शिर्डीतील शासकीय कोविड सेंटर पूर्वीप्रमाणे सुरू करा! शिवसेनेची प्रांताधिकारी व साई संस्थानकडे निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी व परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झालेला असून साईबाबा संस्थानच्या शिर्डी येथील कोविड सेंटरमध्ये सुरू असलेली एक इमारत यासाठी पुरेशी नसल्याने रुग्ण दाखल करून घेणं गैरसोयीचं होत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणे सुरू असलेल्या चारही इमारती शासनाने कोविड सेंटर म्हणून सुरु कराव्यात, अशी मागणी नुकतीच शिवसेनेने प्रांताधिकारी व संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या नाशिक, अहमदनगर तसेच परिसरातील कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने भरल्याने तेथे जागा उपलब्ध नाही. खासगी कोविड सेंटरमध्ये गोर-गरीब रुग्णांना अव्वाच्या-सव्वा बिलामुळे उपचार घेणे जिकिरीचे बनले आहे. सुरुवातीच्या काळात शिर्डी येथील कोविड सेंटरच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो रुग्ण मोफत उपचार घेऊन घरी गेले आहे. यामुळे अनेक रुग्णांचे कोट्यवधी रुपये येथील कोविड सेंटरमुळे वाचले आहेत. उत्कृष्ट चहा, दूध, जेवण, चांगले डॉक्टर, नर्स, कर्मचारी, स्वच्छता यामुळे सर्व रुग्णांच्या पसंतीला उतरले आहे. अडचणीच्या काळात श्री साईबाबा संस्थानचा शिर्डी आणि परिसराला आधार आहे.

मधल्या काळात कोरोना रुग्णसंख्या घटल्याने चार इमारती बंद करून एक इमारत सुरू ठेवण्यात आली होती. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. त्यामुळे बंद केलेल्या चार इमारती पूर्वीप्रमाणेच तातडीने कोविड सेंटर म्हणून सर्व सुविधांसह खुल्या करणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टर, नर्स, कर्मचारी, औषधे, पी.पी.ई. किट, एन-95 मास्क व इतर साहित्य उपलब्ध करून द्यावेत. सद्यस्थितीमध्ये शिर्डीत लॉकडाउन सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. साईभक्तांची वर्दळ कमी झाल्याने येथील बाजारपेठ उध्वस्त झाली आहे. व्यावसायिक अडचणीत आले आहेत. त्यातच कोरोनाने कहर सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर संस्थानने पूर्वीप्रमाणे सुरू असलेल्या चारही इमारती शासनाने कोविड सेंटर म्हणून सुरु कराव्यात, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, विठ्ठल पवार, पुंडलिक बावके, सुयोग सावकारे, प्रसाद पाटील, अमर गायकवाड, अक्षय तळेकर, रमेश गागरे, मदन मोकाटे, सचिन गाडेकर, अरबाज कादरी, सुवरनेश साबळे, संतोष वाघमारे, मोहसीन सय्यद, कृष्णा वाघमारे, असीफ सय्यद, अनिस शेख, दीपक कोते आदिंनी केली आहे.

Visits: 182 Today: 3 Total: 1098942

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *