पेट्रोल व डिझेलच्या उच्चांकी दरवाढीमुळे सर्वसामान्य वेठीस ः आ.डॉ.तांबे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात संगमनेरात काँग्रेसचे धरणे आंदोलन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्र सरकारने विना चर्चेने पास केलेले शेतकरी व कामगार विरोधी कायदे तातडीने मागे घ्यावे. तसेच दिल्लीच्या सीमेवर मागील शंभर दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांना पाठिंबा देत डिझेल, पेट्रोल व गॅसच्या भरमसाठ होत असलेल्या भाववाढीच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत लाक्षणिक धरणे आंदोलन शुक्रवारी (ता.26) झाले. यावेळी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य माणूस वेठीस धरला जात असल्याची टीका आमदार डॉ.तांबे यांनी केली.

शहरातील प्रांत कार्यालय येथे संगमनेर शहर व तालुका काँग्रेसच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबा ओहोळ, इंद्रजीत थोरात, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, शिवाजी जगताप, संतोष हासे, दत्तू खुळे, बाळासाहेब पवार, नवनाथ आंधळे, साहेबराव गडाख, मोहन करंजकर, विलास नवले, आनंद वर्पे, सुभाष गुंजाळ, अ‍ॅड.त्र्यंबक गडाख, सोमेश्वर दिवटे, अ‍ॅड.मधुकर गुंजाळ, शिवाजी वलवे, शिवाजी गोसावी, तात्या कुटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी केंद्र सरकारच्या विविध धोरणांविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. तसेच पेट्रोल व डिझेलची भाववाढ मागे घेऊन केंद्राने पास केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांना देण्यात आले.

132 कोटींच्या देशांमध्ये शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मात्र केंद्राने कायम त्याच्या विरोधी धोरणे घेतले असून नुकतेच पास केलेले कायदे शेतकरी व कामगारांना देशोधडीला लावणारे आहे. या कायद्यांमुळे खासगीकरणाला प्रचंड प्रोत्साहन मिळणार असून हे कायदे फक्त अदानी व अंबानी सारख्या बड्या उद्योगपतींसाठी आहे. कायदे करण्यापूर्वीच या उद्योगपतींनी गोडाऊन बांधले होते हे कशाचे लक्षण आहे. केंद्र सरकार सातत्याने मूठभर लोकांसाठी काम करत आहे. याविरुद्ध देशातील शेतकरी पेटून उठला आहे. मात्र केंद्र सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आरोग्य, शिक्षण, संरक्षण यावर अर्थसंकलपामध्ये कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. देशात राजकीय व सामाजिक अस्थिरता वाढली आहे. नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दिवसेंदिवस होणारी पेट्रोल व डिझेलची दरवाढ सामान्यांच्या खिशाला झळ देणारी असून काँग्रेस पक्षाने सातत्याने या भाववाढीला विरोध केला आहे. राज्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष प्रखर विरोध करत आहेत. आज देशभरात व अहमदनगर जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध तीव्र आंदोलन होत असून हे काळे कायदे मागे न घेतल्यास काँग्रेसच्यावतीने आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

Visits: 125 Today: 2 Total: 1102617

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *