कोल्हार भगवतीपूरमध्ये तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’ उल्लंघन करणार्यांकडून जागेवरच होणार दंड वसूल
नायक वृत्तसेवा, राहाता
मागील काही दिवसांपासून गावात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या पाहता कोल्हार भगवतीपूर गावामध्ये 26 ते 28 मार्च असा तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांचीही मदत घेवून नियमांचे उल्लंघन करणार्यांकडून दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हार बुद्रूकचे माजी सरपंच अॅड.सुरेंद्र खर्डे यांनी सांगितले आहे.
कोरोना संक्रमणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कोल्हार, भगवतीपूर ग्रामपंचायती, आरोग्य विभाग व व्यापार्यांची नुकतीच तातडीने बैठक झाली. यामध्ये वाढती बाधितांची संख्या लक्षात घेवून जनता कर्फ्यूचा एकमताने निर्णय घेण्यात आला. या बैठकीस कोल्हारच्या सरपंच निवेदिता बोरुडे, भगवतीपूरचे सरपंच दत्तू राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय घोलप, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुधीर खर्डे, उपाध्यक्ष अनिल बांगरे, संजय शिंगवी, गोरक्षनाथ खर्डे, अमोल खर्डे, दिनकर खर्डे, श्रीकांत बेंद्रे, अरुण निबे, शिवाजी निकुंभ, शिवकुमार जंगम, पप्पू मोरे, ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
अॅड.खर्डे यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. नियमांचे उल्लंघन केल्यास जागेवर दंड करण्यात येईल, असा इशारा दिला. डॉ.संजय घोलप यांनी रुण वाढत असल्याने बेड मिळणे अवघड झाले असल्याचे सांगितले. जे निकषात बसतात, त्यांनी तातडीने लसीकरण करुन घ्यावे आणि मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा वापर करावा असे आवाहन केले.