तेलंगणा सरकारप्रमाणे राज्यात कर्जमाफी करावी ः मुरकुटे श्रीरामपूरमध्ये बीआरएसकडून फटाके फोडून आनंदोत्सव
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शेतकर्यांना १९ हजार कोटीची कर्जमाफी दिली, असाच निर्णय शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेऊन शेतकर्यांना कर्जमुक्त करावे, अशी मागणी अशी भारत राष्ट्र समितीचे राज्य कार्यकारी सदस्य माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केली आहे.
तेलंगणातील कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी मुरकुटे यांनी श्रीरामपूर येथे महात्मा गांधी पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांसह फटाके उडवून आनंदोत्सव साजरा केला. ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेनेही बीआरएस पक्षाला पाठिंबा दिला आहे. उपेक्षित शेतकर्यांना न्याय द्यायचा असेल तर ‘अबकी बार किसान सरकार’ ही भारत राष्ट्र समितीची घोषणा प्रत्यक्षात आणली पाहिजे, असे मत मुरकुटे यांनी व्यक्त केले.
शेतकरी हिताचे कल्याणकारी सरकार तेलंगणात आहे. तेलंगणात ८० टक्के सिंचन झाले असून शेतीला चोवीस तास वीज, मोफत पाणी दिले जाते. पेरणीपूर्व एकरी क्षेत्राची कोणतीही मर्यादा न ठेवता दहा हजाराचे विना परतावा अर्थसहाय्य दिले जाते. अशा अनेक शेतकर्यांसाठी योजना आहेत. तेलंगणा सरकार हे खर्या अर्थाने शेतकर्यांचे सरकार आहे. राज्यात बीआरएसला शेतकर्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे, असेही मुरकुटे यांनी सांगितले. यावेळी भारत राष्ट्र समिती पक्षाचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुरेश गलांडे, सिद्धार्थ मुरकुटे, पुंजाहरी शिंदे, भाऊसाहेब उंडे उपस्थित होते.