भागवत धर्माचा प्रचार करणार्या अबलेचा विनयभंग! स्वतःच्या जमीनीतून जाण्यासही मज्जाव; घारगाव पोलीस पुन्हा चर्चेत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
निष्क्रिय पोलीस निरीक्षकांच्या अखंड साखळीत अडकलेल्या तालुक्याच्या पठारभागात गुन्हेगारांनी हैदोस घातलेला असताना आता त्यात बळजोरीने शेतजमीन सोडून देण्यासाठी चक्क अबलेच्या पदरालाच हात घालण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याबाबत घारगावच्या पोलीस निरीक्षकांकडे तक्रार देवूनही त्यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, अखेर एरव्ही भागवत धर्माची पताका खांद्यावर घेवून समाज प्रबोधन करणार्या ‘त्या’ चाळीसवर्षीय अबलेने संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडे आर्जव केल्यानंतर पिंपळगाव देपातील आठ जणांविरोधात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने पठारातून संताप व्यक्त होत असून केवळ तुंबड्या भरण्यात मग्न असलेल्या घारगाव पोलीस निरीक्षकांच्या बदलीची मागणी जोर धरु लागली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार यातील विनयभंगाचा प्रकार शुक्रवारी (ता.६) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला. पठारभागात राहणारी एक चाळीसवर्षीय विवाहित महिला भागवत धर्माचा प्रचार-प्रसार करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. या सोबतच तिच्या पतीच्या मालकीची चार एकर शेतजमीनही असून त्यातून मिळणार्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा गाडा सुरळीतपणे सुरु आहे. मात्र या जमीनीवर बाजूलाच असलेल्या दुसर्या एका जमीन मालकाची नजर असून त्यातूनच या कुटुंबाला त्रास देण्याचा सतत प्रयत्न सुरु आहे. शुक्रवारी घडलेली घटना या साखळीतील सर्वात संतापजनक प्रकार आहे.

शुक्रवारी सदरील महिलेचा पती शेळ्या चारण्यासाठी तर दोन्ही मुलं शाळेत गेलेली असताना त्या महिलेला घरात एकटे पाहून बाजूच्या शेतजमीनीचा मालक शिवाजी भागा खेमनर हा त्यांच्या घरात शिरला. यावेळी त्याने महिलेच्या पतीबाबत विचारणा केली. त्यानंतर काही समजण्याच्या आतच त्याने ‘तू मला फार आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे..’ असे म्हणत त्याने त्या अबलेला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करु लागला. या प्रकाराने धक्का बसलेल्या त्या चाळीस वर्षीय अबलेने त्याला ढकलून दिल्याने तो भानावर आला.

जाता जाता त्याला आपल्या दुष्कृत्याची उपरती झाल्याने त्याने ‘झाला प्रकार कोणास सांगितलास तर तुझं जगणं मुश्किल करील, तुला गावात राहू देणार नाही, तुझ्यासह तुझा पती आणि मुलांना जीवे ठार मारुन टाकील..’ अशी धमकी देत तो तेथून पळून गेला. माध्यान्नाला पीडितेचा पती घरी आल्यानंतर तिने घडला प्रकार त्याच्या कानावर घातला. त्यानंतर दोघेही पती-पत्नी खेमनरला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेले असता उलट त्यानेच त्यांना शिवीगाळ करीत तुमचा येण्या-जाण्याचा रस्ताच बंद करुन टाकील अशा आशयाची धमकी भरली.

या प्रकाराने दहशतीत आलेले ते दाम्पत्य घरी परतले. मात्र दुसर्या दिवशी शनिवारी (ता.७) भलताच प्रकार त्यांच्या समोर उभा राहिला. ते दोघेही सकाळी नऊच्या सुमारास खासगी शेतजमीनीतून गेलेल्या वहिवाटीच्या रस्त्याने गावाकडे जात असताना आदल्या दिवशी थेट ‘त्या’ अबलेच्या पदराला हात घालणारा शिवाजी भागा खेमनर याच्यासह धनंजय शिवाजी खेमनर, मल्हारी धोंडीबा खेमनर, संतोष काशिनाथ खेमनर, सोपान तुकाराम खेमनर, अण्णा मारुती खेमनर, मारुती तुळशीराम खेमनर व धोंडीभाऊ भागा खेमनर यांनी त्या दोघांनाही त्यांच्याच घराजवळ अडविले व सदरची शेतजमीन आम्ही विकत घेतली आहे, तुम्ही आमच्या जमीनीतून जायचे नाही असे म्हणत त्यांनी काट्या व दगडं टाकून त्यांचा रस्ता अडवला.

या प्रकारानंतरही त्या दोघांनी सदरील रस्ता वहिवाटीचा आहे. विनाकारण वाद निर्माण करुन आमचा रस्ता अडवू नका अशी विनवणी केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत त्या सर्वांनी ‘तुम्ही आमच्या विरोधात पोलीस तक्रार केली तर तुम्हाला जीवंत सोडणार नाही..’ अशी धमकी देत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आदल्या दिवशी घडलेल्या विनयभंगाच्या प्रकाराची इभ्रतीच्या कारणाने तक्रार टाळल्याने मनोबल उंचावलेल्या आरोपीने बेकायदा जमाव जमवून त्या दाम्पत्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सहन केला तर आपलं जगणं अवघड होईल याची कल्पना आल्यानंतर अखेर त्या दाम्पत्याने कायद्याचा आधार घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र भ्रष्टाचाराच्या कारणांनी काळवंडलेल्या घारगाव पोलिसांकडून त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. सदरील महिलेने स्वतः पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांची भेट घेवून त्यांना घडला प्रकार कथन केला, मात्र त्यांनी सगळा प्रकार केवळ गोष्टीसारखा ऐकून घेत त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. अखेर त्या अबलेने संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना आपबिती सांगितल्यानंतर त्यांच्या आदेशाने घारगाव पोलीस ठाण्यात वरील आठजणांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३५४ (अ), ४५२, ३४१, १४१, १४३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या घारगावच्या पोलीस निरीक्षकपदी असलेले संतोष खेडकर लष्करी सेवेतून निवृत्त होवून पोलीस दलाच्या सेवेत दाखल झालेले अधिकारी आहेत. त्यांना भारतीय दंडसंहिता व फौजदारी प्रक्रियेबाबत फारसे ज्ञान नसल्याचेही वेळोवेळी समोर आले आहे. त्यांची अगदी सुरुवातीपासूनची येथील कारकीर्द भ्रष्टाचाराच्या अखंड आरोपांनी गाजली आहे. त्यांच्या कार्यकाळात पठारभागाने गुन्हेगारी कारवायांचा कळस गाठला असून एकाही घटनेचा तपास लावण्यात घारगाव पोलीस अपयशी ठरले आहेत. तरीही त्यांच्यावरील राजकीय छत्र अबाधित असल्याने अशा निष्क्रिय अधिकार्याला पाठबळ देणार्यांना नेमकं काय साधायचंय असा सवालही आता उपस्थित झाला आहे.

