पंधरा दिवसांचा कडक ‘लॉकडाऊन’ आवश्यकच : ना.बाळासाहेब थोरात संक्रमणाची गती वाढूनही नागरिकांना कोविडची दाहकता समजत नसल्याचे चित्र..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रुग्णालयांमध्ये खाटा नाहीत, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत नाही, रेमडेसिवीरसह अन्य काही औषधांची साठेबाजी सुरु असल्याने त्याचाही पुरवठा कमी आहे. यातून नागरिकांच्या जीवाला अपाय होवू नये म्हणून इच्छा नसतांनाही राज्य सरकारने पंधरा दिवसांसाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. मात्र इतक्या भयानक स्थितीतही नागरिकांना कोविड संक्रमणाचे गांभीर्यच समजत नसल्याने गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या ‘निर्बंधां’चा कोविड संक्रमणाच्या गतीवर कोणताही परिणाम होणार नसल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही जीव वाचवण्यासाठी ‘कडक लॉकडाऊन’ आवश्यक असल्याचे म्हटले आहे, मात्र त्यासाठी जनतेनेच पुढाकार घेण्याचीही अपेक्षा वर्तविली आहे. अशा स्थितीत संगमनेरच्या व्यापारी असोसिएशनने दिवसाआडचा निर्णय रद्द करुन 1 मे पर्यंत सरसकट दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा कठोर निर्बंधांनंतरही पुन्हा लॉकडाऊनचा सामना करावा लागणार हे निश्चित आहे.

राज्यात कोविड संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. दररोज मोठ्या प्रमाणात समोर येणारी रुग्णसंख्या, आणि मृतांचे आकडे कोविडची दाहकता स्पष्ट करीत आहे. राज्यातील बहुतेक सर्वच जिल्ह्यात एकसारखी स्थिती असल्याने कोविड उपचार करणार्‍या रुग्णालयांमध्ये बाधितांची अक्षरशः गर्दी दाटल्याचे विदारक दृष्य बघायला मिळत आहे. दररोज ठिकठिकाणांहून ऑक्सिजन न मिळाल्याने, रेमडेसिवीरची लस न मिळाल्याने अथवा रुग्णालयात जागा उपलब्ध न झाल्याने रुग्ण दगावल्याच्या वार्ता मानवी मन सुन्न करीत आहेत. रविवारी एकट्या नगर जिल्ह्यात कोविडच्या संक्रमणाने जीव गमावणार्‍यांची एका दिवसातील रुग्णसंख्या 102 इतकी प्रचंड आहे. असे असतांनाही नागरिकांना अजूनही कोविडचे गांभीर्य कळत नसल्याने प्रशासनाच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे.

सध्या राज्यासह जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू आहेत. रविवारपासून अत्यावश्यक सेवेतील दुकानांना केवळ सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली. याशिवाय भाजीपाला आणि फळविक्रेत्यांना एकाच जागी बसून विक्री करण्यास मनाई करतांना त्यांना घरोघरी जावून भाजी विक्री करण्याची मुभा देण्यात आली. मात्र या नियमांचे दुकानदारांकडून पालन होत नसल्याचे वास्तवही समोर येत आहे. अनेक दुकानदार शटर खाली ओढून आपले व्यवसाय करण्यात मश्गुल आहेत, तर भाजी आणि फळ विक्रेत्यांना नवीन नियमांविषयी काहीच घेणेदेणे नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे कोविडचे चांगलेच फावले असून निर्बंधांतही त्याच्या प्रसाराचा वेग वाढताच आहे.

अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास सर्वच नागरिकांना मज्जाव आहे. मात्र अनेक महाभाग फिरण्याची आपली हौस भागवण्यासाठी पोलिसांना वेगवेगळी खोटी कारणे सांगून, जून्या औषध व गोळ्यांची वेष्टने दाखवून, पिशवीत घरातूनच एखादी भाजी अथवा किराणा सामान घेवून गावभर फिरत आहेत. त्यामुळे कठोर निर्बंधांची अंमलबजावणी होत नसल्याने कोविडचा मुक्त संचारही सुरुच आहे. त्याचा परिणाम रविवारी संगमनेर तालुक्यात समोर आलेली उच्चांकी रुग्णसंख्या आणि कालपर्यंत आपल्यात वावरणार्‍या मित्रांच्या निधनाच्या वेदनादायी वार्ताही ऐकाव्या लागल्या आहेत. रविवारच्या एकाच दिवसांत संपूर्ण जिल्ह्यातील 102 जणांचे बळीही गेले आहेत. मात्र तरीही नागरिक कोविडला गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत.

कोविडचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी पोलिसांनी शहरात जागोजागी तपासणी नाके सुरु केले आहेत. त्याद्वारे विनाकारण फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. गेल्या चार दिवसांत पोलिसांनी तीनशेहून अधिक जणांवर कारवाई करीत दीड लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे, तरीही रस्त्यावर फिरणार्‍यांच्या संख्येत घट होत नसल्याने कोविडबाबत चिंताजनक वातावरण तयार झाले आहे. आपल्याला संसर्ग झाल्यास रुग्णालयात जागाही मिळणार नाही हे माहिती असूनही केवळ हौसेखातर हुल्लडपणा करणार्‍यांमुळे संपूर्ण शहराचेच आरोग्य धोक्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वी लॉकडाऊनचा अनुभव आपण सर्वांनी घेतला आहे, त्याचे फायदे आणि तोटेही आपल्याला माहिती आहेत. मात्र कडक लॉकडाऊनने जर लोकांचे जीव वाचणार असतील तर आपल्याला पंधरा दिवसांचा कठीण काळ सोसावाच लागणार आहे. कदाचित या कालावधीत कोणाही अर्धपोटी रहावे लागेल, घरात असेल त्यातच भागवावे लागेल, घराबाहेर पडता येणार नाही. पण जर त्यातून आपण सुरक्षित राहणार असू, आपला जीव वाचणार असला तर अशा निर्णयांना नागरिकांनी स्विकारण्याची गरज आहे. सरकारने दंडुके घ्यावे, मग लॉकडाऊनची अंमलबजावणी व्हावी अशी शासनाची इच्छा नाही, त्यासाठी जनतेची स्वयंस्फूर्ती खूप आवश्यक असल्याचे त्यांचे ठाम मत आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करुन, सध्या सुरु असलेल्या संक्रमणाचा वेग, रुग्णालयांची अवस्था आणि आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर सारख्या औषधांची कमतरता लक्षात घेता ‘सर सलामत तो पगडी पचास’ या उक्तीप्रमाणे व्यापार्‍यांनी थोडे आर्थिक नुकसान सहन करुन आपले, आपल्या कुटुंबियांचे, मित्रांचे व नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी पुढाकार घेण्याची आणि किमान पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्याची गरज आहे. अन्यथा संक्रमणाचा हा वेग असाच कायम राहील आणि त्यात आपल्याच आजुबाजूचे, आपले स्नेही अदृष्य होतील इतकी भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. यासर्व गोष्टींचा प्रत्येक नागरिकाने गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.

माणसं जगली तरच व्यापार आहे. आजच्या स्थितीत कोविडने अक्षरशः उच्छाद मांडला असून रोज उच्चांकी रुग्णवाढीसह कोविडने मृत्यू होणार्‍यांची संख्याही मोठी आहे. रविवारी एकट्या अहमदनगर जिल्ह्यात 102 जणांचे जीव गेले आहेत. असे असतांनाही नागरिक अजूनही कोविड विषयी गंभिर नसल्याचेच चित्र दिसत आहे. यासाठी स्वयंस्फूर्तीने निर्णय होण्याची गरज असून संगमनेरच्या व्यापार्‍यांची शिखर संस्था असलेल्या व्यापारी असोसिएशनने किमान पंधरा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन घेण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. व्यापार, व्यवहार आणि पैसा यापेक्षा माणुसकी उच्च असते आणि ती जगली तरच या गोष्टी राहणार आहेत याचा शून्य होवून विचार करण्याची आणि योग्यवेळी निर्णय घेण्याची आज आवश्यकता आहे. अन्यथा आज हा गेला, उद्या तो गेला अशा वेदानादायी वार्ता सुरुच राहतील इतकी आजची स्थिती भयानक झाली आहे.

Visits: 138 Today: 2 Total: 1103049

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *