालयात या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. अवघ्या काही दिवसांत सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सुरूवात होणार आहे. कारखाना व्यवस्थापनाकडून गळीत हंगामाचे पुर्व नियोजन सध्या सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून डॉ.विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राधाकृष्ण विखे यांनी साखर कारखान्यातील कर्मचार्यांची कोरोना चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटाच्या काळात विखे परिवाराने सामाजिक बांधिलकी ठेवून आरोग्याचे विविध उपक्रम राबवून जागृकता निर्माण केली आहे. गळीत हंगाम सुरू होणार असल्याने कारखान्यातील कामगारांच्या आरोग्याबाबत त्यांना स्वतःला आणि व्यवस्थापनाला माहिती असावी या उद्देशाने हा उपक्रम घेतला असल्याचे आमदार विखे यांनी सांगितले. खासदार डॉ.सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.विखे पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांची टिम यासाठी नेमण्यात आली आहे. रोज 250 ते 300 कामगारांची चाचणी घेतली जाणार असून येणार्या अहवालानुसार कामगारांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

