महसूल मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेत समविचारी नेते एकत्र ः आ.डॉ.तांबे अॅड.कानवडे व सांगळे यांचा बिनविरोध संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याची कामधेनू असणारी जिल्हा बँक ही मागील पिढीतील धुरीणांनी राजकारण विरहित सांभाळली. तीच परंपरा राज्याचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोपासली असून जिल्हा बँकेत समविचारी नेत्यांना एकत्र घेत शेतकरी व सर्वसामान्यांचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम केले जात असल्याचे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी काढले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर अमृत उद्योग समूहाच्यावतीने अहमदनगर जिल्हा बँकेवर अॅड.माधव कानवडे व गणपत सांगळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर होते तर व्यासपीठावर कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, इंद्रजीत थोरात, लक्ष्मण कुटे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष रामदास वाघ, शंकर खेमनर, मीरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, नवनाथ अरगडे, निर्मला गुंजाळ, साहेबराव गडाख, चंद्रकांत कडलग, विश्वास मुर्तडक, विलास कवडे, मोहन करंजकर, सुभाष सांगळे, आनंद वर्पे यांसह साखर कारखाना व दूध संघातील सर्व संचालक उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार डॉ.तांबे म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले, आबासाहेब निंबाळकर, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे यांच्यासह त्या काळातील सहकार व समाजनेत्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी बँक जोपासली. अत्यंत शिस्तप्रिय व काटेकोरपणे नियोजन करत ही बँक आज राज्यात नव्हे तर आशिया खंडात अग्रक्रमांकाची बनवली. सर्वसामान्य माणूस व शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केले. हाच वारसा नव्या पिढीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोपासला असून त्यांनी जिल्हा बँकेत कायम समविचारी नेत्यांना एकत्र आणत सहकारात राजकारण करायचे नाही असा संदेश राज्याला दिला आहे. नूतन संचालक मंडळ सुद्धा याचा आदर्श नीतिमूल्यांवर काम करुन बँक पुन्हा एकदा अग्रगण्य बनवतील व तिचा लौकिक कायम ठेवेल असा विश्वास शेवटी आमदार डॉ.तांबे यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी बाजीराव खेमनर, अॅड.माधव कानवडे, गणपत सांगळे, इंद्रजीत थोरात व नवनाथ अरगडे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर यांनी आभार व्यक्त केले.
