बिस्किटांचे बॉक्स घेऊन जाणारा टेम्पो उलटला! माहुली शिवारातील घटना; बिस्किटांचे मोठे नुकसान
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारात बिस्किटांचे बॉक्स घेऊन जाणारा टेम्पो उलटला असून यामध्ये बिस्किटांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी (ता.23) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मालवाहू टेम्पोवरील चालक विलास श्रीपती मांजरे (रा.मांजरवाडी, राजगुरुनगर, ता.खेड, जि.पुणे) हे संगमनेर येथून विविध कंपन्यांचे बिस्किटांचे बॉक्स घेऊन गुरुवारी रात्री पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने आळेफाट्याच्या दिशेने जात होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास माहुली शिवारात आले असता कुत्र्याला वाचविण्यासाठी गेले असता त्याचवेळी टेम्पो महामार्गापासून जवळच असलेल्या मोकळ्या जागेत पलटी झाला. त्यात टेम्पोमधील बिस्किटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
टेम्पो पलटी झाल्याची माहिती काही नागरिकांनी डोळासणे महामार्ग पोलिसांना दिली. त्यावर डोळासणे महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण ढोकरे, भरत गांजवे, कैलास ढोंबरे यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. दरम्यान अपघातात बिस्किटांसह टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. तर चालकाला किरकोळ मार लागला आहे.