भंडारदर्याच्या पाणलोटात पावसाचा जोर अनेक दिवसांनी साठ्यात वाढ; मुळा धरण आज २१ हजारांवर
नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या पंधरवड्यापासून रिमझिम वगळता जवळपास थांबलेल्या पावसाचे भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पुनरागमन झाले. गेल्या चोवीस तासांत झालेल्या पावसाने मरगळलेल्या ओढानाल्यांना पुन्हा गती आली असून धरणात १७६ दशलक्ष घनफूटाची आवक झाली आहे. मुळा धरणाच्या पाणलोटात मात्र पावसाचे प्रमाण जेमतेम असून धरणाच्या साठ्यात धिम्यागतीने भर पडत आहे. आज सायंकाळपर्यंत २६ हजार दशलक्ष घनफूटाच्या मुळा धरणाचा पाणीसाठा २१ हजार दशलक्ष घनफूटावर जाण्याची शयता आहे. आढळा व भोजापूरच्या पाणलोटात मात्र पावसाची उघडीप कायम असून या दोन्ही धरणांचे पाणीसाठे स्थिरावले आहेत.
लाभक्षेत्रात अद्यापही प्रतीक्षा असलेल्या वरुणराजाने यंदा धरणांच्या परिसरात मात्र समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडेसह आढळा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा समाधानकारक स्थितीत पोहोचला आहे. अकोले तालुयाच्या घाटमाथ्यावर सुरु झालेल्या पावसातून ही सर्व जलाशये तुडूंब भरुन वाहतील अशी स्थिती निर्माण झालेली असताना पंधरवड्यापूर्वी पाणलोटातील पावसाचा जोरही पूर्णतः ओसरला. दररोज अधुनमधून कोसळणार्या श्रावणसरींशिवाय पाऊस थांबल्याने धरणांमधील पाण्याची आवकही मंदावली, मात्र धरणात सुरु असलेली आवक कमी होवूनही कायम राहिल्याने मोठ्या धरणांमधील पाणीसाठे सतत हलते राहिले.
एकीकडे तालुयाच्या पश्चित पट्ट्यात पाऊस अधिक असला तरीही तुलनेत पूर्वेकडील भाग मात्र अवर्षणग्रस्त असल्याने या भागातील छोट्या-मोठ्या पाटबंधारे प्रकल्पांसह १० हजार ६० दशलक्ष घनफूटाचे आढळा आणि ५०० दशलक्ष घनफूटाचे भोजापूर प्रकल्प अकोले, संगमनेर व सिन्नर तालुयातील दुष्काळी भागांना संजीवनी देणारे ठरले आहेत. या दोन्ही जलाशयांच्या पाणलोटात यंदा पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्यानंतर आगमन झाले. मात्र या पावसातून ही जलाशये आपली सर्वोच्च पातळी गाठू शकली नाहीत. त्यातच लाभक्षेत्रात ठणठणाट असताना पाणलोटातील पावसानेही पूर्णतः विश्रांती घेतल्याने गेल्या चोवीस तासांत पूर्वेकडील आढळा धरणात आलेल्या अवघ्या एक दशलक्ष घनफूट पाण्याशिवाय या दोन्ही जलाशयांमधील पाण्याची आवक थांबली आहे.
मात्र बुधवारी (ता.२३) स्वाती नक्षत्राने भंडारदर्याच्या पाणलोटातील घाटघर, रतनवाडी व पांजर्यात काहीसा जोर धरल्याचे दिसून आले. त्यामुळे मागील पंधरवड्यापासून ओढ्याचे ओहोळ झालेल्या जलधारा पुन्हा फुगल्या असून अवघ्या २४ तासांत भंडारदर्यात १७६ दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले आहे. त्यातील ६७ दशलक्ष घनफूट पाण्याचा विद्युत निर्मितीसाठी वापर करण्यात आला असून उर्वरीत पाणी साठवण्यात आले आहे. निळवंडे धरणातही ११५ दशलक्ष घनफूट पाण्याची भर पडली असून सध्या धरणातून १ हजार ६२८ युसेकचा विसर्ग सुरु आहे. लाभक्षेत्रात पाऊस गायब असल्याने सध्या आवर्तनातून पिकं वाचवण्याची कवायत सुरु असून ओझर नजीकच्या कालव्यांतून १ हजार १७३ युसेक पाणी सोडण्यात आले आहे, तर येथून पुढील प्रवरापात्रातून अवघे ४५५ युसेक पाणी वाहत आहे. मुळा धरणातही अवघे २५ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले असून आज सायंकाळपर्यंत धरणाचा पाणीसाठा २१ हजार दशलक्ष घनफूटावर (८१ टक्के) पोहोचण्याची शयता आहे.
आज सकाळी संपलेल्या २४ तासांत घाटघर येथे ७० मि.मी., रतनवाडीत ६५ मि.मी., पांजरे ४३ मि.मी., भंडारददरा ३३ मि.मी. व वाकी येथे १४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा २० हजार ९७५ दशलक्ष घनफूट (८० टक्के), भंडारदरा १० हजार ८३० दशलक्ष घनफूट (९८.११ टक्के), निळवंडे ६ हजार ८४४ दशलक्ष घनफूट (८२.३४ टक्के), आढळा ९०७ दशलक्ष घनफूट (८५.५६ टक्के) व भोजापूर २३७ दशलक्ष घनफूट (६५.६५ टक्के) इतका आहे. वाकी जलाशयावरुन ९८ युसेक तर कोतुळच्या मुळापात्रातून १ हजार ३९३ युसेकचा प्रवाह वाहत आहे.