नेवाशातील चार सायकलस्वारांनी माऊंट एव्हरेस्टला घातली गवसणी ‘हॉल ऑफ फेम’मध्ये नोंद; 75 वेळा इमामपूर घाटातून सायकलवर चढ-उतार

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील चार सायकलस्वारांनी माऊंट एव्हरेस्टच्या उंचीइतकी सायकल चालवून माऊंट एव्हरेस्टला गवसणी घातली. त्यामुळे त्यांचे नाव ‘हॉल ऑफ फेम’मध्ये नोंदविले गेले आहे. सायकलिस्ट शरद काळे, उदय टीमकरे, सागर काळे व शशीकांत आवारे यांनी हा मान मिळवला आहे.

जगातील सर्वात अवघड आव्हान या पाच सायकलस्वारांनी स्वीकारले होते. शनिवारी 27 मार्चला ते पूर्ण केले. सुयोग मोकाटे यांना काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे राईड पूर्ण करता आली नाही. माऊंट एव्हरेस्टची उंची 8 हजार 848 मीटर (29 हजार 29 फूट) आहे. सायकलस्वाराने हे अंतर एखाद्या टेकडी अथवा डोंगरावर वर-खाली करून तितकी उंची गाठायची असते. हे पूर्ण केल्यास त्याचे नाव हॉल ऑफ फेममध्ये नोंदविले जाते.

पाचही सायकलस्वारांनी शनिवारी सकाळी 6 वाजता पांढरीपूल येथील हनुमान मंदिरापासून सुरुवात केली होती. 75 वेळा इमामपूर घाटातून सायकलवर चढ-उतार केली. घाट्याच्या पायथ्यापासून उंची 125 मीटर आहे. हे अंतर कापण्यास काळे यांना 37 तास 58 मिनिटे लागली. तर सागर काळे यांना 38 तास व उदय टीमकरे यंना 38 तास 29 मिनिटे लागली. विशेष म्हणजे सायकलस्वाराने मध्ये कुठेही झोप घेता कामा नये अशी अट घातली गेली होती. रात्रीच्या वेळी सायकल चालविताना घाटामध्ये चोरांचाही धोका होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी युवराज आठरे यांनी बंदोबस्त पुरविल्याने धोका मोहीम सुरक्षित पार पडली.

आजपर्यंत जगातील 15 हजार 834 स्पर्धकांनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. भारतातील फक्त 152 स्पर्धकांनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. त्यात 135 पुरुष तर 17 महिला आहेत. दोन महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये 600 किलोमीटरची बी.आर.एम. करत असताना एव्हरेस्ट्टींगबद्दल सायकलिस्ट कांचन बोकील यांच्याकडून माहिती मिळाली. काळे यांनी गेल्या दोन वर्षांपासून सह्याद्री क्लासिक ह्या महाराष्ट्रातील सर्वात अवघड समजल्या जाणार्‍या सायकलिंग स्पर्धेत भाग घेऊन वेळेत पूर्ण केली होती. तीन वर्षांपासून काळे सायकलिंगमधील सुपर रेंडूनियर (एसआर) आहेत. त्यांनीच इतर चार सायकलस्वारांना या मोहिमेबद्दल सांगून त्यांना भाग घेण्यास प्रवृत्त केले. विशेष म्हणजे हे चारही सायकलस्वार अकरावी व बारावी या वर्गात शिकत असून त्यांनी नुकतीच सायकलिंगला सुरुवात केली आहे.

या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी अनेकांनी सायकल, मोटारसायकल किंवा चारचाकी वाहने घेऊन सायकलस्वारांसोबत काही अंतर प्रवास केला. या काळात सायकलस्वरांना चहा, बिस्कीट, चिक्की, चॉकलेट, फळे, काजू, बदाम, खजूर, ताक व लस्सी अशा स्वरूपात अनेकांनी भेटवस्तू दिल्या. ग्रामीण भागातील या चार सायकलपटूंनी केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. तर अहमदनगर सायकलिस्टसाठी ही एक भूषणावह गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया नगर सायकलिस्ट असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य चंद्रशेखर मुळे यांनी व्यक्त केली.

Visits: 11 Today: 1 Total: 116961

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *