अकोल्यातील बेपत्ता कोविड बाधिताचा संगमनेरात दुर्दैवी मृत्यु! संगमनेरी युथ सोशल फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केले होते त्यांना रुग्णालयात दाखल
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अकोले तालुक्यातील रहिवासी असलेल्या व चाचणी अहवाल संक्रमित आल्याने घाबरुन नातेवाईकांना सोडून बेपत्ता झालेल्या 65 वर्षीय इसमाचा अखेर आज घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात मृत्यु झाला. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांशिवाय बेपत्ता असलेल्या कालावधीत कोविडने त्यांच्या श्वसनयंत्रणेवर पूर्णतः ताबा मिळविल्याने त्यांना नाहक आपला जीव गमवावा लागला. संबंधित वृद्धाला मानवतेचा हात देत संक्रमित असूनही हाताने उचलून रुग्णालयात दाखल करणार्या संगमनेरी युथ सोशल फौंडेशनच्या मानवसेवेचे या निमित्ताने पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
गेल्या 8 सप्टेंबररोजी अकोले तालुक्यातील विठा येथे राहणार्या 65 वर्षीय इसमाचा स्त्राव चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचे वय व अन्य आजारांच्या कारणाने अकोल्यातील डॉक्टरांनी त्यांना संगमनेरला नेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित इसमाचे नातेवाईक त्यांना घेवून संगमनेरकडे येण्याच्या तयारीत असतांनाच घाबरलेल्या अवस्थेतील ‘त्या’ वृद्ध इसमाने नातेवाईकांची नजर चुकवून तेथून पलायन केले. तेव्हापासून त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. त्यासाठी समाज माध्यमातून शोध संदेशही व्हायरल करण्यात आला होता. युथ फौंडेशनच्या अकोल्यातील काही कार्यकर्त्यांनी सदरचा संदेश संगमनेरातील आपल्या सहकार्यांपर्यंतही पोहोचवल्याने ‘त्या’ वृद्धाचा संगमनेरातही शोध सुरु होता.
याच दरम्यान गेल्या शुक्रवारी (ता.11) संगमनेर शहरातील प्रवरा परिसरात असलेल्या म्हाळुंगी नदीच्या पुलाजवळ व स्वामी समर्थ केंद्राच्या बाहेर बाजूस गेल्या तीन दिवसांपासून एक वृद्ध इसम निपचीत पडून असल्याची माहिती युथ फौंडेशनच्या कार्तिक जाधव यांना समजली. त्यांनी आपले सहकारी आनंद बनभेरु व मयुर राक्षे यांच्यासह तेथे धाव घेतली असता सदरचा वृद्ध इसम समजलेल्या ठिकाणी अत्यंत शांत अवस्थेत पडलेला त्यांना दिसला. त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यात त्राणच शिल्लक नसल्याने ते कोणताही प्रतिसाद देवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना त्याच अवस्थेत रुग्णालयात नेण्याचा निर्णय झाला.
यावेळी तेथे पोहोचलेल्या नगरसेवक किशोर पवार यांनीही मदतीचा हात देत लागलीच पालिकेची रुग्णवाहिका बोलावली. संगमनेरी युथ सोशल फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी महिंद्र धारणकर, विशाल कुर्री, संतोष गायकवाड, ऋषीकेश खरात व अर्जुन फिसके या तरुणांच्या मदतीने त्या वृद्धाला उचलून रुग्णवाहिकेत ठेवले व फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पुढील उपचारांसाठी त्यांना घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया यांनी तात्काळ रुग्णाची तपासणी केली असता ती वृद्ध व्यक्ति संक्रमित असल्याचा त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांना डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तेथेच त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरु होते.
यादरम्यान सदर वृद्ध व्यक्ति संगमनेरात सापडल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनाही कळाली. युथ फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिचा संपर्क क्रमांक मिळवून सोमवारी सायंकाळी उशीराने त्यांना याबाबतची माहिती दिली. आपले हरवलेले आजोबा सापडल्याचा आनंद घेवून आज सकाळी ही मंडळी अकोल्यातील विठा येथून संगमनेरकडे निघाली, मात्र वाटेतच आपले आजोबा मृत्यु पावल्याची दुर्दैवी वार्ता त्यांना ऐकावी लागली. अकोल्यातून बेपत्ता झाल्यापासून 11 सप्टेंबरपर्यंत सदर वृद्ध व्यक्ति कोणत्याही उपचाराशिवाय आणि अन्नपाण्यावाचून एकाच ठिकाणी पडून राहील्याने कोविडने त्यांच्या शारीरिक यंत्रणेवर पूर्णतः नियंत्रण मिळविले होते. त्यामुळे त्यांना दाखल केल्यापासूनच त्यांची अवस्था अत्यंत गंभीर होती. मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या पांढर्यावेषातील देवदूतांनी गेले तीन दिवस त्यांना स्वस्थ करण्याची शर्थ केली, मात्र ती आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अपयशी ठरली.
मूक्या जीवांचे संरक्षण करण्यासाठी प्राणांची बाजी लावणारे संघटन म्हणून ‘संगमनेरी युथ सोशल फौंडेशन’ संमनेरात ओळखले जाते. मानवतेचा झरा सोबत घेवून फिरणार्या या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आजवर अनेक मूक्या जीवांसह असंख्य निराधारांना मदतीचा हात देत त्यांना घरी पोहोचवले आहे. अवघ्या तालुक्यातील वातावरण कोविडने भयग्रस्त झालेले असतांना आणि रुग्णांना थेट हात लावण्यास वैद्यराजही धजावत नसतांना या तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या वृद्धाचे प्राण वाचवण्यासाठी जीवाचाही विचार केला नाही. मात्र त्यांची ही धडपड आज अयशस्वी ठरली.
सदरची व्यक्ति संक्रमित असल्याची कोणतीही माहिती या कार्यकर्त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करतांना सर्वच कार्यकर्त्यांचा वावर सहज होता. त्यासोबतच परिसरातील काही तरुणांनीही मदतीसाठी धाव घेतली होती. आता सदरची व्यक्ति कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने या प्रसंगी ज्या व्यक्ति उपस्थित होत्या त्यांची काळजी वाढली आहे. त्यामुळे संगमनेर युथ सोशल फौंडेशनचे प्रमुख कार्तिक जाधव यांनी 11 सप्टेंबररोजी स्वामी समर्थ मंदिराजवळ सदरचे कार्य करतांना संपर्कात आलेल्यांनी विलगीकरणात रहावे अथवा चाचणी करुन घ्यावी असे आवाहन केले आहे.