कळसेश्वर देवस्थान चोरीतील चौघांना अटक मुद्देमालही हस्तगत; अकोले पोलिसांची कामगिरी


नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कळस येथील कळसेश्वर मंदिरातील वैष्णवी देवीचे सोन्याचे दागिने, चांदीचा मुकुट व मंदिरात झोपलेल्या भाविकाचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविला होता. यातील चोरट्यांचा शोध लावण्यात अकोले पोलिसांना यश आले असून, मुद्देमालासह चौघांना अटक केली आहे.

सदर चोरीचा प्रकार कळसेश्वर मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता. या फूटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात आला. याकामी तीन तपास पथक तयार करुन अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु करण्यात आला. दरम्यान, खबर्‍याकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून कळस गावातील अभिषेक मारुती गवांदे याने त्याच्या साथीदारांसह मिळून ही चोरी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने त्याचा कळस, सिन्नर, शिर्डी, संगमनेर येथे शोध घेवून संगमनेरमधून ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने साथीदार अनिकेत रामनाथ वाकचौरे, प्रकाश सुरेश लाड (दोघेही रा.कळस, ता.अकोले) व श्याम तुकाराम केंग (रा.धुमाळवाडी, ता.अकोले) यांच्या मदतीने ही चोरी केल्याचे सांगितले.

त्यानंतर वरील सर्व आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शुक्रवारी (ता.16) त्यांना न्यायालयात हजर केले असता 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, त्यांच्याकडून सोन्याची नथ, सोन्याचे मणीमंगळसूत्र, सोन्याचे नेकलेस, चांदीचा मुकुट व एक मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 98 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. सदर कारवाई अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे, उपनिरीक्षक भूषण हांडोरे, महिला उपनिरीक्षक फराहनाज पटेल, पोहेकॉ. महेश आहेर, सहा. फौजदार शेख, पोना. विठ्ठल शेरमाळे, राम लहामगे, पोकॉ. अविनाश गोडगे, सुयोग भारती, सुहास गोरे, विजय खुळे, आत्माराम पवार, सुनील गवारी, संदीप भोसले, होमगार्ड शार्दुल वर्‍हाडे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोना. फुरकान शेख यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक राम लहामगे हे करत आहे.

Visits: 195 Today: 1 Total: 1983406

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *