संगमनेरातील रुग्णालयांमध्ये दोनशे वीस खाटा शिल्लक! सातशे अठ्ठेचाळीस जणांवर सुरू आहेत उपचार, तर एकशे चाळीस अलगीकरणात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीलाच आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उभारण्याच्या कृतीचा फायदा संगमनेरकरांना होत असून स्थानिक प्रशासनाने शासकीय व खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने 960 रुग्णांवर उपचारांची व्यवस्था केली आहे. त्याअंतर्गत दिडशे खाटांच्या अतिदक्षता विभागासह 332 ऑक्सिजन सुविधा असलेल्या, 38 व्हेंटीलेटर सुविधा असलेल्या व 228 सामान्य खाटाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सध्या या सर्व ठिकाणी मिळून 748 रुग्ण उपचार घेत असून 138 जणांना कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सध्या संगमनेरात 221 खाटा शिल्लक आहेत. आसपासच्या तालुक्यातील तब्बल 25 रुग्ण संगमनेरात उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या रुग्णगतीत वाढ होवून सक्रीय रुग्णांची संख्या वाढल्यास परिस्थिती अनियंत्रित होण्याचीही शक्यता असल्याने कोविड नियमांचे आणि निर्बंधांचे पालन करा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सध्या कोविड प्रादुर्भावाचा दर प्रचंड असून जिल्ह्यात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता सध्या संक्रमणाचा सर्वाधीक वेग अहमदनगर महापालिका क्षेत्रात असून तेथे गेल्या आठ दिवसांत सरासरी 506 रुग्ण दररोज असून राहाता तालुक्यात 159 रुग्ण, संगमनेर 123, कोपरगाव 118, श्रीरामपूर 116, नगर ग्रामीण 115 व अकोले तालुक्यात सरासरी 77 रुग्ण समोर येत आहेत. अहमदनगरमध्ये कोविड बाधितांवरील उपचारांसाठी पुरेशी व्यवस्था असून त्याखालोखाल संगमनेरातही सुमारे एक हजार रुग्णांची व्यवस्था सज्ज असून त्यातील 748 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. संगमनेरात स्थानिक रुग्णांसह अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव व राहाता तालुक्यातीलही रुग्ण उपचार घेत असून संक्रमणात आघाडीवर असलेल्या या सर्व तालुक्यातील प्रादुर्भाव वाढला तर या तालुक्यांची आरोग्यस्थितीच ‘व्हेंटीलेटरवर’ येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याशिवाय संगमनेरच्या स्थानिक प्रशासनाने लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी तालुक्यातील चौदा ठिकाणी व्यवस्था केली असून सद्यस्थितीत तेथील साडेसातशे खाटा शिल्लक आहेत.

संजीवन हॉस्पिटल (घुलेवाडी), वृंदावन हॉस्पिटल, चैतन्य हॉस्पिटल, कुटे हॉस्पिटल, पाठक हॉस्पिटल, मालपाणी हॉस्पिटल, सिद्धी हॉस्पिटल, धन्वंतरी हॉस्पिटल, कानवडे हॉस्पिटल, आरोटे हॉस्पिटल, रसाळ हॉस्पिटल, पोफळे हॉस्पिटल, सार्दसुमन हॉस्पिटल, यूनिटी हॉस्पिटल, ओम गगनगिरी हॉस्पिटल, शेवाळे हॉस्पिटल, सुयश हॉस्पिटल, वाणी हॉस्पिटल, शिंदे हॉस्पिटल (वडगाव पान), ताम्हाणे हॉस्पिटल, लाईफलाईन हॉस्पिटल, पसायदान हॉस्पिटल, सत्यम हॉस्पिटल, इथापे हॉस्पिटल, सेवा हॉस्पिटल, गुरुप्रसाद हॉस्पिटल (घुलेवाडी), भंडारी हॉस्पिटल (घारगाव) व शेळके हॉस्पिटल अशा 28 ठिकाणांसह ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये एकूण 969 रुग्णांची व्यवस्था असून त्यातील 150 अतिदक्षता विभाग, 250 सामान्य, 332 ऑक्सिजन व 38 व्हेंटीलेटरची सुविधा असलेल्या खाटा आहेत. यातील 748 खाटांवर सध्या रुग्ण असून 221 खाटा शिल्लक आहेत.

गेल्या वर्षी मार्चमध्ये जिल्ह्यात कोविडचा प्रवेश झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने आरोग्य व्यवस्थेच्या पायाभूत सुधारण्यावर अधिक भर दिला. त्यावेळची परिस्थिती आणि आजच्या स्थितीत खूप बदल झाला आहे. मात्र प्रशासनाने गेल्या वर्षी उभारलेल्या सुविधांचा संगमनेरकरांना लाभ होत असल्याने संगमनेर तालुक्यातील संक्रमणाची गती गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट असूनही अद्यापपर्यंत आरोग्य यंत्रणा सुरळीत आहेत. नागरिकांनी कोविड विषयक नियमांचे पालन करुन ‘लॉकडाऊन’चा अर्थ आणि त्यामागी उद्देश समजून घेतला तर निश्चितच ही वेळ देखील निघून जाईल, मात्र त्यासाठी सामान्य नागरिक आणि व्यापारी या दोघांच्याही संयमाचे दर्शन घडणं आवश्यक आहे.

रुग्णांसह आरोग्य कर्मचार्यांचे मनोबल टिकून रहावे यासाठी संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम तालुक्यातील चौदा विलगीकरण कक्षांसह 29 ठिकाणी रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांना भेटी देवून प्रत्यक्ष बाधित रुग्ण आणि त्या-त्या ठिकाणच्या आरोग्य सेवकांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्थानिक प्रशासनातील अशा काही अधिकार्यांनी गेल्या वर्षभर अगदी समर्पित भावनेतून काम केल्याने इतक्या मोठ्या संक्रमणानंतरही संगमनेरातील आरोग्य सुविधा अद्यापही पूर्णतः नियंत्रणात आहेत.

