शनिवार व रविवारी जिल्ह्यातील फक्त ‘औषधालये’ सुरू राहणार! कोणत्याही स्थितीत आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात लागू करण्यात आलेल्या ‘कठोर निर्बंधांना’ ठिकठिकाणच्या व्यापारी संघटना विरोध करीत आहेत. मात्र सध्या सुरु असलेल्या कोविड संक्रमणाचा वेग अधिक असल्याने त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबणे आवश्यक आहे. त्यासाठीच राज्यात ‘अत्यावश्यक सेवा’ वगळता उर्वरीत सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. त्यानुसार पाच दिवसांचे कठोर निर्बंध असून शनिवार व रविवारी त्याचे स्वरुप कसे असेल याबाबत व्यापार्यांमध्ये मतभिन्नता आहे. त्या पार्श्वभूमीवर संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार ‘वीकएण्ड लॉकडाऊन’च्या काळात केवळ मेडीकल सेवा सुरु ठेवून किराणा मालाच्या दुकानांसह उर्वरीत सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत कोणत्याही स्थितीत कोविड नियमांचे आणि आदेशाचे उल्लंघन होणार नाही अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोविड संक्रमणात 1 एप्रिलपासून प्रचंड वाढ झाली असून जिल्ह्यात दररोज सरासरी 1 हजार 810 रुग्ण तर एकट्या संगमनेर तालुक्यात दररोज सरासरी 123 रुग्ण आढळत आहेत. सध्या तालुक्यातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या लक्षात घेता कोविडचे संक्रमण थोपविणे आवश्यक झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत, तर शुक्रवारी रात्री 8 वाजेपासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला असून या कालावधीत तालुक्यातील केवळ मेडीकल सुविधा देणार्या बाबी सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
गेल्या 5 एप्रिलपासून लागू करण्यात झालेल्या या निर्बंधांना राज्यातील अन्य व्यापारी संघटनांसह संगमनेरातील व्यापार्यांची शिखर संस्था असलेल्या व्यापारी असोसिएशननेही विरोध दर्शविला आहे. मात्र प्रशासनाचा प्राधान्यक्रम माणसांचे जीव वाचवण्याला असल्याने बाजार खुले करुन रुग्णसंख्या वाढल्यास स्थानिक आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती आहे. त्या अनुषंगाने व्यापार्यांनी विरोध केला असला तरीही प्रशासनाकडून रविवार व सोमवारच्या कडक लॉकडाऊनसह सोमवार ते शुक्रवारपर्यंतच्या कठोर निर्बंधांमध्ये शिथीलता आणण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे व्यापारी विरुद्ध प्रशासन असा सुप्त संघर्ष निर्माण झाला असून काही व्यापारी सोशल समूहातून व्यापार्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही दिसून आले आहे.
सध्या संगमनेर तालुक्यात 886 रुग्ण सक्रीय संक्रमित असून त्यातील 748 रुग्ण रुग्णालयांमध्ये तर उर्वरीत 138 रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तालुक्यात 969 रुग्णांवर एकाचवेळी उपचारांची सोय असली तरीही तालुक्याची रोजची सरासरी रुग्णसंख्या विचारात घेता इतक्या प्रचंड संक्रमणात व्यवहार सुरळीत करण्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी आजची तालुक्याची स्थिती आहे. असे असतानाही काही ठराविक वेळेसाठी दुकाने उघडण्याची परवानगी मागितली जात असल्याने प्रशासनावरील दबाव वाढला आहे. मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी असा निर्णय आत्मघाती ठरेल असा ठाम विश्वास असल्याने गेल्या तीन दिवसांपासून व्यापार्यांकडून वारंवार मागणी समोर येवूनही व त्यासाठी बैठकांचे सत्र होवूनही प्रशासनाने शनिवार व रविवारी मेडीकल सेवा वगळता उर्वरीत कोणतेही व्यवहार सुरु ठेवण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे उद्या शनिवारी (ता.10) व रविवारी (ता.11) संगमनेर तालुक्यातील सर्व व्यवहार व आस्थापना पूर्णतः बंद ठेवाव्यात असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून सदरचे निर्बंध नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लागू करण्यात आले असून त्याचे प्रत्येकाने कटाक्षाने पालन करण्यास सांगण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करुन व्यवहार सुरु करण्याचा प्रयत्न केल्यास अशा व्यापार्यांवर नाईलाजास्तव दुकाने ‘सील’ करण्याची कारवाई करावी लागेल असेही जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. नागरिक व व्यापार्यांनी देश, राज्य व आपल्या तालुक्यावर आलेले संकट लक्षात घेवून व त्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जर्हाड, डॉ.भास्कर भंवर, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख (शहर), पांडुरंग पवार (तालुका), सुनील पाटील (घारगाव) व सुधाकर मांडवकर (आश्वी) आदींनी केले आहे.
राज्यातील व्यापार्यांच्या संघटनांसह संगमनेरातील व्यापारीही ‘लॉकडाऊन’ला विरोध करु लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी लॉकडाऊन का व कशासाठी हे स्पष्ट केले असून आर्थिक नुकसानापेक्षा मानवी नुकसान वाचविणे आवश्यक असल्याचे सांगीतले आहे. त्या अनुषंगाने अहमदनगरच्या जिल्हाधिकार्यांनी शनिवार व रविवारी जाहीर केलेल्या ‘लॉकडाऊन’ची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून या काळात फक्त औषधांची दुकाने आणि वैद्यकीय सेवा सुरु ठेवण्यास परवानगी असल्याचे सांगितले आहे.