पालिकेच्या हलगर्जीपणातून वाढतोय संगमनेरातील कोरोना! प्रतिबंधीत क्षेत्र केवळ कागदावरच; रुग्णांचा संपर्क शोधण्याकडेही अक्षम्य दुर्लक्ष

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिन्याभरापासून संगमनेर शहरासह तालुक्यात कोविड बाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी कोविडच्या अनुषंगाने जबाबदार्या निश्चित केल्या असून स्थानिक स्वराज्य संस्थांना रुग्णांचे किमान वीस संपर्क शोधण्यासह प्रतिबंधीत क्षेत्रात व्यक्ति अथवा वाहनांची वर्दळ व त्यातून होणारा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र पालिकेचे संपूर्ण मनुष्यबळ सध्या मार्च एन्डच्या वसुलीत व्यस्त असल्याने कोरोना शहरात बिनधास्त वावरत असून पालिकेकडून जिल्हाधिकार्यांच्या आदेशालाच चक्क केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्याचा परिणाम गेल्या 27 दिवसांत शहरात सरासरी 21 रुग्ण या गतीने तब्बत 555 रुग्णांची भर पडली आहे. पालिकेचा हा हलगर्जीपणाच शहरातील रुग्णसंख्या वाढीचे कारण ठरले आहे.

निम्मा फेब्रुवारी सरल्यानंतर तालुक्यात कोविडचे पुनरागमन झाले. तत्पूर्वी कोविड गेला असे परस्पर समजून प्रशासनातील घटकांनी त्याच्या जबाबदारीतून अलगद आपापले अंग काढून घेतले. पालिकेच्या बाबतीतही हेच घडले. ‘जनसेवा हिच ईश्वर सेवा’ असं ब्रीद असलेल्या संगमनेर नगर पालिकेला दिडशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. या कालावधीत आलेल्या दोन महामार्यांमध्ये पालिकेने केलेल्या कामाची आजही जुने जाणकार चर्चा करतात. मात्र यावेळी पालिकेला नागरिकांशी आणि त्यांच्या आरोग्याशी काही घेणंदेणं नसल्यासारखी स्थिती दिसत आहे.

जिल्ह्यात कोविड परतल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी प्रादुर्भाव वाढत असलेल्या तालुक्यांमधील कोविड यंत्रणा कार्यान्वीत करुन जबाबादार्यांचे वाटप केले. त्यानुसार कोविडच्या उपाययोजना करण्यासाठी इन्सीडेंट कमांडर म्हणून तहसीलदारांना पुन्हा अधिकार बहाल करण्यात आले. ठिकठिकाणच्या पालिका व ग्रामपंचायतींच्या जबाबदार्याही ठरविण्यात आल्या. गेल्या 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संगमनेरात येवून पालिकेच्याच सभागृहात अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत अन्य आदेशांसोबतच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान 20 जणांचा शोध, त्यांच्यावर उपचार आणि सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्राची पूर्तता करण्याची जबाबदारी पालिकेला देण्यात आली.

विशेष म्हणजे इंन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार यांनी 17 मार्च रोजी आपल्या आदेशान्वये विद्यानगर (हॉटेल करमची मागील बाजू), देवाचा मळा (दत्त कॉलनी) व पंपींग स्टेशन (मोगरा कॉलनी) ही तीन ठिकाणे 18 ते 31 मार्च या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करुन या परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली. त्यानंतर 23 मार्च रोजीच्या आदेशान्वये सुतारगल्ली (परदेशी ते काजळे यांचे घर), विद्यानगर (आट्टल फार्म ते कृष्णकुंज बंगला) आणि गणेशनगर (आयडियल कॉम्प्युटर ते देव निवास) हा परिसरही कोविड प्रादुर्भावाचा परिसर म्हणून 4 एप्रिलपर्यंत प्रतिबंधक क्षेत्र घोषीत केले व तेथील आवश्यक उपाया योजनांसाठी पालिकेचे प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, वैद्यकीय अधिकारी मच्छिंद्र साबळे, कामगार तलाठी पोमल तोरणे व पालिकेचे लिपीक आनंद गाडे यांच्यावर या क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली.

प्रत्यक्षात इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार यांनी आदेश काढून वरील ठिकाणे प्रतिबंधात्मक भाग जाहीर केल्याने पालिकेने तत्काळ सदरचा परिसर ‘सील’ करुन तेथील सामान्य माणसांची वर्दळ व हालचाल थांबविणे आवश्यक होते, प्रत्यक्षात मात्र पालिकेचा कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी या परिसराकडे फिरकलाही नाही, त्यामुळे सदरचा परिसर सील वगैरे करणे या गोष्टी खूप दूर राहिल्या. हा झाला बाधित आढळल्यानंतर त्या परिसरात प्रादुर्भाव वाढू नये यासाठीचा एक भाग. आता दुसर्या एका महत्त्वाच्या गोष्टीची जबाबदारीही पालिकेची आहे. ती म्हणजे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान 20 लोकांचा शोध घेवून त्यांना समाजापासून वेगळे करण्याची. यापूर्वी पालिकेने हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले आहे. यावेळी मात्र पालिका कोविडकडे लक्षच द्यायला तयार नाही असे चित्र दिसत आहे.

मार्च महिन्यात आजअखेर शहरातून साडेपाचशे पेक्षा अधिक रुग्ण समोर आले आहेत. मात्र यातील कोणताही रुग्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतर तरी रुग्णालयात दाखल झाला की नाही किंवा विलगीकरणात आहे की नाही यासह त्याचे संपर्क शोधण्याची तसदीही पालिकेने घेतलेली नाही. त्यामुळे साहजिकच संक्रमित झालेले मात्र कोणताही त्रास अथवा लक्षणे नसलेले अनेक संशयीत रुग्ण बिनधास्त शहरात वावरले आणि जो भेटेल त्याला कोविडचा प्रसाद वाटत राहिले. त्यातूनच संगमनेरची कोविडस्थिती पुन्हा भयंकर अवस्थेत पोहोचली आहे असे म्हणण्यास पूर्ण वाव आहे, मात्र याउपरांतही पालिकेने अजूनही कोविडची दखल घेतलेली नाही. पालिकेचा हा हलगर्जीपणा नेमका कशासाठी याचे उत्तर सामान्य माणसांना मिळण्याची आवश्यकता आहे.

प्रतिबंधात्मक क्षेत्र व रुग्णांचा संपर्क याकडे पालिकेने दुर्लक्षच केले हे स्पष्ट आहे, त्यासोबतच पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांकडेही पालिकेने सपशेल दुर्लक्ष केल्याचे काही दाखले दैनिक नायककडे आहेत. त्यातील एक रुग्ण तर चक्क दुकान उघडूनही बसला होता, त्यातून त्याने किती जणांना खिरापत वाटली असेल देवच जाणो. या सगळ्या गोष्टींची थेट जबाबदारी पालिकेची आणि पर्यायाने मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांची असतांना त्यांनी त्यात सपशेल हलगर्जीपणा केला आहे. जिल्हाधिकार्यांनी या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चुका सामान्य माणसांनाच भोगाव्या लागतील.

