ऐनतपूर शिवारात शस्त्राचा धाक दाखवून धाडसी दरोडा दहा तोळे सोन्याचे दागिने, लॅपटॉप लुटल्याची प्राथमिक माहिती

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक विठ्ठल बाबासाहेब सदाफुले यांच्या घरी सोमवारी (ता.9) मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास 10-12 चोरट्यांनी दरोडा टाकून घरातील ऐवज लुटून नेला. ऐनतपूर शिवारातील बोंबले वस्ती येथे ही घटना घडली आहे. यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सोमवारी मध्यरात्री प्रा. विठ्ठल सदाफुले यांच्या बंगल्याच्या मागील बाजूचे प्रवेशद्वार तोडून चोरट्यांनी स्वयंपाकगृहातून घरात प्रवेश केला. यावेळी प्रा. सदाफुले, त्यांच्या पत्नी, दोन मुली, एक मुलगा असे पाचजण होते. घरात प्रवेश करताचत चोरट्यांनी प्रा. सदाफुले यांच्या गळ्याला चाकू लाऊन आम्हांला विरोध केला तर चिरून टाकण्याची धमकी दिली आणि शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण केली. त्यानंतर घरात उचकापाचक करुन हाती लागेल तो ऐवज लुटून नेला. यावेळी त्यांच्या पत्नीने धाडस दाखवत चोरट्यांचा मराठीतून शिवीगाळ करुन विरोध केला. त्यावर चोरटे त्यांच्याशी बहेनजी, बहेनजी.. असे बोलून संवाद साधत होते. त्यात दहा तोळे सोन्याचे दागिने, लॅपटॉप यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

याचबरोबर चोरटे मोबाईल घेऊन जात असताना मुलांनी आमच्या ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल नका नेऊ, अशी विनवणी केली. त्यामुळे त्यांनी मोबाईल नेले नाहीत. सुदैवाने त्यांनी घरातील कोणालाही मारहाण केली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. चोरटे हिंदी भाषेत बोलत होते. किती ऐवज गेला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सकाळपासून तपासाची चक्रे फिरविली जात आहेत. दरोडेखोर हिंदीत बोलत असल्याने ते खरेच परप्रांतीय आहेत की त्यांनी दिशाभूल करण्यासाठी हिंदी भाषेत संवाद साधला. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु स्थानिक एखादा माहितगार व्यक्तीचा यात सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहे.

Visits: 18 Today: 1 Total: 115440

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *