जिल्हा शासकीय प्रयोगशाळेतून मिळणार चोवीस तासांत अहवाल! दैनिक नायकच्या वृत्ताची तत्काळ दखल; जिल्ह्याला मिळाले नवीन ‘आरटीपीसीआर’ मशीन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोविडच्या प्रादुर्भावाला जिल्हा शासकीय प्रयोगशाळेकडून पाच ते आठ दिवसांच्या विलंबाने मिळणारे स्राव चाचणी अहवाल कारणीभूत असल्याचे भयानक वास्तव दैनिक नायकने आपल्या शनिवारच्या अंकातून मांडल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. या वृत्ताची तत्काळ दखल घेत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी जिल्हाधिकार्यांशी चर्चा करुन या प्रकारांबाबत त्वरीत बदल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शासकीय प्रयोगशाळेसाठी तातडीने नवीन आरटीपीसीआर स्राव चाचणी मशीन घेतले आहे. त्याद्वारे मंगळवारपासून चोवीस तासांत स्राव चाचणी अहवाल देण्याची घोषणा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी रविवारी सायंकाळी संगमनेरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

जिल्ह्यात कोविडचे दुसरे संक्रमण सुरू झाल्यापासूनच जिल्हा शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त होणारे अहवाल विलंबाने प्राप्त होत होते. संक्रमणाची गती वाढल्यानंतर जिल्ह्यातील सर्व चौदा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे स्राव घेण्याचे प्रमाणही वाढल्याने शासकीय प्रयोगशाळेेवरील ताण वाढला. त्यामुळे पाठविलेल्या स्राव नमुन्यांचे चाचणी अहवाल पाच ते आठ दिवसांच्या विलंबाने प्राप्त होवू लागले. त्याचा परिणाम लक्षणे नसलेले अनेक रुग्ण अहवाल येईस्तोवर आपण ‘निगेटिव्ह’ असल्याच्या अविर्भावात गावभर फिरत असल्याने संक्रमणात वाढ झाल्याचे निरीक्षणही समोर आले. याबाबत दैनिक नायकने शनिवारच्या (ता.3) अंकात ‘शासकीय प्रयोगशाळेने बिघडवली जिल्ह्याची कोविडस्थिती, वर्षपूर्तीनंतरही तीन मंत्र्यांच्या जिल्ह्यातील प्रयोगशाळेतून आठ दिवसांनी मिळतात चाचणी अहवाल’ अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.

अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेल्या या विषयाची राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तत्काळ दखल घेतली. रविवारी (ता.4) सकाळी त्यांनी दैनिक नायकच्या वृत्ताचा संदर्भ देत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली असता जिल्हा प्रयोगशाळेची स्थिती त्यांच्या निदर्शनास आली. यावर तातडीचा उपाय म्हणून नवीन ‘आरटीपीसीआर’ मशीन घेण्याचा निर्णय झाला व त्याची लागलीच अंमलबजावणी होवून रविवारीच जिल्हा शासकीय प्रयोगशाळेत नवीन मशीन दाखल झाले आहे. रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी भोसले यांनी अकोले व संगमनेर येथील कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठका घेतल्या. यावेळी संगमनेरात सायंकाळी उशीराने आटोपलेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दैनिक नायकने योग्यवेळी योग्य समस्या समोर आणल्याबद्दल कौतुक करतांनाच शासकीय प्रयोगशाळेबाबतची विस्तृत माहिती पत्रकारांना दिली.

सुरुवातीच्या काळात जिल्हा प्रयोगशाळेतून दररोज केवळ एक हजार स्राव चाचण्या केल्या जात असल्याचे सांगतांना त्यांनी टप्प्याटप्प्याने त्यात बदल करुन आजच्या स्थितीत प्रयोगशाळेची क्षमता दररोज दोन ते अडीच हजारांवर नेल्याचे ते म्हणाले. आरटीपीसीआरद्वारा एका स्राव नमुन्याचा निष्कर्ष काढण्यासाठी बारा तासांचा अवधी लागतो. त्यानंतर त्याचे विभाजन आणि डाटा नोंद प्रक्रिया पूर्ण केली जाते. नोंदणी प्रक्रियेत अधिक वेळ जात असल्याचेही निरीक्षण समोर आल्याने जिल्हा प्रयोगशाळेत अशा नोंदी करणार्यांची संख्याही वाढवून आता सोळावर नेण्यात आली असून सोमवारी (ता.5) प्रलंबित सर्व अहवालांचे कामकाज पूर्ण करण्यात येईल व मंगळवारपासून (ता.6) अवघ्या चोवीस तासांत स्राव चाचण्यांचे अहवाल मिळतील असे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.

स्राव दिल्यानंतर संबंधित संशयित रुग्णाला विलगीकरणात ठेवण्याबाबत फारशी काळजी घेतली जात नाही या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, कोणत्याही संशयिताचा स्राव घेतल्यानंतर त्याच्या हातावर शिक्का मारण्याचे बंधन घालण्यात आले आहे. लक्षणे नसलेले रुग्ण अहवाल प्राप्त होईस्तोवर गृहविलगीकरणात तर लक्षणे असलेले रुग्ण कोविड केअर सेंटर्समध्येच दाखल केले जावेत याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यादरम्यान त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचनाही जिल्ह्यातील इन्सीडेंट कमांडर्स तथा तहसीलदारांना देण्यात आल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात ऑक्सिजन व औषधांचा पुरेसा साठा असून मुख्यालयाच्या ठिकाणी 16 किलो लिटर क्षमतेचा अतिरीक्त ऑक्सिजन टँक उभारण्यात येत असून, त्याद्वारे जिल्ह्यात कोठेही तत्काळ प्राणवायुचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अकोले व संगमनेर येथेही ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून अतिरिक्त साठवणुकीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन व औषधांचा कोणताही तुटवडा नसून चाचण्यांचा वेगही वाढवला जाणार असल्याकडे त्यांनी पत्रकारांचे लक्ष्य वेधले.

सध्या देशात सुरू असलेला संसर्ग अधिक घातक असल्याकडे लक्ष्य वेधतांना येणार्या काळात संसर्गाचा वेग वाढून जिल्ह्यातील रुग्णसंख्याही वाढणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये येऊ घातलेल्या संभाव्य दुसर्या संक्रमणावेळी आपण 6 हजार 100 खाटांचे नियोजन केले होते. यावेळी मात्र रुग्णवाढीची गती लक्षात घेवून प्रशासनाने 16 हजार खाटांचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर्स व कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्यात आली असून सर्व ठिकाणी खाटांची संख्या वाढवण्यात आली असून वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये वारंवार आढावा बैठका घेत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

जिल्ह्यातील मोठ्या धार्मिक स्थळांकडे येणार्या गर्दीचा ओघ खूप मंदावला असून आपण खुद्द शिर्डीतील आढावा बैठकीवेळी त्याचा अंदाज घेतल्याचे सांगत जिल्ह्यातील सर्व धार्मिक ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर होत असल्याने सध्यातरी जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर कोणतेही निर्बंध नसतील असे संकेत त्यांनी यावेळी दिले. खासगी रुग्णालयातील अवास्तव बिलांबाबतच्या प्रश्नावरही त्यांनी जिल्ह्यात ‘ऑडिट’ प्रणाली लागू असून गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकार्यांना नोडल अधिकारी म्हणून जबाबादार्या देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही खासगी रुग्णालयाने नियमबाह्य पद्धतीने रुग्णाकडून बिल आकारणी केल्यास अशा रुग्णालयावर केवळ भारतीय दंड संहिता व साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वयेच नव्हेतर बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टनुसार कडक कारवाई करण्याचे निर्देश शहरी भागात मुख्याधिकार्यांना तर ग्रामीणभागात वैद्यकीय अधीक्षकांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

‘लॉकडाऊन’ बाबतची शक्यता फेटाळून लावताना अती प्रादुर्भाव सुरू असलेल्या ठिकाणांबाबत मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांना सविस्तर अहवाल दिल्यानंतर मुख्य सचिव व वरीष्ठांच्या आदेशान्वयेच लॉकडाऊन जाहीर होतो. मात्र जिल्ह्यात सध्या कलम 144 अन्वये जमावबंदी व संचारबंदी लागू आहे. दुकानदार अथवा ग्राहक मास्कशिवाय वावरत असल्यास त्यांच्यावर सात दिवस दुकान ‘सील’ करण्याची कारवाई केली जात आहे. याशिवाय लग्नसोहळे, अंत्यविधी यावर पोलीस विभागाची बारीक नजर आहे. मास्कचा अधिकाधिक प्रमाणात वापर हे सूत्र अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी मुंबई पोलीस अधिनियमानुसार पोलिसांना अधिकार देण्यात आले असून मास्कशिवाय फिरणार्यांवर दोनशे रुपये दंडाची कारवाई केली जात आहे.

प्रशासन, पोलीस, नगरपरिषद व नागरिक मिळून आत्तापर्यंत कोविडच्या विरोधात चांगले काम झाले आहे. यापुढील काळात या सगळ्या घटकांना अधिक समर्पित भावनेने काम करावे लागणार आहे. पुढील महिन्यात कोविड संसर्गाचा वेग आणखी वाढण्याचा अंदाज आहे. कोविडच्या संक्रमणापासून आपला बचाव करायचा असेल तर मास्क आणि सामाजिक अंतर या दोन्ही गोष्टी एकाचवेळी पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आत्तापर्यंत मोठे सहकार्य केले आहे, यापुढेही अधिक जागृक राहून कोविड नियमांचे पदोपदी पालन करावे व प्रत्येकाने सुरक्षित रहावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखर्णा, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जर्हाड, इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आदिंसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

