अवकाळीसह कडाक्याच्या थंडीने 38 मेंढ्यांसह कोकरांचा मृत्यू! मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता; प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा

नायक वृत्तसेवा, घारगाव
बुधवारपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा शेतीसह पाळीव प्राण्यांनाही तडाखा बसला आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर, खंदरमाळ, आंबीदुमाला आदी गावांमध्ये अवकाळी व कडाक्याच्या थंडीने आत्तापर्यंत 38 मेंढ्यांसह कोकरांचा मृत्यू झाला असल्याची घटना गुरुवारी (ता.2) सकाळी उघडकीस आली आहे. अजूनही हा आकडा वाढण्याची शक्यता असून, यात मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, खंदरमाळ शिवारात सतू रेवजी सोडनर, संदीप शंकर जांभूळकर, संजय लहानू झिटे (सर्व रा. मांडवे बुद्रुक) हे मेंढपाळ काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात मेंढ्या चारण्यासाठी गेलेले होते. दरम्यान, पुन्हा परतत असताना पठारभागातील खंदरमाळ शिवारात मुक्कामास होते. बुधवारी सायंकाळी सर्व मेंढ्या वाघुरीत कोंडल्या होत्या. परंतु सकाळपासून सुरु झालेला पाऊस रात्रभर राहिला. शिवाय कडाक्याची थंडीही पडल्याने अनेक मेंढ्यांसह कोकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात सतू सोडनर यांच्या दोन मेंढ्या, संदीप जांभूळकर यांच्या चार मेंढ्या, संजय झिटे यांच्या तीन मेंढ्या व मच्छिंद्र रेवजी सोडनर यांची एक मेंढी यांचा मृत्यू झाला आहे.

याचबरोबर नांदूर, आंबीदुमाला, अकलापूर आदी गावांमधील शिवारात परिसरातील मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याही काही मेंढ्यांचा अवकाळीने बळी घेतला आहे. यामध्ये जानकू यमा कुलाळ (रा. जांबुत बु.) यांच्या सहा मेंढ्या, पोपट लहानू खेमनर यांची एक मेंढी, कोंडाजी राघू खेमनर यांच्या तीन मेंढ्या एक कोकरू, दत्तात्रय भाऊसाहेब मोरे यांच्या चार मेंढ्या, वसंत लक्षण सानप यांची एक मेंढी, पोपट गंगाराम कुदनर यांच्या पाच मेंढ्या, मारुती हरी कुलाळ यांच्या तीन मेंढ्या, अण्णा विठ्ठल काळे यांच्या पाच मेंढ्या अशा एकूण 38 मेंढ्यांसह कोकरांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी या घटनेची माहिती समजताच नांदूर खंदरमाळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर कुताळ, कामगार तलाठी युवराज जारवाल, गणेश सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. यामध्ये शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याने शासनाने त्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी मेंढपाळांनी केली आहे.

नांदूर खंदरमाळमध्ये अवकाळी व कडाक्याच्या थंडीने सुमारे 38 मेंढ्यांसह कोकरांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा रीतसर पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त मेंढपाळांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करु.
– डॉ. भास्कर कुताळ (पशुवैद्यकीय अधिकारी)

