संगमनेरकरांनो, आजपासून आठच्या आंत घरात! अन्यथा.. संगमनेर शहर पोलिसांकडून गावात दवंडी पिटवून नवीन निर्बंधाची माहिती..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात मोठ्या प्रमाणात कोविड बाधित समोर येवू लागल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्णय घेत आजपासून राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीसाठी निर्बंध घातले आहेत. हा आदेश पुढील 15 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात लागू राहणार आहे. त्यानुसार रात्री आठनंतर संगमनेर शहर परिसरातील कोणतीही दुकाने, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट अथवा सार्वजनिक ठिकाणे खुली राहणार नाहीत, यातून केवळ औषधांची दुकाने वगळण्यात आली आहेत. या कालावधीत पाच अथवा त्यापेक्षा अधिक संख्येने कोणी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही शहर पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे संगमनेरकरांनो, आजपासून आठच्या आंत घरात! या सूत्राचे सर्वांनी पालन करावे, अन्यथा पोलिसांकडून होणार्या कारवाईचा सामना करावा.
राज्यापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक झाला असून दररोज मोठ्या संख्येने रुग्णसमोर येत असल्याने जिल्ह्यातील अहमदनगर शहर, राहाता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील कोविड स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नव्याने लागू केलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमली बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पोलीस व महसुल प्रशासनाला बजावले आहेत. त्यानुसार संगमनेर शहर पोलिसांनी आज सकाळपासूनच लाऊडस्पिकरद्वारा दवंडी पिटवून नागरिकांना आजपासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची आणि त्याचे उल्लंघन केल्यास होणार्या कारवाईची माहिती दिली आहे.
आजपासून 15 एप्रिलपर्यंत दररोज रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत शहरातील सर्व दुकाने, आस्थापने, हॉटेल्स, बार व रेस्टॉरंट ग्राहकांसाठी बंद असतील. रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल्स व रेस्टॉरंटमधून फक्त पार्सल सेवा सुरु ठेवण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय निर्बंध असलेल्या कालावधीत केवळ औषधांची दुकाने व घरपोहोच सेवा देणारे उपक्रम अथवा दुकानात येणारा माल खाली करुन घेण्यास मुभा असेल. निर्बंध शिथील असलेल्या कालावधीत सामाजिक अंतर आणि मास्क या दोन्ही गोष्टींचे दुकानदार, ग्राहक आणि नागरिक यांना काटेकोरपणे पालन करावे लागेल अन्यथा कारवाईचा सामना करावा लागेल.
रात्री 8 वाजेनंतर पाच अथवा त्यापेक्षा अधिक संख्येने कोणी फिरतांना आढळल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड केला जाईल. मास्कशिवाय फिरणार्यांवर पाचशे रुपये दंडाची तर रस्त्यावर थुंकणार्यांवर एक हजार रुपये दंडाची कारवाई केली जाईल. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सुरु असलेल्या औषधालयांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांनाही कारवाईचा सामना करावा लागेल. पुढील आदेश प्राप्त होईस्तोवर लग्नकार्यासाठी पन्नास तर अंत्यविधीसाठी विस जणांच्याच उपस्थितीची परवानगी असेल. आजपासून लागू झालेल्या निर्बंधांचे ‘पर्यटन’ करु पाहणार्यांवरही पोलिसांची विशेष नजर असणार आहे. कोणत्याही कारणाशिवाय रात्री आठनंतर घराबाहेर फिरणार्यांची पोलीस चौकशी करणार आहेत, विनाकारण फिरतांना आढळणार्यांना कारवाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे संगमनेरकरांनो, तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव खुप वाढला आहे, कोरोनाचा विषाणू कोणाच्या ना कोणाच्या रुपात आपल्या आसपास फिरत आहे. थोडसं दुर्लक्ष आणि आपला घात अशी आजची स्थिती आहे. त्यामुळे नियमांचे पालन करा, घरातच रहा, सुरक्षित रहा.