सिनेस्टाईल पाठलाग करीत कुख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या! शहर पोलीस ठाण्यातील दोघा जिगरबाज पोलीस कर्मचार्यांची ‘दबंग’ कारवाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर पोलिसांनी आज पहाटे पकडलेल्या दरोडेखोरांच्या चर्चा रंगल्या असतांनाच आता पहाटे फरार झालेल्या चौथ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे दोघा जिगरबाज पोलीस कर्मचार्यांनी तब्बल तीन किलोमीटर पाठलाग करीत समनापूर जवळ त्याला पकडले. या धामधुमीत ते जखमीही झाले, मात्र ‘कर्तव्य सर्वोपरी’ म्हणत त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत पोलीस दप्तरी ‘कुख्यात’ अशी नोंद असलेल्या हलिम अकबर पठाण या नामचीन गुन्हेगाराच्या हातात बेड्या ठोकल्या. या दोन्ही कर्मचार्यांनी दाखविलेले धाडस कौतुकास्पद असून पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी या दोघांचेही अभिनंदन केले आहे.

आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास समनापूर शिवारातील पुणे-नाशिक बाह्यवळण रस्त्यावरील पुण्याकडील बाजूला संशयात्मक हालचाल होत असल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी छापा घालीत विक्रम रामनाथ घोडेकर (वय 20), अजित अरुण ठोसर (वय 20, दोघेही रा.पंपींग स्टेशन) व सर्फराज राजू शेख (वय 19, रा.लालतारा सोसायटी) या तिघांना अटक केली. यावेळी अंधाराचा फायदा घेत कलीम अकबर पठाण, हलीम अकबर पठाण व आसिफ शेख (सर्व रा.जमजम कॉलनी) हे तिघे मात्र पसार होण्यात यशस्वी झाले.

यातील पठाण बंधुंंवर संगमनेर शहर व तालुका पोलीस ठाण्यात अर्धा डझनहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कलीम पठाण याच्यावर 2018 मध्ये तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दित दरोड्याचाही गुन्हा दाखल आहे. या सर्व आरोपींचा गेल्या अनेक दिवसांपासून शोध सुरु असतांना आज पहाटे दरोड्याच्या तयारीत असतांनाच निम्मीटोळी पकडली गेली, तर निम्मी पळून गेली. पोलिसांनी मात्र त्यांचा पिच्छा सोडला नाही. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आज पहाटेपासूनच पसार आरोपींच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापेमारी केली. त्याच दरम्यान हलीम अकबर पठाण या कुख्यात आरोपीचा माग काढण्यात पोलीस कर्मचारी सचिन उगले आणि सलिम शेख यांना यश आले.

भारतनगर परिसरात त्याच्यावर झडप घालणार त्याचवेळी त्याला पोलिसांची कुणकूण लागली आणि तो सुसाट वेगाने धावू लागला. त्याच्या मागावर असलेल्या दोन्ही पोलीस कर्मचार्यांनी जीवाची पर्वा न करता त्याचा पाठलाग सुरु केला. अगदी सिनेस्टाईल सुरु असलेला हा प्रकार रस्त्याने जाणार्या येणार्यांना चित्रपटातील प्रसंगाचाच अनुभव देणारा होता. जवळपास तीन किलो मीटर अंतर पळून थकलेल्या हलीम पठाण याने समनापूर गणपती मंदिराच्या पाठीमागून शेतात पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात तो यशस्वी झाला असता तर त्याला पकडणे अशक्य झाले असते. त्यामुळे ही ‘शेवटची संधी’ मानून सचिन उगले या जिगरबाज पोलीस कर्मचार्याने चित्त्याप्रमाणे झेप घेत हलीम पठाणला खाली पाडले आणि सलिम शेख यांनी लागलीच त्याला जमीनीवर दाबून त्याच्यावर नियंत्रण मिळविले.

या गदारोळात उगले पूर्णतः गाळात माखले होते, पण कर्तव्यपूर्तीच्या आनंदात त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केली. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी आरोपी हलीम याने शर्थ केली, त्यात दोन्ही पोलीस कर्मचारी जखमीही झाले, मात्र त्यांनी हातात आलेला आरोपी सुटू दिला नाही. सचिन उगले व सलिम शेख या जिगरबाज पोलीस कर्मचार्यांनी बजावलेली भूमिका शहर पोलिसांची छाती वितभर फुगवणारी ठरली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. शहरातूनही या दोन्ही जिगरबाज कर्मचार्यांचे कौतुक होत आहे.

दरोड्याच्या तयारीतील टोळीत असलेले कलिम व हलिम अकबर पठाण हे अत्यंत सराईत आरोपी आहेत. त्यांच्या घरझडतीत दरोड्यासाठी वापरल्या जाणार्या हत्यारांसह काही प्राणघातक शस्त्रही हस्तगत झाली आहेत. हलिम पठाण हा कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्यावर मोक्कान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविणार आहोत. त्याला अटक करतांना त्याच्यासह त्याचा मोठा भाऊ सलिम अकबर पठाण याने पोलीस कर्मचार्यांना मज्जाव करीत कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याने त्या दोघांवरही सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत आहोत. आज पहाटे पकडलेल्या अन्य तिघांना न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
मुकुंद देशमुख
पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर

