सोन्यासारख्या झेंडूच्या फुलांना मिळतोय कवडीमोल भाव! अतिवृष्टीचा बसला फटका; फूलउत्पादक शेतकरी संकटात
नायक वृत्तसेवा, घारगाव
फुलांना चांगले बाजारभाव मिळतील म्हणून संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील अनेक शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात विविध जातीच्या झेंडूची लागवड केली. मात्र, अतिवृष्टीने त्यांच्या अपेक्षाभंग झाला असून सध्या सोन्यासारख्या फुलांना कवडीमोल भाव मिळू लागल्याने फूलउत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे.
खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या करंजेकर मळा येथे बाळासाहेब करंजेकर यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात 24 ऑगस्टला झेंडूची लागवड केली. त्यासाठी साधारण एक लाख रुपयांच्यावर खर्च केला आहे. दसर्याच्या दोन-तीन दिवस अगोदर फुले सुरू झाली. सुरूवातीला एका तोड्याला पन्नास रुपये किलोचा भाव मिळाला. त्यानंतर दहा ते पाच रुपये किलोचा भाव मिळाला. मात्र, सध्या परतीच्या पावसामुळे सोन्यासारख्या फुलांना कवडीमोल भाव मिळत आहे. फुलांमध्ये पाणी साचून फुले काळी पडत आहे. परिणामी आता झालेला खर्च वसूल होती की नाय असा प्रश्न शेतकरी करंजेकर यांना सतावू लागला आहे.
यंदा मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी विविध जातीच्या फूलारोपांची लागवड केली. परंतु, फुले सुरू झाली आणि पावसाने धुमाकूळ घातला. मध्यंतरी अनेक शेतकर्यांनी झेंडूची झाडे उपटून टाकली होती. त्यात आता पुन्हा परतीच्या पावसाने फूल उत्पादक शेतकर्यांना पुन्हा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे फुलांना अक्षरशः कवडीमोल भाव मिळत असल्याने झालेला खर्चही फिटतो की नाही असा प्रश्न पडला आहे. तसेच हातातोंडाशी आलेला खरीपाचा घासही परतीच्या पावसाने हिरावून नेला आहे. पिकांमध्ये पाणीच पाणी साचल्याने पिके सडू लागली आहेत. ऐन सणासुदीत शेतकर्यांना नुकसानीचा सामना करावा लागण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
दसरा व दीपावलीला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे झेंडूची दीड एकरावर लागवड केली. मात्र, पावसाने अक्षरशः वाट लावल्याने फुलांना कवडीमोल भाव मिळत आहे. यातून खर्च देखील फिटणार नाही.
– बाळासाहेब करंजेकर (झेंडू उत्पादक)