शिर्डी शिवसेनेकडून गांधीगिरी; नगराध्यक्षांच्या खुर्चीला घातला हार

शिर्डी शिवसेनेकडून गांधीगिरी; नगराध्यक्षांच्या खुर्चीला घातला हार
नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी नगरपंचायतीने ऐन कोरोनाच्या संकटात व्यावसायिक, रहिवासी यांना वाढीव पाणीपट्टी आकारली आहे. तसेच घरपट्टी वसुली सुरू केली असून ही त्वरीत वाढीव पाणीपट्टी व घरपट्टी रद्द करावी; यासाठी एक निवेदन शिर्डी शहर शिवसेनेच्यावतीने बुधवारी (ता.2) नगराध्यक्षा अर्चना कोते यांना देण्यात येणार होते. परंतु शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते नगरपंचायतमध्ये गेल्यानंतर नगराध्यक्षा येथे नव्हत्या. त्यांना निवेदन स्वीकारण्यासाठी बोलविण्यात आले; मात्र नगराध्यक्षा निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयात आल्याच नाहीत. त्यामुळे पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या खुर्चीला हार घालत निवेदन चिकटवून जाहीर निषेध केला.


कोरोनामुळे गेल्या साडेपाच महिन्यांपासून श्री साई मंदीर बंद आहे. तसेच येथे साईभक्त येणे बंद असल्यामुळे शिर्डी शहरातील सर्व दुकाने, व्यवसाय, रोजीरोटी सर्वकाही बंद असून आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना नगरपंचायतीने पाणीपट्टीमध्ये मोठी वाढ केली आहे. पाणीपट्टी व घरपट्टीच्या पावत्या रहिवाशांना पाठवून वसुलीची मोहीम सुरू केली आहे. जर वेळेत वसुली झाली नाही तर व्याजासह वसूल करण्याचे फर्मान सोडले असल्यामुळे शिर्डी शिवसेनेच्यावतीने नगरपंचायतला निवेदन दिले. घरगुती पाणीपट्टीमध्ये पंधराशे रुपयांवरुन दोन हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. तसेच व्यापारी पाणीपट्टीमध्ये पंधराशे रुपयांवरून थेट दहा हजार रुपये वाढ केली आहे; ही वाढ म्हणजे मोगलांसारखा जिझिया कर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. येत्या आठ दिवसांत उचित निर्णय घेतला नाही तर धडक आंदोलन केले जाईल, असा इशारा कमलाकर कोते, तालुकाप्रमुख संजय शिंदे, शहरप्रमुख सचिन कोते, शहर संघटक अमोल गायके, राहुल गोंदकर, विजय जगताप,संतोष जाधव, राजेंद्र सोमवंशी, विश्वजीत बागुल, जयराम कांदळकर, बाळासाहेब जगताप आदिंनी दिला आहे.

Visits: 104 Today: 2 Total: 1099588

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *