नागरिकांच्या मनातील संवेदना जागवण्यासाठी पोलीस रस्त्यावर! वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह शहर पोलीस ठाण्यातील पथकाचे शहरात संचलन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यासह तालुक्यात कोविडचे दुसरे संक्रमण सुरू होवूनही नागरिकांना अद्यापही त्याचे गांभीर्य लक्षात येत नसल्याची स्थिती आहे. तालुक्यातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याने तालुक्याची कोविड स्थिती अत्यंत चिंताजनक अवस्थेत पोहोचली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना मास्क वापरण्याबाबत वारंवार सूचना देवूनही अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पोलीस प्रशासनाला अखेर आज ‘बळा’चा वापर करावा लागला. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी फौजफाट्यासह आज भर उन्हात शहरातील विविध भागातील असंवेदनशील नागरिकांच्या संवेदना जागवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काहींना प्रसाद वाटप करण्यात आला, तर काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.


गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे तालुक्याची अवस्था चिंताजनक बनली आहे. अशा स्थितीत कोविड रोखण्याचे आव्हान स्वीकारुन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संगमनेरात येवून प्रशासनातील अधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी ‘मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन’ याद्वारेच जिल्ह्यातील कोविड स्थिती आटोक्यात आणता येणे शक्य असल्याचे या बैठकीत सांगितले. पोलिसांनी कोणाचाही मुलाहिजा न जोपासता कोविडबाबतच्या नियमांकडे दुर्लक्ष करणार्‍या आणि कोविडचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरत असलेल्या लोकांवर सक्तिने कारवाईचे आदेश दिले होते.

त्यानंतर स्थानिक प्रशासनाने बैठकीच्या दुसर्‍याच दिवशी 20 मार्च रोजी नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून बसस्थानकावरील चंदुकाका सराफ, नवीन नगर रस्त्यावरील प्रवरा मेडिकल व श्री.ओंकारनाथ मालपाणी मार्गावरील राजबक्षी वडा सेंटर या तीन दुकानांवर कारवाई करीत त्यांना ‘सील’ ठोकले होते. मात्र अवघ्या चोवीस तासांतच ‘हमीपत्रावर’ सील खोलण्यात आले. पोलिसांकडून मात्र शहरातील काही भागात कडक तपासणी आणि कारवाई सुरु होती. मात्र त्यात व्यापकता नसल्याने कारवाई होत असलेल्या ठराविक रस्त्यांवर वावरणारे त्या भागात गेले की नियम पाळीत व इतरत्र मात्र नियमांची पायमल्ली करीत. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी कारवाई पथकाची संख्या वाढवली.

कारवाई हा हेतू न ठेवता कोविडचा प्रादुर्भाव केवळ नियम पाळल्यानेच रोखता येवू शकत असल्याने त्याबाबत लोकांमध्ये जागृकता निर्माण होण्याची गरज आहे. त्यासाठी संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आज सकाळपासूनच शहरातील विविध भागात फिरुन पादचारी, दुचाकीस्वार, वाहनधारक, दुकानदार व ग्राहक अशा सर्वांनाच मास्क वापरण्याबाबत आवाहन केले. कोविड गावीही नसल्यागत वागणार्‍यांवर काही जणांना पथकातील पोलिसांचा ‘प्रसाद’ही मिळाला तर काहींना दंडात्मक कारवाईचा सामनाही करावा लागला. पोलिसांच्या आजच्या प्रयत्नाचा मात्र शहरात चांगला परिणाम दिसून आला. अनेकांनी या कारवाईत सातत्य राखण्याची अपेक्षाही व्यक्त केली.

तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने कोविड संदर्भात प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क न वापरल्यामुळे कोविडचा अधिक वेगाने प्रसार होत असल्याचे निरीक्षण विविध संस्थांच्या निष्कर्षातून समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी म्हणून सार्वजनिक ठिकाणांवर वावरतांना मास्कशिवाय घराबाहेर पडू नये.
राहुल मदने
पोलीस उपअधीक्षक, संगमनेर

Visits: 3 Today: 1 Total: 30192

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *